Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सेंदुरवाफाचा रानतलाव फुटण्याचा धोका
साकोली, जून / वार्ताहर

 

सेंदुरवाफा येथील माजी मालगुजारी तलाव (रानतलाव) मागील कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. या तलावातील गेटजवळ मोठा खड्डा पडला असून याची तक्रार गावकरी व पाणीवाटप समितीने लघुपाटबंधारे विभागाकडे केली आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हा तलाव फुटण्याची भीती व्यक्त होत आहे. या तलावापासून पाचशे हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होते.
सेंदुरवाफा येथील माजी मालगुजारी तलाव बराच जुना असून या तलावाला रानतलाव म्हणूनही ओळखले जाते.
शासन निर्णयाप्रमाणे सर्वच माजी मालगुजारी तलावांची देखरेख लघुपाटबंधारे विभागाकडे आहे. त्यामुळे सेंदुरवाफा येथील या रानतलावाची देखरेख लघुपाटबंधारे विभाग साकोलीकडे आहे. या तलावाचे क्षेत्रफळ मोठे असून या तलावाची पाणी साठवण क्षमता जास्त आहे.
तलाव जंगल परिसराला लागून असल्यामुळे या तलावात चहूबाजूने पाणी जमा होते. या तलावापासून सेंदुरवाफा, पाथरी, गडकुंभली या गावातील जवळपास ५०० हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय होते. अशा या शेतीउपयोगी तलावाकडे लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष करीत आहे.
या तलावातील अस्तित्वात असलेल्या गेटजवळ अंदाजे २५ फूट खोल खड्डा पडला आहे. हा खड्डा त्वरित बुजविण्यात यावा, यासाठी गावकऱ्यातर्फे व पाणी वाटप समितीतर्फे मागील दोन वर्षांपासून लघुपाटबंधारे कार्यालयाला लेखी कळविण्यात आले आहे. मात्र, या विभागातर्फे तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. पीक वाया जाऊ नये म्हणून मागील वर्षी गावकरी व पाणी वाटप समितीने श्रमदान करून सिमेंटच्या पोत्यामध्ये वाळू टाकून हा खड्डा बुजविला. हा खड्डा पुन्हा खोल झाला असून यावर्षीच्या पावसामुळे तो फुटू शकतो. त्यामुळे गेटची नासधूस होऊ शकते. त्यामुळे गेटवर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाऊ शकतो.
उन्हाळ्यात तलावात पाणीच शिल्लक राहणार नाही. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो व शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येऊ शकते. पाणी वाटप समितीचे अध्यक्ष पंढरीबापू कापगते व अन्य सदस्यांनी यावर्षीही साकोलीच्या लघुपाटबंधारे विभागाकडे तक्रार केली आहे.
लाखांदूर मार्गावर असलेल्या लघुपाटबंधारे कार्यालयातील अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार आहे. कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची वेळीच दखल न घेतल्यास मोठा धोका उद्भ़वण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.