Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ला प्रथम पुरस्कार
कोल्हापूर, ९ जून / विशेष प्रतिनिधी

रसिकप्रेक्षकांना उत्तमोत्तम चित्रपटांची अनुभूती आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या तरुणांची पाठशाळा अशी दुहेरी भूमिका सशक्तपणे बजावणारे व्यासपीठ म्हणून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे येतो आहे. अशा व्यासपीठाला अधिकाधिक सशक्त बनवून रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्था व शासनकर्ते यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांनी येथे व्यक्त केले. दरम्यान, समारंभात महोत्सवात दाखविण्यात आलेल्या चित्रपटांपैकी सर्वात प्रथम प्रेक्षकपसंतीचा चित्रपट म्हणून परेश मोकाशी दिग्दर्शित हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

सांगलीत महापालिकेच्या ३६ शाळा मुख्याध्यापकांविनाच!
सांगली, ९ जून / गणेश जोशी

सांगली महापालिकेच्या शिक्षण मंडळात केवळ राजकारणीच नव्हे, तर काही गुन्हेगारही शिरले असल्याने महापालिकेच्या बहुतांशी शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. अशातच महापालिकेच्या ३६ शाळांत मुख्याध्यापकच नाहीत, तर विद्यार्थी येणार कोठून, असा प्रश्न महापालिका प्रशासनापुढे असायला हवा. परंतु ढिम्म प्रशासनाबरोबरच सत्ताधाऱ्यांनाही या प्रश्नाचे गांभीर्य नाही, हेच खरे सांगलीकरांचे दुर्देव आहे. सांगली ही ‘शिक्षण पंढरी’ म्हणूनही ओळखली जाते.

दलित तरुणाच्या खूनप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर, ९ जून/प्रतिनिधी

शहरात भवानी पेठेत मराठा वस्तीजवळ एका दलित तरुणाचा सवर्णानी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अखेर मृत्यू झाल्यामुळे त्या भागात मंगळवारी तणावाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, याप्रकरणी सहाजणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी त्यापैकी एका आरोपीला न्यायदंडाधिकाऱ्यासमोर उभे केले असता त्यास पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात आली. दीपक सोपान साबळे (वय २०, रा. राजीव गांधीनगर, भवानी पेठ) असे मृत दलित तरुणाचे नाव आहे.

सोलापुरात रॉकेल तस्कराविरुद्ध प्रथमच स्थानबद्धतेची कारवाई
सोलापूर, ९ जून/प्रतिनिधी

शासननियंत्रित दरातील रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या एका रॉकेल तस्कराला सोलापुरात पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी प्रतिबंध कायद्याखाली सहा महिन्यांसाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. रॉकेल तस्कराविरुद्ध ही पहिलीच कारवाई असल्याने रॉकेल तस्करांना दणका बसला आहे.
कौसर अब्दुल सत्तार देशमुख (वय ४८, रा. शास्त्रीनगर) असे प्रतिबंध कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आलेल्या रॉकेल तस्कराचे नाव आहे.

कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकासाचा २०९९ कोटींचा प्रस्ताव वाऱ्यावर
कोल्हापूर, ९ जून / राजेंद्र जोशी

शहरात पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्थेची सुरू असलेली सुमारे १०० कोटी रुपयांची कामे आणि २२० कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या २०९९ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तातडीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिल्याने कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात विकासाच्या दिशेने उत्तुंग भरारी घेईल अशी अटकळ कोल्हापूरकरांनी बांधली असली, तरी नव्या अर्थसंकल्पात भ्रमनिरास झाला आहे.

आषाढी वारीची नियोजन बैठक कोणत्याही निष्कर्षांविना गुंडाळली!
पंढरपूर, ९ जून/वार्ताहर

पंढरीनगरीत २८ जून ते ७ जुलै दरम्यान संपन्न होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या सुमारे दहा लाख भाविक, वारकरी यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधा यावर विचारविनिमय करण्यासाठी बोलाविण्यात आलेली आषाढी यात्रा नियोजन बैठक कोणत्याही निष्कर्षांविना अवघ्या पाऊण तासात गुंडाळण्यात आल्याने वारकऱ्यांच्या सोयींबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आषाढी एकादशी ३ जुलै रोजी आहे. सप्तमीपासून, म्हणजे २८ जूनपासूनच पंढरीत भाविकांची अलोट गर्दी सुरू होते.

