Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वैद्यकीय व्यवसायाचे कार्पोरेट मार्केटिंग
चंद्रकांत ढाकुलकर

 

नागपूरच नव्हे तर, विदर्भातील वैद्यकीय क्षेत्रात समृद्धीचा डांगोरा पिटणाऱ्या खाजगी रुग्णालयांमधून काय गोंधळ घातला जात आहे, यावर साधी नजर टाकली तर सारे काही लक्षात यावे. कोणत्याही शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, असे जुणे जाणते बजावत असत परंतु, आता कोणत्याही शहाण्या समजदार माणसानेच नव्हे तर, रुग्णाईतानेही या खाजगी रुग्णालयांची वाट धरू नये, असे म्हणावेसे वाटते. यातही या क्षेत्राचा गौरव वाढवणारे आणि दीपस्तंभासारखे दिशादिग्दर्शन करणारे काही सन्माननीय अपवाद नाहीतच, असे मात्र नाही पण, झगमगाटाच्या सावटात सापडलेले हेही क्षेत्र जुमानते कुणाला, असा प्रश्न आहे.
सरकारी आणि सहकारी तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांमधून तेथे मानद सेवा देणारे काही डॉक्टर्स रुग्णांना बाहेर लागेबांधे असलेल्या खाजगी रुग्णालयांकडे पिटाळत असत. ही बाब तशी आता जुनी झाली आहे पण, जसा जसा या खाजगी रुग्णालयांना ‘ऑल इन वन रूफ’च्या नावाखाली कार्पोरेट लूक येत गेला तस तसे या क्षेत्रातील मार्केटिंगसुद्धा वाढले आणि आताशा तर सरकारी रुग्णालयांमधून रुग्ण पळवण्यासाठी एजंट्स पेरण्यात आले असल्याची बाब काही घटनांवरून दिसून आली आहे. पंधरवडय़ापूर्वी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गंभीर अवस्थेतील रुग्ण बरा होत आलेला असतानाही रुग्णाच्या नातेवाईकांनी एकाएकी रुग्ण खाजगी रुग्णालयात हलवण्याची जी घाईगर्दी केली, त्यावरून तर ही बाब स्पष्टच झाली. त्या युनिटच्या डॉक्टरने हा बरा होत असलेला रुग्ण जाऊ देण्यास हरकत घेतल्यानंतर हा गोंधळ वाढलेला होता. रुग्णांकडून भरमसाट पैसा उकळणाऱ्या या खाजगी रुग्णालयांमधील निष्काळजीपणामुळे चालत गेलेला रुग्ण थेट तिरडीवरच न्यावा लागल्याची उदाहरणेही काही कमी नाहीत. काही रुग्णालयांविषयी हे अगदी उघडपणे बोलले जावे, हे सामान्य माणसांच्या उरात धडकी भरवणारे जसे आहे तसाच हा निष्काळजीपणा एका जीवाशी का केला जावा, हेही न कळण्यापलीकडचे आहे. काही दिवसांपूर्वीच मेंदूविकारामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला मेंदूविषयक चाचणीकरिता तातडीने पाठवण्यात आले. अशा वेळी संबंधित रुग्णालयाचे डॉक्टर्स या चाचणी केंद्रांना तशी अगाऊ सूचनाही देत असतात पण, फार तर तासाभरात आटोपणाऱ्या चाचणीसाठी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना सात-आठ तास ताटकळत ठेवण्यात आले. अखेर या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना धारेवर धरल्यावर मात्र तासाभरातच ही चाचणी आटोपली पण, दरम्यानच्या काळात जर रुग्णाचे बरेवाईट झाले असते तर काय, हा प्रश्न तसा अनुत्तरितच राहतो. अखेर या चाचणी केंद्राकडे पुन्हा म्हणून रुग्णाला पाठवायचेच नाही, असा निर्णय त्या रुग्णालयाने घेतला. हे एकापरी बरेच झाले म्हणावे. रुग्णाला ऑपरेशन टेबलवर घेतल्यावर त्याच्या नातेवाईकांची पैशासाठी अडवणूक करण्याचे आणि बोला, ऑपरेशन पूर्ण करू की नाही, असा निर्वाणीचा प्रश्न विचारून त्यांचाही जीव टांगणीला लावण्याचे प्रकार घडलेलेच आहेत. नॉर्मल डिलिव्हरी होत असतानाही सिझेरियन आटोपल्याच्या घटनाही काही नवीन नाहीत. कुटुंब कल्याणाच्या नावाखाली झालेल्या शिबिरांमधून शस्त्रक्रिया झालेल्यांना पुन्हा प्रेग्नंसी राहिल्याची आणि अशा शिबिरांमधून रुग्णसंख्येची उद्दिष्टय़े गाठण्यासाठी अविवाहितांचीही नसबंदी करण्यात आल्याची उदाहरणे पायलीला पन्नास सापडतील.
