Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बनावट बियाण्यांच्या कारखान्यावर छापा
भंडारा, ७ जून / वार्ताहर

 

लाखांदूर तालुक्यातील इटान येथे बनावट धान बियाणे तयार करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या प्रदीप मेश्राम यांच्या कामाच्या ठिकाणी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी अनिल संतोषवार आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला.
याबाबत कृषी विस्तार अधिकारी झलके यांनी तक्रार केली होती, पथकाने बियाणे भरलेल्या एक हजार बॅग जप्त केल्या असून मेश्राम यांची चौकशी करण्यात येत आहे.
विरली खुर्द येथील प्रदीप मेश्राम इटान येथे किशोर बनपूरकर यांच्या इमारतीत शेतकऱ्यांकडून आरपीएम वाणाची धान खरेदी करून जागृती सीड्स प्रा. लिमिटेड या नावाने सुपर आरपी संशोधित वाण म्हणून कोणतीही प्रक्रिया न करता बियाणे विक्री करीत होता. कंपनीच्या बनावट बॅगमध्ये सीलबंद करून हे बियाणे संपूर्ण तालुक्यात, गोंदिया जिल्ह्य़ातील अर्जुनी मोरगाव आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील वडसा येथे विविध कृषी केंद्रातून हे बोगस बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होते. यात १२ किलोच्या एका बॅगला ५७० रुपये प्रमाणे खुलेआम बोगस बियाण्यांची विक्री सुरू होती परंतु, स्थानिक प्रशासन आणि कृषी विभागाचे मात्र, याकडे दुर्लक्ष होते. यामध्ये काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बनावट बियाणे तयार करण्याच्या कामासाठी १० ते १५ किमी अंतरावरून ५०-६० महिला मजुरांना ट्रॅक्सने आणण्यात येत होते. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाची साफसफाई करून मशीनने सीलबंद केले जायचे.
प्रदीप मेश्राम हे आधी एका बियाणे कंपनीत विक्री प्रतिनिधी होते. त्यामुळे गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्य़ातील कृषी केंद्राच्या संचालकांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत नोकरी गेल्यावर हा व्यवसाय सुरू केला. या कंपनीचे मुख्य कार्यालय चिटणीसनगर येथे असल्याचे पाकिटावर नमूद केले आहे. मात्र, या नावाची बियाणे कंपनी असल्याचे ऐकिवात नाही, असे शेतकरी व कृषी केंद्राच्या संचालकांनी सांगितले.
इटान येथे १५ दिवसांपासून बियाणे तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, बियाण्यांचे वितरण रात्रीच होत असल्याने या बियाण्यांबाबत गावकऱ्यांतही संभ्रम होता. प्रशासन सुस्त असल्याने बोगस बियाण्यांच्या कंपन्याकडून फसवणूक केली जात असून प्रदीप मेश्राम यांनी आतापर्यंत लाखांचे बियाणे विकले आहे.
कृषी विस्तार अधिकारी झलके यांच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने आज छापा टाकला. यासंदर्भात प्रदीप मेश्राम यांची चौकशी करण्यात येत असून नागपूर येथील पथक येणार असल्याची माहिती आहे.