आझाद मैदानावर आज सत्याग्रह- डॉ. दाभोलकर
सातारा, ९ जून / प्रतिनिधी

गेली दहा वर्षे सत्तेत असूनही राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीचे सरकार जादूटोणा प्रतिबंधक कायदा करण्याची सामाजिक इच्छाशक्ती दाखवत नाही इतके ते निर्लज्ज आहेत, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी संतप्तपणे सांगितले. बुधवारी १० जूनला मुंबईतील आझाद मैदानावर निषेध व निर्धार सत्याग्रह होणार असल्याचे सांगितले.

रवी बँकेच्या १५ जणांना अटकपूर्व जामीन नामंजूर
कोल्हापूर, ९ जून / प्रतिनिधी

सुमारे १७ कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याच्या आरोपावरून येथील रवी को ऑप बँकेच्या आजी-माजी संचालक, सहायक व्यवस्थापक आदी २८ जणांविरूध्द लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून २८ पैकी १५ जणांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दाखल केलेला अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस.वागवसे यांनी आज फेटाळून लावला.

मदन पाटील युवा मंचचे सांगलीत रास्ता रोको
सांगली, ९ जून / प्रतिनिधी

सांगली महापालिकेतील सत्ताधारी विकास महाआघाडीने शासकीय अनुदानाचे समन्यायी वाटप करावे, या मागणीसाठी विरोधी काँग्रेस सदस्यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मदन पाटील युवा मंचच्या वतीने मंगळवारी महापालिका मुख्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विकास महाआघाडीने या निधीवाटपात विरोधी काँग्रेसवर अन्याय केला असून केवळ सत्ताधाऱ्यांचीच कामे करण्याचा घाट घातला आहे. या विरोधात काँग्रेसचे लक्ष्मण नवलाई व बाळाराम जाधव यानी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

बार्शीत इलेक्ट्रॉनिक्स दुकान फोडून साडेपाच लाख चोरीस
सोलापूर, ९ जून / प्रतिनिधी
बार्शी शहरात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे दुकान फोडून चोरटय़ांनी पाच लाख ५० हजारांचा ऐवज लांबविला. तब्बल चार दिवसांनंतर या गुन्ह्य़ाची नोंद बार्शी पोलीस ठाण्यात करण्यात आली.
दुकानमालक दत्तात्रेय शिवाजी बाबर (वय ४५, रा. उपळाई रोड, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री दुकान बंद करून बाबर हे घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानात चोरी झाल्याचे उघडकीस आले. दुकानाचा पत्रा उचकटून चोरटय़ांनी आत प्रवेश केला आणि सात डीव्हीडी, सात दूरचित्रवाणी संच, तीन मिक्सर असा एकूण पाच लाख ४९ हजार ५२१ रुपयांचा माल चोरून नेला.

खाऊचे आमिष दाखवून दोन मुलींवर बलात्कार
सांगली, ९ जून / प्रतिनिधी
खाऊचे आमिष दाखवून आठ व नऊ वर्षांच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याची घटना तासगाव येथे घडली असून या प्रकरणी पोलिसांनी एकनाथ राजू पाटील (वय ४१, रा. साईनाथ कॉलनी) याला अटक केली आहे. पुणदी रस्त्यावरील साईनाथ कॉलनीत एकनाथ पाटील याचे किराणा मालाचे दुकान आहे. त्याच्या शेजारीच राहणाऱ्या आठ व नऊ वर्षांच्या दोन मुली दुकानासमोरील झाडाखाली खेळत होत्या. या दोघींना दुकानाच्या मागील खोलीत आरोपीने नेले. दुकान बंद करून त्याने या दोन्ही मुलींवर बलात्कार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला, तर जिवे मारण्याची धमकीही दिली. चार दिवसांनंतर या मुलींना शारिरीक त्रास होऊ लागल्याने त्यांनी घरातल्यांना हा प्रकार सांगितला. मुलींच्या कुटुंबीयांनी फिर्याद दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

