Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

एका कलावंताची सामाजिक बांधीलकी
कलावंताने सामाजिक बांधीलकी मानावी की नाही? त्यामुळे त्याच्या आविष्कार स्वातंत्र्याचा संकोच होत असतो का? आणि तसा तो होत असेल तर त्याने आपले आविष्कार स्वातंत्र्य प्रधान मानावे की सामाजिक बांधीलकी? मुळात कलाकाराचं समाजाप्रती कितपत उत्तरदायित्व असतं? तो ते निभावतो का? की केवळ पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेच्याच सीमित वर्तुळातच तो फिरत राहतो? त्यानं असं स्वकेंद्रित असावं का? मग त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर भरभरून केलेल्या प्रेमाचं काय? त्या बदल्यात समाजासाठी काहीतरी करावं, ही त्या कलावंताची जबाबदारी नाही का?.. प्रश्न अनेक आहेत, परंतु त्यांची उत्तरं मात्र व्यक्तीगणिक वेगवेगळी मिळतात. काहींचं म्हणणं, ‘लोक ज्यासाठी आम्हाला डोक्यावर घेतात, त्या कलेचं पुरेपूर माप आम्ही त्यांच्या पदरात टाकलं की आमची जबाबदारी संपली.

शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता वाढविण्यास तंत्रज्ञानाचा वापर!
तंत्रज्ञानाची कास धरलेल्या शिक्षण क्षेत्रात अनेक नवीन तंत्रज्ञानांचा समावेश होत आहे. यासर्व तंत्रज्ञानांच्या सहाय्याने आता व्हर्चअल वर्ग घेण्यास सर्वत्र सुरुवात झाली आहे. अनेक शहरांतील, गावांतील विद्यार्थी, शिक्षक या माध्यमातूल एकत्र आले आहेत. पण याचा प्रभाव हवा तसा न पडल्याने अद्यापही या सर्व तंत्राचा वापर पाहिजे तसा होत नाही. यामुळे या सर्व गोष्टी अजून सोप्या करण्याचा सर्वत्र प्रयास सुरू आहे. याचाच एक भाग म्हणजे शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने वेळोवेळी त्यांच्या विषयाशी संबंधित सर्व माहिती मोबाइलवर उपलब्ध होणार आहे.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्निकल टीचर ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च (एनआयटीटीटीआर) आणि नॅशनल काऊन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग (एनसीइआरटी) या दोन शासकीय संस्था हे मोबाइल सॉफ्टवेअर विकसित करीत आहेत. या सॉफ्टवेअर मार्फत शिक्षकांना मिळणारी माहिती विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. ही माहिती उपग्रह संवाद सेवेच्या माध्यमातून मोबाइल फोनवर मिळणार असल्याचे एनआयटीटीटीआरचे संचालक एस. मोहन यांनी सांगितले आहे. हे सॉफ्टवेअर येत्या सहा महिन्यांत तयार होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. हे सॉफ्टवेअर तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांकडून बनविण्यात येत असून त्यांच्याकडे विविध अभ्याक्रमांची पुरेशी माहिती उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नाटय़वार्ता
‘कच्चे लम्हें’ आणि ‘हम SUFFERl’

