Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

व्यक्तिवेध

अंटाक्र्टिकावरील भारतीय संशोधक चमूमधील हवामान खात्याशी संबंधित ज्येष्ठ संशोधक, कुलदीप वाली यांचे १ जून रोजी अंटाक्र्टिकावरील मैत्री या भारतीय संशोधन तळावरच झालेले आकस्मिक निधन चटका लावणारे आहे. वाली हे या खात्यातले अनुभवी, जाणकार वरिष्ठ शास्त्रज्ञ. आणखी वर्षभराने ते निवृत्तच व्हायचे होते. पण या वयातही आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण ताकदीनिशी पार पाडायची, या निग्रहानेच नोव्हेंबर २००८ मध्ये ते अंटाक्र्टिकाच्या मोहिमेवर गेले होते. येत्या नोव्हेंबरमध्ये ते ही मोहीम संपवून परतही यायचे होते. वालींनी गोव्याचे नॅशनल सेंटर फॉर अंटाक्र्टिक अ‍ॅँड ओशन रिसर्चचे(एनसीएओआर) ऑफिस सोडले १७ नोव्हेंबरला. १८ नोव्हेंबरला ते मुंबईमार्गे केप टाऊनला गेले. तिथून २१

 

नोव्हेंबरला निघून २२ नोव्हेंबरला ते प्रत्यक्ष अंटाक्र्टिकावर पोचले. तेव्हापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे काम सुरूच होते. ५७ वर्षे पुरी होऊन त्यांनी ५८ व्या वर्षात पदार्पण केले तेव्हा १२ एप्रिल रोजी त्यांनी वाढदिवसही सहकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘मैत्री’वर थाटात साजरा केला होता. ३१ मे रोजी वेबकॅमवरून त्यांनी नवी दिल्लीतील आपल्या कुटुंबीयांशी संभाषणही केले होते. १ जूनला नवी दिल्लीतील त्यांच्या घरचे इंटरनेट कनेक्शन काम करीत नसल्याने त्यांनी मित्राकरवी निरोप पाठवून सारे काही आलबेल असल्याचे पत्नीला आणि मुलीला कळवले होते. दुर्दैवाने त्याच दिवशी रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले आणि साराच खेळ आटोपला. ‘मैत्री’ किंवा अंटाक्र्टिकावरील भारतीय संशोधन तळावर संशोधन चमूतील व्यक्तीचे निधन होण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे आणि भारताव्यतिरिक्त अन्य देशांच्या तळांवरही अशा प्रकारच्या घटना याआधी घडलेल्या नाहीत असेही नव्हे. १९८९-९० मध्ये कार्बन मोनॉक्साइडची विषबाधा झाल्याने भारतीय तुकडीतील चौघांना प्रश्नण गमवावे लागले होते. पण ती घटना समर एक्स्पीडिशनमधील होती. त्यामुळे खास विमान पाठवून त्यांची पार्थिवे भारतात आणणे शक्य झाले होते. तरीही त्याला तीन महिन्यांचा कालावधी लागला होता. यावेळची गोष्टच वेगळी आहे. विंटर एक्स्पीडिशन असल्याने अंटाक्र्टिकामध्ये सहा महिने रात्र आणि त्यातही कमालीची थंडी, बोचरे वारे अशा वातावरणात संशोधनाचे काम सुरू आहे. वाली काश्मिरी पंडित होत. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीनेच व्हावेत असे त्यांच्या पत्नीचे व मुलीचे म्हणणे होते. पण ५० किलोमीटरहून अधिक वेगाने वाहणारे वारे आणि उणे १५ ते २० अंश सेंटिग्रेड तापमान असल्याने हिंदू पद्धतीने दहन तरी कसे करायचे असा प्रश्न भारतीय चमूपुढे आहे. अंत्यविधी करणाऱ्या दिल्लीतील एखाद्या ब्राह्मणाला बोलावून त्याच्याकडून मार्गदर्शन घेत हे अंत्यविधी आता पार पाडले जाणार आहेत. त्याचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार असून ते वाली कुटुंबीयांसाठी पाठवले जाणार आहे अशी माहिती अर्थ सायन्सेस खात्याचे मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच वाली कुटुंबीयांना दिली आहे. वाली काश्मीरचे, त्यामुळे ‘रूट्स इन काश्मीर’ या काश्मिरी पंडितांच्या, त्यातही काश्मिरी युवकांच्या संघटनेने या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत भारत एका अभ्यासू, राष्ट्रभक्त शास्त्रज्ञाला मुकला असल्याचे म्हटले आहे. वाली मीटिऑरॉलॉजी खात्यात एक तज्ज्ञ अधिकारी म्हणून ज्ञात होते. ‘मैत्री’वर त्यांनी केलेले संशोधन आणि तिथल्या भावी मोहिमांसाठी त्यांनी नोंदवून ठेवलेली निरीक्षणे पुढील मोहिमांना मार्गदर्शक ठरतील अशी भावना नॅशनल सेंटर फॉर अंटाक्र्टिक अ‍ॅँड ओशन रिसर्चचे संचालक रसिक रवींद्र यांनी व्यक्त केली आहे.