Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया ‘ऑनलाईन’
अमरावती, ७ जून / प्रतिनिधी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानेही प्रवेश प्रक्रिया ‘ऑनलाईन’ करण्याचा निर्णय घेतला असून या नव्या व्यवस्थेमुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणत्याही ठिकाणाहून अर्ज सादर करता येणार आहेत. विद्यापीठाच्या oasis.mkcl.org/aupg या वेबसाईटवर प्रवेश अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला असून तो अर्ज भरून संबंधित विद्यार्थी त्याची प्रत आणि प्रवेश अर्जाच्या शुल्काचा डी.डी. विद्यापीठाला पाठवू शकणार आहे किंवा विद्यापीठातील खिडकीवरही रक्कम जमा करून विद्यार्थी सेवा केंद्रातील केंद्रीय प्रवेश समितीकडे प्रत्यक्ष सादर करू शकणार आहे. विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर अर्जाची पोचही मिळू शकेल.

रॉकेल वितरक नेमण्याच्या नावाखाली बेरोजगारांना गंडा
चंद्रपूर, ७ जून / प्रतिनिधी

रॉकेल विक्रीबाबत केंद्र शासनाचे धोरण अगदी स्पष्ट असताना मुंबईतील एका कंपनीने अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयातून मिळवलेल्या एका पत्राचा आधार घेत वितरक नेमण्याच्या नावाखाली राज्यभरातील बेरोजगारांची लाखो रुपयांनी फसवणूक करणे सुरू केले आहे. केंद्र शासन सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत देशभरात निळे रॉकेल उपलब्ध करून देते. या व्यवस्थेंतर्गत न येणाऱ्या ग्राहकांसाठी पांढऱ्या रॉकेलची सोय शासनाने केली आहे. या रॉकेलवर सबसिडी नाही. त्यामुळे खुल्या बाजारात असलेल्या दराने हे रॉकेल विकत घेता येते.

मेघे व शेंडेंकडून अपेक्षा वर्धेच्या औद्योगिक विकासाची
प्रशांत देशमुख
वर्धा, ७ जून

खासदार दत्ता मेघे व विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्याकडून वर्धा जिल्ह्य़ाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दत्ता मेघेंचे कार्यक्षेत्र लक्षात घेऊन केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा लाभ विदर्भातील काही जिल्ह्य़ांमध्ये नव्या उद्योगांची मुहुर्तमेढ रोवण्यास तर आजारी उद्योगांना चालना मिळण्यासाठी होऊ शकते, अशी उद्योग वर्तुळात चर्चा आहे. विकास कामांचा धडाका लावण्यात प्रमोद शेंडेंचे नाव काँग्रेस आमदारांमध्ये अग्रक्रमाने घेण्यात येते.

वैद्यकीय व्यवसायाचे कार्पोरेट मार्केटिंग
चंद्रकांत ढाकुलकर

नागपूरच नव्हे तर, विदर्भातील वैद्यकीय क्षेत्रात समृद्धीचा डांगोरा पिटणाऱ्या खाजगी रुग्णालयांमधून काय गोंधळ घातला जात आहे, यावर साधी नजर टाकली तर सारे काही लक्षात यावे. कोणत्याही शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, असे जुणे जाणते बजावत असत परंतु, आता कोणत्याही शहाण्या समजदार माणसानेच नव्हे तर, रुग्णाईतानेही या खाजगी रुग्णालयांची वाट धरू नये, असे म्हणावेसे वाटते. यातही या क्षेत्राचा गौरव वाढवणारे आणि दीपस्तंभासारखे दिशादिग्दर्शन करणारे काही सन्माननीय अपवाद नाहीतच, असे मात्र नाही पण, झगमगाटाच्या सावटात सापडलेले हेही क्षेत्र जुमानते कुणाला, असा प्रश्न आहे.

विकास कामांचा सपाटा
संजय राऊत

गोंदिया विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विकासाचा सपाटा लावला. नक्षलवाद ही या जिल्ह्य़ाला लागलेली कीड. यामुळे विकास कामात अडथळे येतात. पक्के रस्ते करण्यास नक्षलवाद्यांचा विरोध असतो. त्यावर आता काही प्रमाणात का होईना अंकुश लावण्यात प्रशासनाला यश लाभले आहे. आमदारांनी जिल्ह्य़ाला नक्षलवादग्रस्त घोषित करून शासकीय कर्मचाऱ्यांना १५ टक्के अतिरिक्त भत्ता शासनाकडून मंजूर करून घेतला. आमदार गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया जिल्ह्य़ाला रात्रीच्या भारनियमनापासून मुक्त केले. राज्य शासनातर्फे राबवली जाणारी ठक्कर बाप्पा योजना पूर्वी ठराविक ठिकाणीच होती पण, आमदार अग्रवाल यांनी संपूर्ण महाराष्ट्राकरिता ती अमलात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी गोंदिया बायपासकरिता केंद्र शासनाकडून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून आणला.

