Leading International Marathi News Daily

मंगळवार, ९ जून २००९

रिलायन्स दरवाढविरोधी मोर्चावर लाठीमार
दगडफेक.. जाळपोळ.. ४० शिवसैनिक जखमी

मुंबई, ८ जून/प्रतिनिधी

रिलायन्स एनर्जी या उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या भरमसाठ दरवाढीच्या विरोधात शिवसेनेने काढलेल्या मोर्चाला आज हिंसक वळण लागले. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात ३५ ते ४० शिवसैनिक जखमी झाले तर शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेक व जाळपोळीत पोलीस उपायुक्त निसार तांबोळी यांच्यासह पाचजण जखमी झाले. संतप्त जमावाने एक ट्रकला आग लावली तर सुमारे डझनभर वाहनांची तोडफोड केली.

गदारोळ!
मुंबई, नवी दिल्ली ८ जून/ खास प्रतिनिधी/ प्रतिनिधी

काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आल्याचे तीव्र पडसाद आज विधिमंडळात आणि संसदेतही उमटले. विधिमंडळात विरोधी पक्षाने मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळल्यानंतर संतप्त विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या. तसेच राज्यमंत्री राणा जगजितसिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या गदारोळात विधानसभेचे कामकाज २० मिनिटे तहकूब करण्यात आले तर विधान परिषदेत यामुळे सात वेळा कामकाज तहकूब झाले. राज्य पोलिसांनी पवनराजे हत्येचा तपास का केला नाही याची निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली.

ज्येष्ठ हिंदी रंगकर्मी हबीब तनवीर यांचे निधन
भोपाळ, ८ जून/पी.टी.आय.

हिंदी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक तसेच अनेक हिंदी चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक हबीब तनवीर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. मूळ पत्रकार असलेल्या तनवीर यांचा हिंदी रंगभूमीवर मोठा दबदबा होता. भोपाळमध्ये त्यांनी ‘नया थिएटर’ ही नाटक कंपनी स्थापन केली होती. रंगभूमी, लोकसंगीत आणि काव्य यांचे बेमालूम मिश्रण तन्वीर यांनी केले. त्या अर्थी तनवीर हे बहुमुखी व्यक्तिमत्व होते. त्यांचे खरे नाव हबीब अहमद खान असे होते.

नाशिकमध्ये गुंडाराज, ४० वाहनांची होळी
नाशिक, ८ जून / प्रतिनिधी

दहशत आणि उपद्रवाच्या दैनंदिन श्रृंखलेतील पुढची कडी गुंफताना गुंडांच्या एका अर्निबध टोळक्याने रविवारी मध्यरात्रीनंतर शहराच्या सिडको परिसरातील सुमारे ४० वाहने पेटवून देत पोलीस यंत्रणेला पुन्हा एकदा खुले आव्हान दिले आहे. नाशिकरोड भागात गुंडांच्या अशाच एका टोळक्याकरवी गस्तीवर असणाऱ्या पोलीसाचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेला आठवडा उलटत नाही, तोच हीच घटना घडल्याने सर्वसामान्य दहशतीखाली तर पोलीस हतबल असे चित्र दिसते.

एक्स्प्रेस इन्व्हेस्टिगेशन
‘एनएसजी’ पाठविण्याचा निर्णय, विमानाची व्यवस्था व्हायला लागले पाच तास!

प्रणव धल सामंता
नवी दिल्ली, ८ जून

मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि भयावह दहशतवादी हल्ला होता २६ नोव्हेंबरचा! परंतु केन्द्राची एकूण भूमिका, प्रतिसाद कसा होता हेसुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मुंबईत ‘एनएसजी’ (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) पाठविण्याचा निर्णय मध्यरात्रीच्या सुमारास झाला; परंतु त्याआधीच्या साडेतीन-चार तासांत बरेच काही घडून मुंबई अर्धमेली झाली होती. रात्री पावणेदहा वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर दहशतवाद्यांनी ५२ जणांना ठार केले होते. कामा इस्पितळातही धुडगूस घातला. तेथून जाणाऱ्या रस्त्यावर दिसेल त्यालागोळ्या घातल्या. मुंबई पोलीस दलातील तीन अधिकारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात धारातीर्थी पडले होते. (उर्वरित वृत्त)

भरमसाठ शुल्क आकारण्यास संस्थाचालकांना मोकळे रान
मुंबई, ८ जून / प्रतिनिधी

विनाअनुदानित शिक्षणसंस्थांमधील शुल्करचनेवर नियंत्रण आणण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने शिक्षण शुल्क समिती स्थापन केली आहे. परंतु, ही समिती केवळ शालेय स्तरावरील विनाअनुदानित संस्थांमधील वर्गाचे शुल्क निश्चित करणार आहे. अकरावी व बारावीच्या शुल्कासाठी जुनेच नियम लागू राहतील, असे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. विखे-पाटील यांच्या या स्पष्टीकरणामुळे संस्थाचालकांना भरमसाठ शुल्क आकारण्यासाठी मोकळे रानच मिळणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विखे-पाटील यांनी ही माहिती दिली.

मुंबई, ठाणे, भिवंडीत १० टक्के पाणीकपात
मुंबई, ८ जून / प्रतिनिधी

कडक उन्हाळ्यामुळे झपाटय़ाने खालावलेली धरणांची पातळी व मान्सूनचे लांबलेले आगमन या पाश्र्वभूमीवर उद्या मंगळवारपासून शहरात १० टक्के पाणी कपातीचा निर्णय महापालिकेच्या जल विभागाने घेतला आहे. मुंबईखेरीज ठाणे आणि भिवंडी शहरातही तितकीच पाणीकपात उद्यापासून लागू होणार आहे. मान्सून अद्याप मुंबईत पोहोचला नसल्याने, उद्यापासून शहरात १० टक्के पाणीकपात करण्यात येईल. पावसाच्या आगमनानंतर धरणांची पातळी वाढल्यावर शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महापालिकेचे जल अभियंता एस. एस. कोर्लेकर यांनी सांगितले. तसेच मुंबईप्रमाणेच ठाणे व भिवंडी शहरातही १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार असल्याचे जल विभागाने स्पष्ट केले. पावसाचे आगमन लांबल्यास, शहरात ५-१० टक्के पाणी कपातीची शक्यता पालिकेने गेल्या आठवडय़ातच वर्तविली होती. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी राखीव साठय़ापर्यंत घटल्यामुळे मान्सूनचे आगमन १० दिवसांहून अधिक लांबल्यास, त्यात आणखी वाढ केली जाईल, असेही नमूद केले होते.

 

महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी