Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भूमिगत बंधाऱ्याची भिंत कोसळली
भंडारा, ७ जून / वार्ताहर

 

भारत निर्माण योजनेंतर्गत पालांदूर येथे उभारण्यात आलेल्या भूमिगत बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या बंधाऱ्याची भिंत कोसळल्याचा आरोप ग्रामपंचायत दक्षता समितीचे अध्यक्ष केवलराम वैरागडे यांनी केला आहे.
बांधकाम यंत्रणेच्या निकृष्ट बांधकामामुळेच बंधाऱ्याची भिंत कोसळली. त्यामुळे पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा आरोप वैरागडे यांनी केला आहे. कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे त्यांनी निवेदन सादर करून चौकशीची मागणी केली आहे.
भारत निर्माण योजनेंतर्गत लोकसहभागातून १ कोटी २४ लक्ष ७ हजार रुपये खर्चाची नळयोजना साकारण्यात आली. या नळयोजनेंतर्गत ४ किलोमीटर अंतरावरील वाकल (टोला) येथील चुलबंद नदीवर पाणी साठविणारी विहीर तयार करण्यात आली.
विहिरीत झऱ्याद्वारे पाणी येण्यासाठी ४३ लक्ष रुपये बांधकाम खर्चाची १३० मीटर लांबीची भूमिगत बंधाऱ्याची भिंत बांधण्यात आली. स्थानिक ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छता पाणीपुरवठा समितीच्या दुर्लक्षितपणा व बांधकाम यंत्रणेच्या निकृष्ट बांधकामामुळे १३० मीटर लांबीच्या भिंतीपैकी १० मीटर लांब भिंत अल्पावधीतच कोसळली. परिणामी विहिरीत पाण्याचा अपुरा साठा राहत असल्याने पालांदूर येथे पिण्याच्या पाण्याची कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
४३ लक्ष रुपये खर्चून बांधलेल्या चेतन बंधाऱ्याच्या भिंतीची खोली ४ मीटर असायला पाहिजे; परंतु ग्रामपंचायत समितीचे अध्यक्ष केवळराम वैरागडे यांनी या भिंतीची खोली २ मीटरच असल्याचा आरोप केला आहे. भिंतीसाठी साहित्य कमी प्रमाणात वापरण्यात आल्याने कामाचा दर्जा निकृष्ट आहे. परिणामी १३० मीटरपैकी १० मीटर लांब भिंत अल्पावधीतच कोसळली. विहिरीत झऱ्याद्वारे पाणी कमी साठवले जाऊन या नळयोजनेचा पाण्याचा स्रोत कमी होऊन पालांदूरच्या जनतेला पाणीपुरवठा कमी केला जात आहे, असा आरोप वैरागडे यांनी केला आहे.