Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

लाखांदूरहून नागपूरकरिता एकच बस
भंडारा, ७ जून / वार्ताहर

 

लाखांदूर स्थानकावरील सर्व लांब पल्ल्याचा बसफेऱ्या बंद असून नागपूरला जाण्याकरिता फक्त एक बस सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे.
मोहरणा, माहूर, शिरडी, पंढरपूर या बसफेऱ्या क्रित्येक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना फार त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नागपूरला जाणाऱ्या थेट बसेस क्रित्येक महिन्यांपासून बंद आहेत.
अर्जुनी-नागपूर-अर्जुनी सकाळी ६.३५ वाजता जाणारी, वडसा-नागपूर ११.३० ला जाणारी तसेच अर्जुनी-नागपूर २.३० ला थेट नागपूरला जाणाऱ्या बसफेऱ्या क्रित्येक महिन्यांपासून बंद आहेत. नागपूरला जाण्याकरिता फक्त सकाळी ९.०५ वाजताची एकच बस सुरू आहे. त्यानंतर एकही थेट बस नसल्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने जीव धोक्यात घालून काळी-पिवळीने प्रवास करावा लागत आहे.
पवनी-लाखांदूर ७.३० वाजताची बससुद्धा गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. पवनीला जाणारी थेट बस फक्त दुपारी १.१५ वाजताची एकच सुरू आहे. अर्जुनी-मोरगाव हे शहर लाखांदूरवरून फक्त १८ किलोमीटर अंतरावर आहे. अर्जुनी शहराला रेल्वेची सोय असल्याने अर्जुनीवरून गोंदिया-चंद्रपूरला जाण्याकरिता अनेक प्रवासी लाखांदूरवरून दररोज अर्जुनी-मोरगावला ये-जा करीत असतात. मात्र, अर्जुनी-मोरला जाण्याकरिता २४ तासात एकही बस नाही. त्यामुळे अर्जुनी मार्गे जाणाऱ्या बसफेऱ्या सुरू कराव्या, अशी मागणी अनेक महिन्यांपासून लाखांदूरच्या नागरिकांनी संबंधित विभागाकडे केलेली आहे परंतु, विभागाने याकडे अद्याप लक्ष दिलेले दिसत नाही. अशाप्रकारच्या बसफेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांना तर त्रास झालाच पण, राज्य परिवहन विभागालासुद्धा आर्थिक नुकसान झाले आहे.