Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

एका कलावंताची सामाजिक बांधीलकी

 

कलावंताने सामाजिक बांधीलकी मानावी की नाही? त्यामुळे त्याच्या आविष्कार स्वातंत्र्याचा संकोच होत असतो का? आणि तसा तो होत असेल तर त्याने आपले आविष्कार स्वातंत्र्य प्रधान मानावे की सामाजिक बांधीलकी? मुळात कलाकाराचं समाजाप्रती कितपत उत्तरदायित्व असतं? तो ते निभावतो का? की केवळ पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेच्याच सीमित वर्तुळातच तो फिरत राहतो? त्यानं असं स्वकेंद्रित असावं का? मग त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर भरभरून केलेल्या प्रेमाचं काय? त्या बदल्यात समाजासाठी काहीतरी करावं, ही त्या कलावंताची जबाबदारी नाही का?.. प्रश्न अनेक आहेत, परंतु त्यांची उत्तरं मात्र व्यक्तीगणिक वेगवेगळी मिळतात. काहींचं म्हणणं, ‘लोक ज्यासाठी आम्हाला डोक्यावर घेतात, त्या कलेचं पुरेपूर माप आम्ही त्यांच्या पदरात टाकलं की आमची जबाबदारी संपली. त्याव्यतिरिक्त लोकांनी आमच्याकडून आणखी कुठल्याही अपेक्षा करू नयेत. आमचं व्यक्तिगत आयुष्य आम्ही कसं जगतो, जगावं, याच्याशी समाजाला काही देणंघेणं असण्याचं कारणच नाही. आमच्या वैयक्तिक जीवनात कुणी उगीचच नाकं खूपसू नयेत.’ तर दुसऱ्या बाजूनं- ज्या लोकांच्या प्रेमामुळे आपल्याला उदंड पैसा, प्रसिद्धी व प्रतिष्ठेचं वलय लाभलं, त्या समाजाप्रती आपलंही काही कर्तव्य आहे, उत्तरदायित्व आहे, असे मानणारे काही कलावंतही असतात.. आहेतही.
अभिनेते प्रशांत दामले यांचा या दुसऱ्या गटात समावेश होतो. प्रशांत दामले फॅन फौंडेशनच्या माध्यमातून ते अनेक सांस्कृतिक तसेच समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. त्यासाठी दिवसाची रात्र करून ते सर्वस्व झोकून देऊन काम करतात. आपल्या कलावंत म्हणून असलेल्या वलयाचा वापरही त्यासाठी ते करतात. उगवत्या गायक कलावंतांना व्यासपीठ देण्यापासून ते शालेय शिक्षण अर्धवट सुटलेल्यांना संगणक प्रशिक्षण देऊन तसेच कॉल सेंटर्ससाठी आवश्यक ते रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना जीवनात उभं करण्याचं महत्कार्य ते आपल्या समविचारी मित्रमंडळींसह सध्या करीत आहेत. याखेरीज ज्या कलेच्या क्षेत्रात आपण वावरतो, त्या क्षेत्रातील अडचणीत सापडलेल्या कुणाही कलावंताला- मग तो बॅकस्टेज आर्टिस्ट असेना का, ते सर्व प्रकारे साहाय्य करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात.
असाच एक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल ट्रस्ट आणि आपल्या प्रशांत दामले फॅन फौंडेशनच्या सहयोगाने नुकताच हाती घेतला आहे. दुर्धर मानल्या गेलेल्या आणि अनेक गैरसमजांमुळे घाबरवून सोडणाऱ्या कर्करोगासंबंधी समाजाच्या सर्वच स्तरांत जाणीवजागृती करण्यासाठी त्यांनी ‘यमाच्या बैलाला’ या डॉ. शेखर कुलकर्णी यांच्या धमाल विनोदी एकांकिकेचे प्रयोग लावून, त्यानंतर उपस्थितांशी कर्करोगांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद घडवून आणण्याचं काम ते सध्या करीत आहेत.
कर्करोग म्हटला की भल्या-भल्यांना धडकी भरते. त्याचं नुसतं निदान झालं तरी माणूस अर्धा खलास होतो. त्यामुळे मुळात कर्करोग कशामुळे होतो, त्याचं स्वरूप कशा प्रकारचं असतं, त्यावर कोणते उपाय सध्या उपलब्ध आहेत, ते घेतल्यानं काय लाभ- हानी होते, मुळात कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करणे आवश्यक आहे, सध्या कर्करोगावर उपलब्ध असलेल्या उपचारांची परिणामकारकता कितपत आहे, या रोगाचा सामना कसा करावा, तो करताना स्वत: रुग्णाने आणि त्याच्या निकटच्या नातलगांनी कोणती पथ्यं पाळावीत, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्यांना हवी असतात. परंतु ती कोण देऊ शकेल, हे त्यांना माहीत नसतं. कर्करोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपाशीही