Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

भारताची विजयी सुरुवात; बांगलादेशवर २५ धावांनी मात
ट्रेन्ट ब्रिज, ७ जून / पीटीआय

गतविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. बांगलादेशविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारताने २५ धावांनी विजय मिळविला. युवराजसिंगच्या १८ चेंडूंतील ४१ धावा व प्रज्ञान ओझाने घेतलेले चार बळी या कामगिरीच्या जोरावर भारताने ही लढत जिंकली. ओझाच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने

 

बांगलादेशला १५५ धावांत गुंडाळले. त्याआधी, भारताने युवराजसिंग, गौतम गंभीर (५०) व रोहित शर्माच्या (३६) फलंदाजीच्या जोरावर १८० धावांचा टप्पा गाठला.
बांगलादेशविरुद्ध भारताचे पारडे जड होते, पण नेदरलॅण्ड्सने इंग्लंडला दिलेला धक्का लक्षात घेता भारताने बांगलादेशला कमी लेखण्याची चूक केली नाही. गंभीर आणि रोहित शर्मा या सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली पण बांगलादेशच्या गोलंदाजांनी तसेच क्षेत्ररक्षकांनी त्यांना अगदीच ढिले सोडले नाही. त्यामुळे भारताला शिताफीने धावा जमविता आल्या नाहीत. त्यातच सलामीची जोडी रोहित शर्मा बाद झाल्यामुळे फुटली व धोनी मैदानात आल्यावर धावांच्या वेगाला लगाम बसला. मात्र युवराजसिंगने मैदानाचा ताबा घेतल्यावर चाहत्यांना अपेक्षित खेळ पाहायला मिळाला. चार षटकार व तीन चौकारांच्या सहाय्याने युवराजने ४१ धावांची खेळी साकारली. त्याच्या खेळीमुळे भारताला १८० धावापर्यंत मजल मारता आली.
भारताने ठेवलेले १८१ धावांचे आव्हान पेलताना बांगलादेशने चांगला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तमिम इक्बालने १५ धावांच्या खेळीत झहीर खानला सलग दोन चौकार लगावले तर जुनैदने २२ चेंडूत ४१ धावांची खेळी करताना इरफान पठाणला एक षटकार खेचला.
धोनीने युसूफ पठाणला चेंडू सोपविला आणि ही जोडी फुटली. तमिम बाद झाला तरी जुनैदने आक्रमक धोरण कायम ठेवले. मात्र दुसऱ्या टोकाकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. ओझाने आपल्या पहिल्याच षटकात दोन बळी घेत बांगलादेशला तडाखा दिला. त्यातून नंतर बांगलादेशचे खेळाडू सावरलेच नाहीत.
धावफलक
भारत - गौतम गंभीर झे. शाकिब गो. नईम ५०, रोहित शर्मा त्रि. शाकिब ३६, महेंद्रसिंग धोनी त्रि. नईम २६, युवराजसिंग झे. तमिम गो. शहादत ४१, सुरेश रैना त्रि. रुबेल १०, युसूफ पठाण नाबाद १, इरफान पठाण नाबाद ११, अवांतर ५, एकूण २० षटकांत ५ बाद १८०, बाद क्रम : १-५९, २-११२, ३-१४०, ४-१५७, ५-१६९,
गोलंदाजी : मोर्तझा ४-०-२९-०, रुबेल ४-०-४९-१, शहादत ३-०-३१-१, महमुदुल्ला २-०-१५-०, शाकिब ४-०-२४-१, नईम ३-०-३२-२.
बांगलादेश - तमिम इक्बाल यष्टीचीत धोनी गो. युसूफ पठाण १५, जुनैद सिद्दीकी झे. हरभजन गो. ओझा ४१, मोहम्मद अश्रफुल झे. गंभीर गो. इशांत ११, शाकिब हसन झे. धोनी गो. ओझा ८, महमुदुल्ला झे. युवराज गो. ओझा ८, रकिबुल हसन झे. ओझा गो. झहीर १६, मशरफ मोर्तझा त्रि. ओझा ११, नईम इस्लाम झे. युवराज गो. इशांत २८, शहादत हुसेन नाबाद ०, अवांतर ६, एकूण २० षटकांत ८ बाद १५५, बाद क्रम : १-२४, २-५५, ३-७४, ४-७७, ५-९५, ६-१११, ७-१२१, ८-१५४,
गोलंदाजी : झहीर ३-०-२६-१, इरफान २-०-२०-०, युसूफ ३-०-२६-१, इशांत ४-०-३४-२, हरभजन ४-०-२५-०, ओझा ४-०-२१-४.