गोमाजी महाराज मंदिरावर १७ किलो सोन्याचा कळस
शेगाव , ७ जून /वार्ताहर
शेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र नागझरी येथील श्री संत गोमाजी महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व कलशस्थापना वसंत महाजन यांच्या हस्ते करण्यात आली.
२५० वषार्ंपूर्वीच्या या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून १०१ फूट उंच मंदिरावर १७ किलो वजनाचा सोन्याचा कळस बसवण्यात आला आहे. आता गोमाजी महाराज मंदिर आकर्षक दिसत आहे. संस्थानने पूर्वेकडील प्रवेशद्वार अतिशय भव्य स्वरूपात उभारले असून परिसर शोभिवंत झाला आहे. कलश स्थापनेनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान व गरुडाची स्थापना होऊन नागझरी या गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. होमहवनास २ जूनपासून सुरुवात झाली होती. महारुद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती व्यवस्थापक धनंजय पाटील व त्यांच्या पत्नीच्या उपस्थितीत ब्रह्मवृंदांनी केली. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

पुरंदरेंना विरोध करणाऱ्यांच्या बुद्धीचे दिवाळे - धोटे
यवतमाळ, ७ जून / वार्ताहर
इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांचा विरोध करणाऱ्यांना इतिहासच माहीत नसल्यामुळे ते विरोधासाठी विरोध करीत आहेत, अशी टीका माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांनी केली आहे.बाबासाहेब पुरंदरेंना ते ब्राह्मण आहेत म्हणून विरोध होत आहे, अशा विरोध करणाऱ्यांच्या बुद्धीचे दिवाळे निघाल्याची टीका धोटे यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषांना जातीय बंधनात अडकवू नये. मी स्वत: मराठा आहे पण, मला जातीयवाद अजिबात मान्य नाही. ब्राह्मणांचा विरोध करण्याची भूमिकाही आपल्याला मान्य नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.

रोहिणी कोरडय़ा, तापमानात वाढ!
मेहकर, ७ जून / वार्ताहर
रोहिणी नक्षत्रामध्ये पावसाचे आगमन न झाल्यामुळे वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत आहे. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला. यावेळी रोहिणीमध्ये जोरदार पाऊस होईल, अशी आशा शेतकरी वर्गाला होती. मात्र, २५ मे च्या रात्री मेहकर तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. तेव्हापासून ६ मे पर्यंत पावसाची सर सुद्धा आली नाही.
दरवर्षी ७ जूनला मृग नक्षत्राची सुरुवात होते. मात्र, यावेळी ८ जून रोजी सूर्याचा मृगनक्षत्रामध्ये प्रवेश होणार आहे. पावसाळ्याला खऱ्या अर्थाने सुरवात याच दिवशीपासून होते. मात्र, रोहिणी नक्षत्रामध्ये पाऊस न आल्यामुळे मान्सून पूर्व शेतीची कामे अर्धवट राहिली आहे.

आर्वीच्या विकासासाठी एक कोटी
आर्वी, ७ जून / वार्ताहर
शहरातील विकास कामांसाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नगरपालिकेला एक कोटींचा निधी मंजूर केला असून हा धनादेश चव्हाण यांनी नुकताच आमदार अमर काळे यांच्या सुपूर्द केला.आर्वी येथे मागील फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. राजीव गांधी स्टेडियमवर आमदार काळे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांचा सत्कार झाला होता.या सत्कारप्रसंगी बोलताना काळे यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या मतदारसंघातील विकास कामाची माहिती देतानाच या कार्यात निधी अभावी येणाऱ्या अडचणी तसेच शहराच्या बाबतीत असलेल्या समस्या मांडल्या होत्या.सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आर्वीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत शहराच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता नुकतीच त्यांनी केली असून एक कोटी रुपयांचा धनादेश मुंबई येथे अशोक चव्हाण यांनी अमर काळे यांना सुपूर्द केला.आर्वीच्या नगराध्यक्ष मिस्कीन, उपाध्यक्ष नागोराव लोढे, सर्व सभापती यांनी या निधीबद्दल मुख्यमंत्री व अमर काळे यांचे आभार मानले आहेत.

गव्हाचा साठा बेवारस आढळला
आकोट, ७ जून / वार्ताहर

आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीन शेडमध्ये ८६ पोते गव्हाचा साठा बेवारस असल्याचे पुरवठा विभागाच्या पथकाला आढळून आले.या गव्हाच्या पोत्याच्या मालकीचा दावा करण्यास कोणीही समोर न आल्याने त्याची बेवारस म्हणून नोंद करून जप्ती करण्यात आली.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीन शेड क्र. ३ मध्ये ८६ गव्हाची पोती पडून असल्याची माहिती समितीचे सचिव वानखडे यांनी तहसीलदार मोहन चव्हाण यांना दिली. रमेश कासट यांना अनुज्ञाप्तीवर हा साठा दिलेला असल्याने त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली मात्र, याबाबत आपणास काहीही कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या गव्हाच्या मालकाचा तपास न लागल्याने याची बेवारस म्हणून नोंद केली व माल तप्त करण्यात आला आहे.

