Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची लूट
कुही, ७ जून / वार्ताहर

 

तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांकडून बी-बियाणे व कीटकनाशकांच्या भावाबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होत असून साठेबाजीला ऊत आला असल्याची तक्रार ग्राहक संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांची लुबाडणूक होणार नाही, याची अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशी मागणी तालुका ग्राहक संघटनेने केली आहे.मागील वर्षांच्या खरीप हंगामात राजोला व अन्य ठिकाणी बोगस खतांचे साठे आढळून आले होते. अनेक कृषी सेवा केंद्र चालकांनी वाहतुकीचा खर्च परस्पर उकळण्यासाठी शेतकऱ्यांकडून चढेल भावाने बी-बियाणे व खतांची विक्री केली होती. भरमसाट नफा कमवून स्वत:चे उखळ पांढरे करण्याच्या कृषी केंद्र विक्रेत्यांच्या आर्थिक व्यवहारांनी शेतकरीवर्ग मोठय़ा प्रमाणावर लुबाडला गेला होता. कृषी उत्पादन उद्योजक आणि शासन यांच्या ‘लिकिंग’मुळे अडचणीत येऊन वाहतुकीचा खर्च वसूल करावा लागला, अशी भूमिका कृषी सेवा केंद्र संचालकांनी घेतली होती. विक्रेत्यांची मनमानी व कृषी अधिकाऱ्यांची त्यांच्या सर्व व्यवहारांना मूक संमती यामुळेच शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत आल्याचे दृश्य तालुक्यात होते.गेल्या वर्षीच्या या अनुभवावरून चालू खरीप हंगामात देखील हे कृषी सेवा केंद्र चालक भरमसाट भावाने बी-बियाणांची विक्री करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, अशी भीती तालुका ग्राहक संघटनेने व्यक्त केली आहे. सतत नैसर्गिक आपत्तीच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना मानवनिर्मित संकटाशी सामना करता-करता नाकीनऊ आलेले आहे. अधिकारी व विक्रेते यांच्या संगनमताने शेतकरी गलितगात्र झालेले आहेत. यात सामान्य बळीराजांची मोठीच कुचंबणा होत आहे. अधिकाऱ्यांनी या सर्व गैरव्यवहारावर आळा घालावा, अशी मागणी ग्राहक संघटनेने केली आहे.