Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

क्रीडा

धोनी खुश हुआ!
ट्रेन्ट ब्रिज, ७ जून / पीटीआय

बांगलादेशविरुद्ध मिळविलेल्या सलामीच्या सामन्यातील विजयामुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी समाधानी आहे. संघाला जी सुरुवात अपेक्षित होती, तशीच ती झाल्याचे धोनीने सांगितले. पत्रकार परिषदेत धोनी म्हणाला, कोणत्याही स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि आम्ही तशी सुरुवात केली. धोनीने अशी कबुलीही दिली की, रोहित शर्मा व गौतम गंभीर या सलामीवीरांनी जी सुरुवात करून दिली, त्याचा फायदा नंतरच्या फलंदाजांना उठविता आला नाही.

सॅम्प्रसच्या विक्रमाशी फेडररची बरोबरी
फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर अखेर मोहोर

पॅरिस, ७ जून / वृत्तसंस्था

स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररचा यंदाच्या फ्रेंच ओपनमधील विजेतेपदाचा स्वप्नवत प्रवास आज अखेर सत्यात उतरला. सातत्याने गेली तीन वर्षे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरीची पायरी चढल्यानंतरही लाल मातीच्या कोर्टवरील असाध्य ठरलेले विजेतेपद अखेर चौथ्या वर्षी फेडररने सहजसाध्य करून दाखविले. हे विजेतेपद निव्वळ एक ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद नव्हते तर फेडररचे चारही ग्रॅण्डस्लॅमचे वर्तुळही यानिमित्ताने पूर्ण झाले. अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसने मिळविलेल्या १४ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाशीही फेडररने या विजेतेपदाने बरोबरी केली.

ऑस्ट्रेलियासाठी ‘कुछ कर दिखाना है’; आज श्रीलंकेशी झुंज
नॉटिंगहॅम, ७ जून / एएफपी

विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडच्या पावलावर पाऊल टाकत पहिल्याच सामन्यात पराभव पत्करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पेचात सापडला आहे. जागतिक क्रमवारीत आपला दबदबा निर्माण करणारा संघ ट्वेन्टी-२० स्पर्धेत साखळीतच गारद झाला तर ती नामुष्की त्यांना कायम छळत राहणार आहे. उद्या श्रीलंकेविरुद्ध साखळीतील त्यांची दुसरी लढत होत असून या लढतीत काहीही करून विजय मिळवायचाच, या जिद्दीने खेळण्याशिवाय त्यांच्यापाशी पर्याय नाही.ख्रिस गेलच्या तडाखेबंद ८८ धावांच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात सात विकेट्सनी पराभूत करीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

भारताची विजयी सुरुवात; बांगलादेशवर २५ धावांनी मात
ट्रेन्ट ब्रिज, ७ जून / पीटीआय

गतविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. बांगलादेशविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारताने २५ धावांनी विजय मिळविला. युवराजसिंगच्या १८ चेंडूंतील ४१ धावा व प्रज्ञान ओझाने घेतलेले चार बळी या कामगिरीच्या जोरावर भारताने ही लढत जिंकली.

आयर्लंडविरुद्ध बांगलादेशला हवा फक्त विजय!
नॉटिंगहॅम, ७ जून / एएफपी

भारताविरुद्ध सलामीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर आता बांगलादेशला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आयर्लंडला नमविण्याशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे आयर्लंडचा संघही विजयी सलामीसाठी उत्सुक असेल. भारताकडून बांगलादेशला २५ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. पण आता आयर्लंडविरुद्ध त्यांना गंभीरपणे खेळ करावा लागेल

काऊंटी क्रिकेट क्लबला जेतेपद
मुंबई, ७ जून/ क्री. प्र.

निखिल जाधव, ऐश्वर्य सुर्वे आणि धवल पांचाळच्या अचूक गोलंदाजीमुळे शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात डिप्लो स्पोर्टस् क्लबला काऊंटी क्रिकेट क्लबविरुद्ध ६ धावांनी पराभव पत्करावा लागला आणि इरा घोष स्मृतिचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या १९ वर्षाखालील मुलांचे जेतेपद काऊंटी क्रिकेट क्लबने संपादले. यापूर्वी झालेल्या १४ वर्षाखालील गटात पालघर-डहाणू संघाने, तर १६ वर्षाखालील गटात स्पोर्टिग युनियन क्लबने बाजी मारली होती.

दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय; स्कॉटलंड स्पर्धेतून बाहेर
लंडन, ७ जून / एपी

दक्षिण आफ्रिकेने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची चव चाखताना स्कॉटलंडला १३० धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे स्कॉटलंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले तर दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडचा अव्वल आठ फेरीतील प्रवेश निश्चित झाला. ए. बी. डिव्हिलियर्सने ३४ चेंडूंत केलेल्या ७९ धावांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेतील दोनशे धावा करणारा संघ म्हणून आपल्या नावाची नोंद केली. डिव्हिलियर्सच्या या ७९ धावांत सहा षटकारांचा समावेश होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने ५ बाद २११ धावा केल्या. जॅक कॅलिसने त्याला साथ देताना ४८ धावांची खेळी केली. स्कॉटलंडला मात्र हे आव्हान अजिबात पेलविले नाही. १३ धावांतच त्यांचे चार फलंदाज माघारी परतले. त्यानंतर १६व्या षटकात ८१ धावांवर त्यांचा डाव आटोपला. कायले कोट्झर (४२) व माजिद हक (१५) यांचा अपवाद वगळता स्कॉटलंड फलंदाजांनी शरणागती पत्करली. आता दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी लढत होणार आहे. मात्र ही लढत स्कॉटलंडच्या पराभवामुळे तशी निर्थक ठरणार आहे.