स्वरूप कंकाळ यांचे लोकसेवा परीक्षेत यश
कोल्हापूर, ९ जून / विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिकेच्या राधाकृष्ण शाळेतील प्राथमिक शिक्षक स्वरूप कंकाळ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी परीक्षेत यश मिळवले आहे. आयोगाने त्यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल प्राथमिक शिक्षण मंडळाचे उपसभापती भरत रसाळे यांनी सत्कार केला.

सत्यभामा वडतिले यांचे वृद्धापकाळाने निधन
सोलापूर, ९ जून / प्रतिनिधी

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतिले यांच्या मातुश्री श्रीमती सत्यभामाबाई नारायणराव वडतिले यांचे मंगळवारी सकाळी वार्धक्याने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन पुत्र, पाच कन्या, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर रस्त्यावरील रूपाभवानी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी विविध राजकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील मंडळींसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

बेरोजगार निर्मूलन परिषदेतर्फे आज मोर्चा
सोलापूर, ९ जून/प्रतिनिधी
होटगी रस्त्यावरील बँक ऑफ इंडिया येथे केंद्र शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत लाभार्थीची फसवणूक व पिळवणूक केल्याबद्दल बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी तसेच बेरोजगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध येत्या १० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र बेरोजगार निर्मूलन परिषदेचे अध्यक्ष बसवराज येरनाळे यांनी दिली. सोलापूर शहर आणि परिसरात अनेक उद्योगधंदे बंद पडल्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे. केंद्र शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम रोजगार उपलब्ध होण्यासाठी जाहीर केला. त्यासाठी कोटय़वधींच्या निधीची तरतूद करण्यात आली. परंतु ही योजना राष्ट्रीयीकृत बँक प्रभावीपणे व प्रामाणिकपणे राबवित नसून तेथे मनमानी पद्धत व भ्रष्ट मार्गाचा अवलंब होत आहे. त्यामळे बेरोजगारांची पिळवणूक व फसवणूक होत असल्याबद्दल येत्या १० जून रोजी सकाळी १० वाजता पांजरापोळ चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे येरनाळे यांनी सांगितले.

श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालयाला विद्यापीठाची मान्यता
फलटण, ९ जून / वार्ताहर
फलटणमधील नामांकित फलटण एज्युकेशन सोसायटीला कृषी महाविद्यालयाची परवानगी मिळाली असून, राहुरी कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या कृषी महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया जुलै-२००९ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती संस्थेचे सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. या कृषी महाविद्यालयाद्वारे ४ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बी.एस्सी. (अ‍ॅग्री) पदवी प्राप्त होणार असून, इयत्ता बारावीनंतर या महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. संस्थेच्या श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालयात-फलटण, सरदार वल्लभभाई हायस्कूल-साखरवाडी, म्हसवड हायस्कूल येथे या वर्षीपासून तांत्रिक (टेक्निकल) विभाग सुरू करण्यासही मान्यता मिळाली आहे.

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांची सांगलीत ८१ टक्के उद्दिष्टपूर्ती
सांगली, ९ जून / प्रतिनिधी
सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने संपूर्ण जिल्ह्य़ात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत गत आर्थिक वर्षांत १६ हजार २८२ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी गत वर्षांत १३ हजार १३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यात ८१ टक्के इतके उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वाघमारे यांनी दिली. डॉ. वाघमारे म्हणाले की, दि. १ एप्रिल ते दि. ३१ मार्च २००९ या वर्षांत १३ हजार १५३ जणांच्या नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यात ३८० पुरूषांचा समावेश असून १२ हजार ७७३ महिलांचा समावेश आहे. त्यात आटपाडी तालुक्यात ८०७, कडेगाव ७४०, जत १७२५, कवठेमहांकाळ ९७३, खानापूर ८८२, मिरज २३३५, पलूस ६९२, शिराळा १०१२, तासगाव १०७०, तर वाळवा तालुक्यात २३१६ जणांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गत आर्थिक वर्षांत १६ हजार २८२ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ८१ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे.

