Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जलस्वराज्य समितीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा
भंडारा, ७ जून / वार्ताहर

 

जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत गावपातळीवर काम करणाऱ्या सालेबर्डीतील जलस्वराज्य समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या निधीची अफरातफर झाल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्य़ातील आंधळगाव पोलीस ठाण्यात समितीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जलस्वराज्याच्या ग्रामपातळीवरील समित्यांमधील पदाधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारी वृत्तीमुळे अनेक ठिकाणी जलस्वराज्य प्रकल्पाचा हेतू साध्य होऊ शकत नाही.
भंडारा जिल्ह्य़ातील अनेक गावातील प्रकल्प अशाच गैरव्यवहारांमुळे अर्धवट पडून आहेत. यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यात अटकही झालेली आहे. मात्र, असे प्रकार न थांबता सुरूच आहेत. जिल्ह्य़ातील सालेबर्डी येथे जलस्वराज्य समितीचे अध्यक्ष महादेव शेंडे, सचिव राई गडरिये व गजानन झंझाड या तिघांनी जवळपास साडेतीन लाख रुपयांच्या निधीची अफरातफर केल्याची तक्रार आंधळगाव पोलीस ठाण्यात जलस्वराज्य प्रकल्पाचे गटप्रमुख रवींद्र गभणे यांनी केली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या कामाचे कंत्राट घेऊन मोजमाप पुस्तिकेप्रमाणे कामे न करता आगाऊ रक्कम घेऊन ही अफरातफर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या गैरप्रकाराबद्दल आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.
वीज पडून जखमी झालेल्या महिलांवर उपचार सुरूच
सरांडी येथील वादळात वीज पडून जबर जखमी झालेल्या ९ महिलांवर लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी महिलांची माजी आमदार नाना पटोले यांनी रुग्णालयात भेट घेऊन शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. लाखांदूर तालुक्यातील सरांडी येथील मंगल कुथे यांच्या शेतात धान कापणीच्या कामासाठी तेथील ९ महिला गेल्या असताना अचानक विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाल्याने सर्व महिला गावाकडे परतण्याच्या तयारीत असताना अचानक वीज कोसळली. यात सर्व ९ महिला जबर जखमी झाल्या. या सर्वाना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात ताबडतोब उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व जखमींचे पाय लुळे पडले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.