Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया ‘ऑनलाईन’
अमरावती, ७ जून / प्रतिनिधी

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानेही प्रवेश प्रक्रिया ‘ऑनलाईन’ करण्याचा निर्णय घेतला असून या नव्या व्यवस्थेमुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणत्याही ठिकाणाहून अर्ज सादर करता येणार आहेत.
विद्यापीठाच्या oasis.mkcl.org/aupg या वेबसाईटवर प्रवेश अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला असून तो अर्ज भरून संबंधित विद्यार्थी त्याची प्रत आणि प्रवेश अर्जाच्या शुल्काचा डी.डी. विद्यापीठाला पाठवू शकणार आहे किंवा विद्यापीठातील खिडकीवरही रक्कम जमा करून विद्यार्थी सेवा केंद्रातील केंद्रीय प्रवेश समितीकडे प्रत्यक्ष सादर करू शकणार आहे. विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर अर्जाची पोचही मिळू शकेल.
प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी होऊन त्यातून तात्पुरती प्रावीण्य यादी तयार केली जाईल. या यादीवर कुणाचा आक्षेप असेल, त्याला दिलेल्या मुदतीत केंद्रीय प्रवेश समितीकडे लेखी आक्षेप नोंदवता येणार आहेत. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दिलेल्या तारखेला विद्यार्थ्यांना काऊन्सलिंग व प्रवेशासाठी विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण भवनात उपस्थित राहावे लागेल. त्यावेळी आवश्यक सर्व प्रमाणपत्रे आणि प्रवेश शुल्क विद्यार्थ्यांना भरावे लागेल. प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांच्या पडताळणीनंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची निश्चिती केली जाणार आहे. ‘ऑनलाईन’ अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी कल्याण भवनात मोफत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. प्रक्रिया बिनचूक आणि विद्यार्थ्यांना हाताळण्याजोगी व्हावी यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची (एमकेसीएल) मदत घेण्यात आली आहे.
विद्यापीठात उद्या, ८ जूनपासून प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना कोणत्याही ठिकाणाहून अर्ज भरणे सोयीचे व्हावे यासाठी कुलगुरू डॉ. कमल सिंह आणि व्यवस्थापन परिषदेच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय प्रवेश समिती काम पाहत असून विद्यापीठात एम.एस.सी. साठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, गणित, संख्याशास्त्र, संगणकशास्त्र, भूगर्भशास्त्र, उपयोजित परमाणूशास्त्र, गृहविज्ञान, जीवतंत्रज्ञानशास्त्र, शिक्षणशास्त्र, एम.एल.एम., पी.जी.डी.सी.एस., बी.एल.आय.एस.सी., एम.एल.आय.एस.सी., पीजी ईन ह्य़ूमन रिसोर्स तसेच एम. ए. भाग १ च्या मराठी, समाजशास्त्र, फंक्शनल हिंदी, फंक्शनल इंग्रजी, गणित, भूगर्भशास्त्र, संख्याशास्त्र, उपयोजित परमाणू, मराठी, समाजशास्त्र, हिंदी या विषयातील प्रवेशाकरिता विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी डॉ. मनोज तायडे ९३७०१५३२७० आणि प्रशांत ठाकरे ९८२२२२२८२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्या वतीने कळवण्यात आले आहे.