Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जळाऊ लाकडासाठी नागरिकांची भटकंती
भंडारा, ७ जून / वार्ताहर

 

वनविभागाच्या उपेक्षित धोरणामुळे या परिसरातील नागरिकांना जळाऊ लाकडासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. नागरिकांना इंधनासाठी जळाऊ लाकडे उपलब्ध करून द्यावी, अन्यथा नाईलाजास्तव, मोर्चा काढण्याचा इशारा विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी वनविभागास दिला आहे.
कांद्री वनपरिक्षेत्रातील नागरिकांना तात्काळ जळाऊ लाकडे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी चरण वाघमारे यांनी केली आहे. याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आल्यास मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
वनविभागाने कांद्री, जाम, आंधळगाव, धुसाळा, धापेबोंडी, सितेपार, काटी, पांढराबोडी, हरदोली, ताडगाव, देऊळगाव, लोहारा, हिवरा, पांजरा, घोरपड, नवेगाव, लंजेरा, खैरलांजी परिसरातील नागरिकांना जळाऊ लाकडे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती परंतु, या मागणीकडे संबंधित विभागाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याने नागरिकांसमोर इंधनाची समस्या निर्माण झाली आहे.
संबंधित विभागाने इंधनासाठी लाकडाचा पुरवठा न केल्याने अवैध लाकूड तोडण्याचे प्रकार वाढीस लागत आहेत. यावरून वनविभागच अवैध लाकूड तोडीस प्रवृत्त करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य चरण वाघमारे यांनी केला आहे.