Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

धरणाचे सर्वेक्षण रद्द करण्याची मागणी
बुलढाणा, ७ जून / प्रतिनिधी

 

सोनेवाडी, सातगाव भुसारी येथे धरण बांधण्याकरिता सर्वेक्षण करण्यात येत असल्याने या भागातील शेतकरी भूमिहीन व बेघर होणार आहेत. त्यामुळे हे सर्वेक्षणाचे काम रद्द करण्यात यावे, अशी मागणी सोनेवाडी आणि सातगाव भुसारी येथील नागरिकांनी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
हे सर्वेक्षणाचे काम थांबवण्यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य सुशीला पाटील, सोनेवाडीच्या सरपंच कुसुम तायडे यांनीही निवेदने सादर केली. ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तो वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. चिखली तालुक्यातील सोनेवाडी, सातगाव भुसारी येथे लघु पाटबंधारे संग्राहक योजनेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या संग्राहक तलावामुळे या परिसरातील शेतकऱ्यांवर भूमिहीन आणि बेघर होण्याची वेळ येणार आहे. या सर्वेक्षणामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे काम तात्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.शिष्टमंडळात श्याम पाटील, शिवाजी तायडे, प्रभाकर तायडे, बाळू सुसर, शंकरराव तायडे, गणेश जाधव, अंकुश पवार, बाळू पाटील, रमेश पवार, बबन पवार, विठ्ठल सिरसाट, त्र्यंबक तायडे, प्रल्हाद जाधव, बाबुराव खंदारकर, अनंता तायडे, सतीश दस्तुरे, अशोक पाटील, सुभाष तायडे, सुभाष सोनुने, गजानन तायडे, गजानन सोनुने, सुभाष सिरसाट, सखाराम पंडित, कैलास हाडे, विठ्ठल सुरडकर यांचा समावेश होता.