Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता वाढविण्यास तंत्रज्ञानाचा वापर!

 

तंत्रज्ञानाची कास धरलेल्या शिक्षण क्षेत्रात अनेक नवीन तंत्रज्ञानांचा समावेश होत आहे. यासर्व तंत्रज्ञानांच्या सहाय्याने आता व्हर्चअल वर्ग घेण्यास सर्वत्र सुरुवात झाली आहे. अनेक शहरांतील, गावांतील विद्यार्थी, शिक्षक या माध्यमातूल एकत्र आले आहेत. पण याचा प्रभाव हवा तसा न पडल्याने अद्यापही या सर्व तंत्राचा वापर पाहिजे तसा होत नाही. यामुळे या सर्व गोष्टी अजून सोप्या करण्याचा सर्वत्र प्रयास सुरू आहे. याचाच एक भाग म्हणजे शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने वेळोवेळी त्यांच्या विषयाशी संबंधित सर्व माहिती मोबाइलवर उपलब्ध होणार आहे.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्निकल टीचर ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च (एनआयटीटीटीआर) आणि नॅशनल काऊन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग (एनसीइआरटी) या दोन शासकीय संस्था हे मोबाइल सॉफ्टवेअर विकसित करीत आहेत. या सॉफ्टवेअर मार्फत शिक्षकांना मिळणारी माहिती विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. ही माहिती उपग्रह संवाद सेवेच्या माध्यमातून मोबाइल फोनवर मिळणार असल्याचे एनआयटीटीटीआरचे संचालक एस. मोहन यांनी सांगितले आहे. हे सॉफ्टवेअर येत्या सहा महिन्यांत तयार होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. हे सॉफ्टवेअर तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांकडून बनविण्यात येत असून त्यांच्याकडे विविध अभ्याक्रमांची पुरेशी माहिती उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
येत्या काळात ही सुविधा विद्यार्थ्यांसाठीही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या माध्यमातून त्यांना करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. एनसीइआरटीमधील सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन टेक्नोलॉजी (सीआयइटी)ने देशभर घेतलेल्या ‘शैक्षणिक तंत्रज्ञान’ या विषयावरील व्याख्यानमालेच्यादरम्यान ही संकल्पाना पुढे आल्याचे सीआयइटीच्या सहाय्यक संचालक वसुधा कामत यांनी स्पष्ट केले. या सेवेसाठी सीआयटीमध्ये मोबाइल फोन पोर्टल लावण्यात येणार आहे. या पोर्टलवर देशभरातील शिक्षकांची माहिती असणार आहे. शिक्षकांनी दिलेल्या क्रमांकावर फोन केल्यास त्यांना आवश्यक ती माहिती फोनवर अथवा एसएमएसद्वारे पुरविण्यात येणार आहे. ही सेवा यशस्वी झाल्यानंतर थ्रीजी कन्टेन्ट पुरविण्यात येणार आहे. यामध्ये शिक्षकांना व्हिडीओ पाठविण्याची सोय करण्यात येणार असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले.
शिक्षण क्षेत्राला प्रश्नेत्साहन देणाऱ्या यासारख्या अनेक सेवा सध्या सुरू आहेत. येत्या काळात अनेक सेवा येऊ घातल्या आहेत. यामध्ये वेबसाइटचे प्रमाण अधिक आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना देशातील विविध भागांतील विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संपर्क साधता येऊ लागला आहे. यामुळे घरबसल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रश्नंतातील शिक्षकांशी संपर्क साधता येणे शक्य आहे. अशा वेबसाइट आणि विविध पोर्टल सेवांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी याचा फायदा सर्वानाचा होणार आहे. या क्षेत्रातील संशोधन शासकीय अथवा खासगी पातळीवरच चालू आहे असे नाही, तर या विषयावरील संशोधन विविध तंत्रज्ञान संस्थांमधील विद्यार्थीही करीत आहेत. याचे ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर आयआयटी, पवई येथील इंडस्ट्रीअल डिझाइन सेंटरमधील श्रेयसी रॉय या विद्यार्थिनीने ‘माय टेक्स बुक’ नावाची वेबसाइट तयार केली असून त्याद्वारे विविध विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या वेबसाइटचे काम पूर्ण झाले असले तरी ही वेबसाइट अद्याप पूर्णत: सुरू झाली नसून येत्या काळात ती सुरू होईल, असे श्रेयसीने सांगितले. अशा प्रकारचे अनेक प्रयोग या क्षेत्रात ग्रामीण भागातही होत आहे. यामुळे खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्षेत्र एकत्र येईल आणि यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठय़ा प्रमाणावर संधी मिळणार आहे.
नीरज पंडित
nirajpandit@in.com