त्यांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं देऊन त्यांचं शंकासमाधान करण्याएवढा वेळ असतोच असं नाही. त्यामुळे या रोगाबाबतचे गैरसमज समाजात वाढत गेले आहेत. कर्करोगावरील केमोथेरपी वगैरे उपचारांच्या दुष्परिणामांचीच चर्चा लोकांमध्ये अधिक आहे. कर्करोगासंबंधीचे समाजातील हे अज्ञान व गैरसमज दूर होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ही गोष्ट ओळखूनच अभिनेते प्रशांत दामले व कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील कर्करोग विभागातील डॉक्टर मंडळी यांनी एकत्र येऊन या रोगाबद्दल समाजात जाणीवजागृती करण्याचे ठरविले. परंतु नुसत्याच भाषणबाजीला लोक कंटाळतात, हे ध्यानी घेऊन त्यांनी शर्करावगुंठित गोळी देण्याचे ठरविले. त्यासाठी ‘यमाच्या बैलाला’ ही एकांकिका डॉ. शेखर कुलकर्णी यांनी मुद्दाम लिहिली. मनोरंजनातून कर्करोगासंबंधीची माहिती देण्याची ही ट्रिक अत्यंत यशस्वी ठरली आहे. प्रशांत दामले, मंगेश कदम, परि तेलंग आणि शिवानी कराडकर या कलावंतांनी सादर केलेल्या या धमाल विनोदी एकांकिकेत कर्करोगावर निघालेल्या विविध औषधयोजनांमुळे प्रत्यक्ष यमराजावरच बेकारीची पाळी कशी आली आहे, हे या एकांकिकेत दाखविले आहे. आपल्या या बेकारीचं कारण शोधून काढण्यासाठी यम आपल्या रेडय़ासह पृथ्वीतलावर येतो. तेव्हा त्याला कर्करोगावर उपलब्ध झालेल्या प्रभावी औषधांची माहिती मिळते आणि आपल्या बेकारीला कारणीभूत ठरलेल्या या संशोधनाने त्याला धक्काच बसतो.. असे साधारण कथानक असलेल्या या एकांकिकेची मांडणी धमाल पद्धतीनं केली गेली आहे. मंगेश कदम दिग्दर्शित ही एकांकिका उत्तरोत्तर रंगत जाते. मात्र, एक टप्प्यावर ती सहजगत्या प्रबोधनाकडे वळते आणि त्यातून लोकांच्या मनातील कर्करोगासंबंधीच्या समज-गैरसमजांना उत्तरं मिळत जातात.
साधारण चाळीसेक मिनिटांच्या या एकांकिकेतून लोकांचं प्रबोधन व मनोरंजन केल्यावर उपस्थित प्रेक्षकांना कर्करोगतज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधण्याची संधी मिळते. यावेळी प्रेक्षक आपल्या मनातील शंकाकुशंकांचं निरसन करून घेऊ शकतात. शिवाजी मंदिरमध्ये झालेल्या या प्रयोगाला प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती आणि एकांकिकेनंतर डॉक्टरांबरोबरच्या संवादालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. एवढा, की या प्रश्नोत्तरांनाही शेवटी कुठेतरी वेळेची मर्यादा घालण्याची गरज आहे, असं प्रशांत दामले यांच्या ध्यानी आलं. तरीही बहुतेक प्रेक्षकांच्या प्रश्नांना डॉ. मंदार देशपांडे, डॉ. चारुदत्त चौधरी, डॉ. योगेश कुलकर्णी, डॉ. युवराज, डॉ. मंदार नाडकर्णी, डॉ. संदीप गोयल यांनी सविस्तर उत्तरं दिली. सबंध महाराष्ट्रभर हा उपक्रम नेण्याकरिता अभिनेते प्रशांत दामले प्रयत्नशील आहेत. त्यासाठी कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल व तेथील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी त्यांना सर्वतोपरी साहाय्य करीत आहेत. मुख्य म्हणजे हा उपक्रम सर्वासाठी विनामूल्य खुला आहे.
प्रशांत दामले यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. त्यांच्या बरोबरीनेच आपल्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून लोकांशी संवाद साधण्यास उत्सुक असलेल्या डॉक्टरांनाही याचं श्रेय द्यायला हवं. अशा प्रकारचा उपक्रम करण्याची कल्पना कुणा कलावंताच्या मनात येणं आणि त्यानं त्यासाठी कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आपला वेळ आणि श्रम देणं, याकरिता प्रशांत दामले यांना लाख हॅट्स ऑफ! त्यांच्या या उपक्रमाला लोकांचाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यातून समाजाला अशा उपक्रमाची किती तीव्र निकड होती, हेच दिसून येतं. अशा प्रकारच्या उपक्रमांत कलावंतांनी पुढाकार घेतल्यास समाजापुढील अनेक समस्यांवर नक्कीच उत्तरं शोधता येतील!
रवींद्र पाथरे