Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आयर्लंडविरुद्ध बांगलादेशला हवा फक्त विजय!
नॉटिंगहॅम, ७ जून / एएफपी

भारताविरुद्ध सलामीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर आता बांगलादेशला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आयर्लंडला नमविण्याशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे

 

आयर्लंडचा संघही विजयी सलामीसाठी उत्सुक असेल.
भारताकडून बांगलादेशला २५ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. पण आता आयर्लंडविरुद्ध त्यांना गंभीरपणे खेळ करावा लागेल. जर या सामन्यातही त्यांना पराभव स्वीकारावा लागला तर स्पर्धेतून साखळीतच बाहेर पडण्याची नामुष्की त्यांच्यावर येईल.
बांगलादेशचा कर्णधार मोहम्मद अश्रफुल याबाबत म्हणाला की, हा सामना आमच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे, याची आम्हाला चांगलीच जाणीव आहे. त्यामुळे आम्ही विजयासाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊ.
अश्रफुलने सांगितले की, भारताविरुद्धच्या सामन्यामुळे आम्हाला उपयुक्त असा अनुभव मिळाला आहे. आम्ही खूप काही शिकलो आहोत. आम्ही भारताला चांगले उत्तर दिले, पण एखादी चांगली भागीदारी झाली असतील तर निकाल वेगळा लागू शकला असता. आमचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी बऱ्यापैकी झाली. त्यात सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न असेल. शिवाय, फलंदाजांनीही पुरेशा धावा करण्याची गरज आहे.
बांगलादेशचा सलामीवीर जुनैद सिद्दीकी याने २२ चेंडूत ४१ धावांची खेळी करून आपल्या फलंदाजीची छाप पाडली होती. अशी फलंदाजी इतर फलंदाजांकडूनही झाली तर बांगलादेशला या स्पर्धेत आशावाद बाळगता येणार आहे.