Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मेघे व शेंडेंकडून अपेक्षा वर्धेच्या औद्योगिक विकासाची
प्रशांत देशमुख
वर्धा, ७ जून

 

खासदार दत्ता मेघे व विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्याकडून वर्धा जिल्ह्य़ाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दत्ता मेघेंचे कार्यक्षेत्र लक्षात घेऊन केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा लाभ विदर्भातील काही जिल्ह्य़ांमध्ये नव्या उद्योगांची मुहुर्तमेढ रोवण्यास तर आजारी उद्योगांना चालना मिळण्यासाठी होऊ शकते, अशी उद्योग वर्तुळात चर्चा आहे.
विकास कामांचा धडाका लावण्यात प्रमोद शेंडेंचे नाव काँग्रेस आमदारांमध्ये अग्रक्रमाने घेण्यात येते. माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांचे शिष्य प्रमोद शेंडे हे साठेंच्या राजकीय अज्ञातवासानंतर काहीसे एकाकी पडले होते. साठेंच्याच काळात शेंडेंनी वर्धेत पोलाद कारखाना, उड्डाणपूल, रेल्वे थांबे व अन्य भरीव कामे करवून घेतल्याचे आजही निदर्शनास आणले जाते. साठेंनी वर्धा सोडल्यानंतर शेंडेविरोधक प्रभा राव यांचा प्रभाव एवढा की शेंडेंना पात्र असूनही दोन टर्ममध्ये मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले.
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रमोद शेंडेंची अवस्था तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी जाणली. त्यांना विधानसभेचे उपसभापतीपद देऊन लाल दिवा प्रदान केला. देशमुखांच्या पहिल्या टर्ममध्ये ‘माझ्या जिल्ह्य़ात मंत्रीपद नको’ असा पवित्रा घेत शेंडेंना मंत्रिपदापासून दूर करणाऱ्या प्रभा राव यांनी देशमुखांच्या दुसऱ्या टर्ममध्ये स्वत:चे भाचे रणजित कांबळेंसाठी मंत्रीपद मिळवून शेंडेंना पुन्हा लालदिव्यापासून दूर ठेवले.
यावेळी पुन्हा मुख्यमंत्री देशमुखांनी शेंडेंची प्रतिष्ठा कायम ठेवली. प्रभा रावविरोधाचा हा समान धागा देशमुख-शेंडे मैत्री घट्ट करणारा ठरला. देशमुखांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शेंडेंचा प्रशासनावरील धाक सर्वपरिचित होता. आताही मुख्यमंत्री अशोक चव्हाण शेंडेंचा शब्द पाळत असल्याच्या काही घटना जनतेने पाहिल्या. म्हणूनच शेंडेंनी राजकीय वजन व मैत्री पणाला लावून औद्योगिक विकासात मागासलेल्या वर्धा जिल्ह्य़ात देशमुखांच्या मार्फ त उद्योग सुरू करावे, अशी जनतेची अपेक्षा दिसून येते.
अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनाच राजकीय पुनर्प्रतिष्ठापनेचे श्रेय देणारे खासदार दत्ता मेघे यांच्याकडूनही अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँॅग्रेस व पवारांची सोबत सोडल्यानंतर दोन वर्ष विश्रांती घेणाऱ्या मेघेंनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना पक्षात आणण्याचे श्रेय त्यावेळी मुख्यमंत्री देशमुखांना दिले गेले. त्यांच्याच उपस्थितीत नागपूरला झालेल्या पक्षप्रवेश सोहोळयात मेघेंची त्यांनी केलेली भरभरून प्रशंसा हे त्याचेच गमक मानले गेले. आमदार सागर मेघे यांनीही त्यांचा आमदारकीचा राजीनामा देशमुखांकडेच प्रथम सुपूर्द केला होता.
वर्धा लोकसभा मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी मिळण्यास प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांचा अडसर असल्याचे दोन महिन्यापूर्वीचे वातावरण होते. दिल्लीतील प्रभाव चारुलता टोकस यांना तारून नेणार, अशी शेवटच्या क्षणापर्यंत चर्चाही राहिली. मात्र अशा अनिश्चिततेच्या काळातही दत्ता मेघे मतदारसंघात भेटीगाठी घेऊ लागले. पक्षनेते विलासराव देशमुख यांनीच ‘उमेदवारी पक्की’ असून प्रचाराला लागा, असे सांगितल्याचे दत्ता मेघे बोलत. तेच खरे ठरले. दत्ता मेघे खासदार झाले. अन् त्यांचे ‘गॉडफ फॅदर’ विलासराव देशमुख केंद्रात मंत्री झाले. खासदार दत्ता मेघे व आमदार प्रमोद शेंडे यांना लोकसंपर्क व विकास कामे जिव्हाल्याची वाटतात, अशी भावना व्यक्त करणारे या दोघांकडूनच जिल्ह्य़ाचा यापुढे कायापालट होण्याबाबत आशावादी आहेत.
वर्धा जिल्ह्य़ाची ओळख गांधी जिल्हा अशी आहे. वन व पाणी संपदा मुबलक, शांत वातावरण, कुशल मनुष्यबळ हे या जिल्ह्य़ाचे संचित आहे. निसर्गाच्या प्रकोपास कधीही सामोरे न गेलेल्या वर्धा जिल्ह्य़ात बेरोजगारी ही गंभीर समस्या आहे. शून्यवत कारखानदारी, आजारी अवस्थेतील सहकारी गिरण्या, कारखाने, लहान उद्योग ठप्प असल्यामुळे सर्वागीण विकासाचे मार्गच बंद पडले आहेत. पर्यावरणप्रेमी गांधीविचाराच्या अधिष्ठानामुळे जवळजवळ १०० प्रकारचे उद्योग कें द्र-राज्य पातळीवर नाकारले जातात. मात्र पोलाद व तत्सम उद्योगांचा विकास होऊ शकतो, हे वास्तव आहे. खुद्द दत्ता मेघेंनी त्यांच्या स्वतंत्र जाहीरनाम्यात औद्योगिक विकास करण्याचा कार्यक्रम अग्रभागी ठेवला आहे. कृषीमालावर आधारित उद्योगांचा विकासही होऊ शकतो. या बाबी आता मेघे-शेंडेंनी ध्यानात ठेवून ‘अवजड’ मंत्रालय हलवायला मागे पाहू नये. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक डोळयापुढे ठेवून तरी एखाद्या केंद्रीय प्रकल्पाचा आरंभ वर्धेत होईल, अशी वर्धेकरांची अपेक्षा भाबडी ठरू नये.