शिवराय स्मारकाचे राजकारण नको -चंद्रशेखर गाडगीळ
अकोला, ७ जून / प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांचे स्मारक ही मराठी माणसासाठी अभिमानाची बाब असून, स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून राजकारण करण्यात येऊ नये, असे मत हिंदू सेना अध्यक्ष चंद्रशेखर गाडगीळ यांनी व्यक्त केले. शिवराय स्मारकाच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेले वादळ, अशोभनीय असल्याचे गाडगीळ यांनी म्हटले आहे.

संगणक चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
शेगाव, ७ जून / वार्ताहर
राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद विद्यालयातील संगणक चोरी प्रकरणात पोलिसांनी नीलेश खोंडसह ८ आरोपींना अटक केली असून ७ जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी तर एकाची जामिनावर सुटका करण्यात आली. येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद विद्यालयातील संगणक कक्षातून १ मेच्या रात्री चोरटय़ांनी २० हजार रुपयांचे संगणक व साहित्य लंपास केले होते. २ मे रोजी मुख्याध्यापक एस.डी. गणोरकार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी केली. एक महिन्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी आरोपींचा शोध लावून ८ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार नीलेश खोंडसह लोकेश तायडे, पकंज लिप्ते, लखन देशमुख, मनोज पहुरकर, शिवाजी डिवरे, श्रीकांत शेळके या आठ आरोपींना पोलिसांनी अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता यातील सात जणांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यातील श्रीकांत शेळके याला न्यायाधीशांनी जामीन मंजूर केला, तर या चोरी प्रकरणातील तिघे फरार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक
बुलढाणा, ७ जून / प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पाश्र्वभूमीवर विभागीय संघटक लोखंडकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश सानप, मदन गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाली. प्रास्ताविक मनसेचे जिल्हा सरचिटणीस देवेंद्र खोत यांनी केले. यावेळी शैलेश गोंधणे, गणेश देहाडे, अ‍ॅड. अजय काळे यांची भाषणे झालीत. या प्रसंगी विठ्ठल लोखंडकर यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे महाराष्ट्राचे चित्र संपूर्णपणे बदलणार असल्याचा दावा केला.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मंगेश मंगळे, राजेश परिहार, अशोक काजळे, पंडितराव सपकाळ, राज तिवारी, सरदार शहा, बंडू बरबडे, आलमशहा, पंकज पाटील, अनिल पव्हणे, संजय तोटे, आत्माराम सोनुने, तुषार बोंद्रे, पराग गुजर, देवेंद्र खोत, शैलेश कापसे व अ‍ॅड. विनोद तायडे उपस्थित होते.

बुलढाणा जिल्ह्य़ात हिवताप प्रतिरोध मोहीम
बुलढाणा, ७ जून / प्रतिनिधी
राज्यात हिवताप प्रतिरोध मोहीम राबवली जात असून यामध्ये नागरिकांना कीटकजन्य रोगाबाबत सविस्तर माहिती देऊन रोगापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती दिली जात आहे. शासनाच्या उपाययोजनेसोबतच नागरिकांनी स्वत: काळजी घेतल्यास निश्चितच कीटकजन्य रोगापासून बचाव करता येईल. त्यामध्ये घरासभोवताल नाल्या, डबके साचू न देता वाहते करणे, ताप आल्यास शासकीय रुग्णालयात रक्त नमुन्याची तपासणी करून घेणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, अंगभर बाह्य़ांचे कपडे घालणे, घरांच्या छतावर असलेल्या प्लास्टिकच्या शिशा, करवंटय़ा, टायर्स इत्यादींचा नायनाट करणे, संडासच्या व्हॅट पाईपांना बारीक जाळ्या बसवणे, घरातील साठवलेले पाण्याचे साठे दर आठवडय़ाला रिकामे करून घासून पुसून कोरडे करणे आवश्यक असल्याचे कळवण्यात आले आहे.

लघुसिंचन विभागाची वाहने झाली भंगार
नरखेड, ७ जून / वार्ताहर
येथील लघुसिंचन उपविभागाची कोटय़वधी रुपयाची वाहने भंगार झाली असून अनेक वर्षांंपासून ती निकामी आहेत. ही वाहने लिलावात काढण्यात आली नाही. नरखेड तालुका लघुसिंचन उपविभागात १९८५ पासून असलेले २ रोड रोलर, ३ ट्रक, २ टँकर, १ पाणी टँकर मागील काही वर्षांंपासून भंगार अवस्थेत पडलेले असून त्यांच्यावर असणारे वाहन क्रमांकही दिसेनासे झाले आहेत. उपविभागाची जीपसुद्धा काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. एकूण चार चालकांपैकी २ काटोल तर २ नरखेड कार्यालयातून पगार मात्र उपलब्ध आहेत.

नगरपालिकेवर पाण्यासाठी मोर्चा
खामगाव, ७ जून / वार्ताहर

पाणी टंचाई समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी बाळापूर फैल आणि केला नगर भागातील महिलांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. यावेळी संतप्त नागरिकांनी प्रशासना विरोधात निदर्शने केली. यावेळी नगरसेवक पप्पू शहाणे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व आश्वासन दिले.