Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नोकरशाही देशाच्या विकासातील मुख्य अडथळा -शंकर सांगळे
पुसद, ७ जून / वार्ताहर

 

मंत्री निर्णय घेतात आणि नोकरशाही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे या देशातील नोकरशाही देशाच्या विकासाच्या मार्गात असलेला मुख्य अडथळा होय, असे प्रतिपादन ‘एम फुक्टा’चे उपाध्यक्ष आणि नुटा चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्राचार्य शंकर सांगळे यांनी केले.
वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयात ‘नुटा’ पदाधिकाऱ्यांच्या सभेत ते बोलत होते. नुटातर्फे उभारण्यात आलेल्या नऊ कलमी आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून ही सभा घेण्यात आली होती. नेट/सेट विद्यापीठ अनुदान आयोगाने सुचवलेल्या शिफारसीसहित लागू करावी, सहाव्या वेतन आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि ‘एम.फुक्टो’च्या मंडळाला वाटाघाटीसाठी बोलावण्यात यावे, अशा या तिसऱ्या टप्प्याच्या आंदोलनातील प्रमुख मागण्या आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा नुटाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश पाटील होते. याप्रसंगी विजयराव देशमुख, डॉ. सी.जी. महाजन, डॉ. विवेक देशमुख, प्राचार्य डॉ. संजीव मोटके उपस्थित होते. प्रास्ताविक पुसद नुटा शाखेचे अध्यक्ष प्रा. हेमंत देशमुख यांनी केले.
सांगळे पुढे म्हणाले, नोकरशाही लोकप्रतिनिधींच्या हाताबाहेर गेली आहे. ती घोडय़ासारखी उफाळली आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या संदर्भात आमचे नेते आमदार प्रा.बी.टी. देशमुख हे जेव्हा मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिक्षणमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिवांशी चर्चा करतात, तेव्हा त्यांना सदर माहिती वित्त मंत्रालयाकडे पाठवली जाईल, असे आश्वासन दिल्या गेले. आठ पानाच्या निवेदनाचे उत्तर केवळ एक ओळ मिळाले. केवळ तीन मिनिटांच्या कामासाठी ही नोकरशाही सहाव्या वेतन आयोगाच्या संदर्भात झुलवत आहे. मात्र, फेब्रुवारीपासून ‘आय.ए.एस.’ आणि ‘आय.पी.एस.’ अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या तिजोरीतून त्यांच्यासाठी सहावा वेतन आयोग लागू करवून घेतला. त्यांना वित्त मंत्रालयाची मान्यता घ्यावी लागली नाही का? असा सवाल त्यांनी केला.
सहावा वेतन आयोग लागू केला तरी आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मानव संसाधन मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशाची राज्य शासन जशास तशी अंमलबजावणी करणार नाही. तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील, असे ते म्हणाले.
डॉ. गणेश पाटील म्हणाले, नोकरशाहीचा बुरखा फाडण्यासाठीच हे आंदोलन आहे. एम. फुक्टोने नोकरशाहीच्या विरोधात पुकारलेले हे आंदोलन आहे.
आंदोलनात प्रत्येकाने सक्रिय सहभागी होऊन आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लढले पाहिजे. आजवर राष्ट्रीय, राज्यस्तरीय पातळीवरील आंदोलनात यवतमाळ जिल्हा नेहमी अग्रेसर राहिला आहे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. विवेक देशमुख आणि प्राचार्य डॉ.सी.जी. महाजन यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अंजली पांडे यांनी केले तर आभार प्रा. उल्हास चव्हाण यांनी मानले.