ओझाने यशाचे श्रेय दिले आयपीएलला
ट्रेन्ट ब्रिज, ७ जून/ वृत्तसंस्था

ट्वेन्टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत चार बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेल्या पज्ञान ओझा याने आपल्या कामगिरीचे श्रेय इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला दिले आहे. बांगला देशविरुद्ध शनिवारी झालेल्या लढतीत ओझा याने २१ धावांत चार बळी घेऊन भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ओझा म्हणाला की, पहिल्याच सामन्यात मला सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यामुळे मी साहजिकच आनंदी झालो आहे. मला जी जबाबदारी सोपविली होती ती मी प्रश्नमाणिकपणे पार पाडली. राष्ट्रीय संघात स्थान मिळविणे हे मोठे अवघड काम असते. एकदा का तुम्ही राष्ट्रीय संघात स्थान मिळवले की तुमच्यावर चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी आपोआप येऊन पडते. माझ्यावर आलेली जबाबदारी पार पाडण्यात मला यश आले, असे ओझा म्हणाला.

इंग्लंड ५ बाद १८५; पीटरसनचे अर्धशतक
ओव्हल, ७ जून / वृत्तसंस्था

नेदरलॅण्ड्सकडून पहिल्याच सामन्यात दारुण पराभव झालेल्या इंग्लंडच्या संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आश्वासक फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८५ धावापर्यंत मजल मारली. पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे गैरहजर असलेल्या पीटरसनला या सामन्यात संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने करताना ३८ चेंडूंत तीन षटकार व ५ चौकारांसह ५८ धावांची तडफदार खेळी साकारली. ल्युक राइटची १६ चेंडूंतील ६ चौकार व एका षटकारासह सजलेली ३४ धावांची खेळी, ओवेस शहाच्या ३३ धावा यामुळे इंग्लंडने हा पल्ला गाठला. पॉल कॉलिंगवूड (१५), मॅस्कारेन्हास (१६), फोस्टर (१४) यांचीही उपयुक्त साथ इंग्लंडला लाभली. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने मात्र खराब क्षेत्ररक्षणामुळे अवांतर धावांची भेट इंग्लंडला दिली. गोलंदाजीतही त्यांना अचूकता ठेवता आली नाही. पीटरसन मात्र आज चांगलाच फॉर्मात होता. रवी बोपारा ५ धावा काढून परतल्यानंतर पीटरसन व राइट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. ही भागीदारीच इंग्लंडला सावरणारी ठरली.

इंडेज ग्रुप अजिंक्य
मुंबई, ७ जून/ क्री.प्र.

सलामीवीर दीपक भोगलेने १३ चौकारांच्या सहाय्याने झळकाविलेल्या ९१ धावा त्याला विशाल दाभोळकर (१८ धावांत २ बळी), प्रथमेश पवार (२८ धावांत २ बळी) व गिरीश कोचरेकर (८ धावांत २ बळी) या फिरकी त्रिकुटाने दिलेली उत्तम साथ या जोरावरच इंडेज ग्रुपने एस. पी. ग्रुप क्रिकेट अ‍ॅकेडमी आयोजित व अलाईड डिजिटल स्पोर्टस् फाऊंडेशन पुरस्कृत, मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्रश्नप्त आंतरकार्यालयीन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बंगाल क्लब, शिवाजी पार्क येथील खेळपट्टीवरील अंतिम सामन्यात बलाढय़ अशा फ्यूचर ग्रुपचा ४ विकेटसनी पराभव करून त्यांनी विजेतेपदाचा चषक व रोख २५,०००/- रुपयांचे इनाम मिळविले. फ्यूचर ग्रुपने उपविजेतेपदाचा चषक व १५,०००/- रुपये तसेच उपांत्य फेरीत हरणाऱ्या मुंबई पोलीस व नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन संघांनी प्रत्येकी ७,५००/- रुपये पटकावले. संक्षिप्त धावफलक- फ्यूचर ग्रुप- सर्व गडी बाद १५४ धावा (अमित कदम ५३, विशाल दाभोळकर १८ धावांत २ बळी, प्रथमेश पवार २८ धावांत २ बळी, गिरीश कोचरेकर ८ धावांत २ बळी) पराभूत विरुद्ध इंडेज ग्रुप- ६ गडी बाद १५७ धावा (दीपक भोगले ९१, विशाल तावडे २६ धावांत २ बळी), सामनावीर- दीपक भोगले.