दूरचित्रवाणीवरील ‘दामिनी’, ‘घर एक मंदिर’, ‘कहानी घर घर की’ आदी मालिकांतून तसेच ‘रंगीबेरंगी’ आणि ‘क्षणोक्षणी’ या चित्रपटांतून चमकलेले मऱ्हाठमोळे अभिनेते किरण करमरकर यांच्या ‘कच्चे लम्हें’ आणि ‘हम SUFFERl ’ या दोन हिंदी नाटकांचे प्रयोग अनुक्रमे बुधवार, १० जून आणि गुरुवार, ११ जून रोजी माटुंग्याच्या कर्नाटक संघ नाटय़गृहात रात्रौ ८ वा. होणार आहेत. १० जूनला कवी- चित्रपटकार गुलजार यांच्या कथेवर आधारीत जावेद सिद्दीकी लिखित ‘कच्चे लम्हें’ या नाटकाचा प्रयोग आहे. पती, पत्नी आणि मित्र यांच्यातील त्रिकोणी नात्यातील बदलते संदर्भ, बदलती नाती हा या नाटकाचा विषय आहे. यात किरण करमरकर यांच्यासोबत हर्ष छाया आणि लुबना सलीम हे कलाकार काम करीत आहेत. या नाटकाचे गेल्या चार वर्षात देश-विदेशात प्रयोग झालेले आहेत. ११ जूनला जावेद सिद्दीकी लिखित व सलीम आरिफ दिग्दर्शित ‘हम SUFFERl ’चा प्रयोग होणार आहे. त्यात किरण करमरकर आणि लुबना सलीम यांच्या भूमिका आहेत. पंधरा वर्षाच्या संसारानंतर घटस्फोट झालेले एक दाम्पत्य त्यानंतर वीस वर्षे काही ना काही कारणास्तव भेटत राहते. यातील भावनिक गुंता व नाटय़ातून हे नाटक साकारत जाते. कविवर्य गुलजार यांनी खास या नाटकासाठी स्वत:च्या आवाजात आपल्या कविता रेकॉर्ड केल्या आहेत.
मिथकचे ‘Microwave चकना’
‘मिथक’ संस्थेचे ‘पालखी’ हे नाटक आणि त्यानंतर तेंडुलकर नाटय़महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर ‘Microwave चकना’ हे नवे नाटक येत्या १५ जूनला रंगमंचावर येत आहे. उच्चभ्रू वर्गातील पाच तरुणींची ही गोष्ट. मित्र-मैत्रिणींनाच आपलं कुटुंब मानणाऱ्या, स्वत:चा स्वतंत्र अवकाश मागणाऱ्या आणि सनातनी मूल्यांविरुद्ध झगडणाऱ्या आजच्या पिढीच्या समस्या या नाटकात हाताळलेल्या आहेत. नाटकाचं लेखन-दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केलेलं असून, वेशभूषा व नेपथ्य इरावती कर्णिक यांचं आहे. प्रकाशयोजना राघू बंगेरा यांची, तर संगीत समीर विद्वांस यांचं आहे. यात ज्ञानदा चेंबूरकर, आरती मोरे, कश्मिरा मोरे, अभिजीत सुर्वे, आरती वडगबाळकर आणि सुजाता जोशी हे कलावंत काम करीत आहेत.
रचना कला केंद्राची एकांकिका स्पर्धा
रचना कला केंद्र- बदलापूर शाखेतर्फे बदलापूर येथे कै. कमलाबाई निळकंठराव जोगळेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उत्तुंग खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दोन फे ऱ्यांत घेण्यात येणार असून, १० व ११ जूनला स्पर्धेची प्रश्नथमिक फेरी, तर १४ जूनला अंतिम फेरी होईल. उत्तुंगमध्ये सवरेत्कृष्ठ ठरणाऱ्या एकांकिकांना गुणानुक्रमे पाच, तीन आणि दोन हजारांची पारितोषिके, स्मृती चषक व प्रशस्तीपत्र देण्यात येईल. प्रवेश व अधिक माहितीसाठी संपर्क : मृणाल चेंबूरकर- मोबाइल क्र. ९३२२५९८८६९, पुष्कर चेंबूरकर- ९८९०३७९५७० किंवा मानसी वैद्य- ९३२२५००३७८.

‘अस्तित्व’चे नाटय़लेखन शिबीर
‘अस्तित्व’ नाटय़संस्थेतर्फे १३ व १४ जून रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नाटय़लेखन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अशोक पाटोळे, डॉ. अनिल बांदिवडेकर आणि अभिराम भडकमकर हे नाटककार शिबिरार्थिना मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबीर सर्वासाठी विनामूल्य खुले असून त्यात सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- WWW.ASTITVA.CO.IN