नोबेल प्रोफेशन म्हणून नावलौकिक लाभलेल्या या क्षेत्रात काही धन्वंतरींनी खरोखरच या नावलौकिकात त्यांच्या सेवाभावीवृत्तीमुळे आणि वैद्यकीय ज्ञानामुळे भरच घातलेली आहे. अशा ऋषीतुल्य धन्वंतरींना या क्षेत्रात आलेला पैसा आणि पैशासाठी रुग्णांची होणारी हेळसांड चीड आणणारी वाटते, हे अशाचमुळे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात असलेली फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच आता स्पेशालिटी आणि सुपर सुपर स्पेशालिटीच्या धबडग्यात मोडीत निघाली आहे पण, पिढय़ान् पिढय़ांचा या फॅमिली डॉक्टरशी असलेला सुसंवादही काळाआड लोप पावला. या सुसंवादातून या फॅमिली डॉक्टरला एकेका घराण्याच्या प्रकृतीची नसन्नस माहिती असायची. आता म्हणूनच डॉक्टर्स आणि रुग्णांमधील विसंवादच तेवढा वेळोवेळी उजागर होताना दिसतो.
खाजगी रुग्णालयांच्या रॅकेटिंगचे नेटवर्क केवळ सरकारी रुग्णालयांपासून तर पॅथॉलॉजी व मेडिकल शॉपपर्यंतच मर्यादित राहिलेले नसून त्यांचे एजंट्स साऱ्या विदर्भातील शहरांमधून तेथील डॉक्टर्सकडून रुग्ण कमिशन बेसीसवर खेचून आणण्याचेही नेटवर्क अस्तित्वात आले आहे. थेट मध्यप्रदेश, छत्तीसगडपर्यंत हे जाळे पसरलेले आहे. असे नसते तर नागपूर-विदर्भातील काहीच डॉक्टरांची नावे थेट नर्मदा तीरावरील गावापासून तर अन्य लहानसहान गावांपर्यंत कसे माहीत झाले असते, हा प्रश्नच आहे. केवळ वैद्यकीय ज्ञानाच्या भरवशावर हा नावलौकिक त्यांनी मिळवला असे एक वेळ मान्य केले, तरी या नेटवर्क मार्केटिंगचाही त्यात वाटा आहेच. काही वर्षांपूर्वी डॉ. गोविंद वर्मा यांनी पत्रपरिषद घेऊन अशाच रॅकेटिंगला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता. हार्टचे कोणतेही दुखणे नसलेल्या रुग्णावर चक्क ओपनहार्ट सर्जरी आटोपण्यात आलेली होती. तीन वर्षांनंतर दुसऱ्या डॉक्टरकडे चेकअप करताना अशी सर्जरीच झालेली नाही, असे त्याने रुग्णाला सांगितल्यावर त्याचे हार्ट धडधडू लागले होते. कारण, त्या सर्जरीसाठी त्याला साडे तीन लाखाने चुना लावण्यात आलेला होता. मी केलेले आरोप खोडून काढण्यास कुणी पुढे आल्यास मी ते स्वीकारण्यास समर्थ आहे, असेही डॉ. गोविंद वर्मा यांनी ठासून सांगितले होते पण, खरोखरच या क्षेत्रातील कुणीही ते आरोप खोडून काढल्याचे अद्याप आठवत नाही. जीवातला जीव आणि स्वत:चाही जीव रुग्ण डॉक्टरच्या हाती सोपवताना जर असे अनुभव येत असतील तर परस्परांतील विश्वासार्हतेच्याच मूळाला हरताळ फासला जात आहे, असे म्हणावे लागेल. या परस्परातील विश्वासावरच तर मानवी नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्टपणे टिकून आहेत. त्याला तडा जाऊ द्यायचा का, असा हा कळीचा प्रश्न आहे. याच क्षेत्रातील वेगवेगळ्या स्पेशालिटीमधील डॉक्टर्स काही अन्य अशा डॉक्टरांच्या रॅकेटिंगचे पाढे खासगीत वाचतात पण, फ्रॅटर्निटीला तडा जाऊ नये म्हणून तेही उघडपणे पुढे येऊ इच्छित नाही, हाही मोठा अडथळाच म्हणावा लागेल. रुग्णाच्या वैद्यकीय अज्ञानामुळे तो मात्र वाट्टेल तसा उभा आडवा कापलाच जात राहणार काय, या प्रश्नाचे उत्तर कुणीतरी दिले पाहिजे. डॉक्टरांवरील अन्यायाला पायबंद घालण्यासाठी कायदा आता पुढे आला आहे परंतु, त्याची ढाल पुढे करून रुग्णांची लूटमार जोम धरेल की, ओसरेल हाही प्रश्नच आहे. निर्ढावलेल्यांना शहाणपणा लवकर येत नाही म्हणतात. अकोल्याच्या रुग्णालयातील मूल बदलण्याचे प्रकरण अशाच निर्ढावलेपणातून घडले आहे. बळी गेला तो ज्युनिअर डॉक्टरांचा. त्यांच्या भविष्यावरच धब्बा लागल्यासारखे झाले आहे. हे कुठेतरी, कुणीतरी याच क्षेत्रातील धुरिणाने थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा, म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण, काळ सोकावणार.