सहायक कामगार आयुक्त जानराव यांची पुण्याला बदली
सोलापूर, ९ जून / प्रतिनिधी
येथील सहायक कामगार आयुक्त मिलिंद जानराव यांची त्याच पदावर पुणे येथे बदली झाली असून, त्यांच्याजागी लातूरचे बी. आर. देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. श्री. देशमुख यांनी नुकतीच आपल्या पदाची सूत्रे घेतली आहेत.नूतन सहायक कामगार आयुक्त देशमुख यांनी यापूर्वी सोलापुरात सरकारी कामगार अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांची मुंबई येथे सहायक कामगार आयुक्त म्हणून बढतीवर बदली झाली. तेथून ते लातूरला आल्यानंतर आता त्यांची सोलापूरला नियुक्ती झाली आहे.

बालहक्क अभियानतर्फे शुक्रवारी जेल भरो आंदोलन
कोल्हापूर, ९ जून / विशेष प्रतिनिधी
बालमजुरांना संरक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या आदेशाविरोधात आंतरराष्ट्रीय बालमजूर विरोधीदिनी (१२ जून) बालहक्क अभियानातर्फे जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक अनुराधा भोसले यांनी दिली. त्या म्हणाल्या, आजही पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षण मोफत व गुणवत्तापूर्ण दिले जात नाही. विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण ६५ टक्के आहे. राज्य शासनाने २५ एप्रिल २००६ ला क्रांतिकारी अध्यादेश काढला. त्यात १८ वर्षे वयापर्यंत सर्वच धोकादायक व्यवसायातील मुलामुलींना मुक्त केले जाईल असे म्हटले आहे. परंतु बालमजुरांच्या हिताचे रक्षण करणारा हा आदेश रद्द केला. या आंदोलनाचे सुरेश शिपूरकर, व्यंकाप्पा भोसले, अंबिका कांबळे, शकुंतला कांबळे, कृष्णात कांबळे, समीर मुजावर, डॉ.मकसुद पटेल, सुनिता भोसले संयोजन करीत आहेत.

वैभव फाऊंडेशनच्या वेबसाईटचा उद्या आरंभ
सोलापूर, ९ जून/प्रतिनिधी
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची व्याप्ती वाढण्यासाठी वाटचाल करणाऱ्या वैभव एज्युकेशनल अ‍ॅन्ड सोशल फाऊंडेशनच्या वेबसाईटचा शुभारंभ गुरुवारी ११ जून रोजी सकाळी ९.३० वाजता ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांच्या हस्ते होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजकुमार शहा यांनी दिली. बाळीवेशीतील बुधले गल्ली-नवलाख अपार्टमेंटमध्ये संस्थेच्या सभागृहात होणाऱ्या या समारंभाचे अध्यक्ष म्हणून प्रा. विलास पात्रुडकर हे उपस्थित राहतील. वेबसाईटचे संकलन व संपादन प्रा. पात्रुडकर यांनी केले असून, त्याचा आकृतिबंध व आलेखन जादू-मल्टिमीडियाचे संचालक सागर अक्कलकोटे यांनी केले आहे. संस्थेच्या अमृता चाईल्ड नर्सरीला यापूर्वीच आयएसओ ९००१-२००० हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. संस्थेला आयकर खात्याकडून ८०जी प्रमाणपत्रही मिळाल्याचे शहा यांनी सांगितले.

अखंड ज्ञानदान सत्र आजपासून
सातारा, ९ जून/प्रतिनिधी

येथील समर्थ सेवा मंडळाच्या वतीने अखंड ज्ञानदान सत्राचा उपक्रम सुरू करण्यात येत असून, त्याचा शुभारंभ उद्या नामवंत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र हर्षे यांच्या ‘आरोग्यासाठी योग’ या व्याख्यानाने होणार आहे, अशी माहिती सिद्धार्थ तडसरे यांनी दिली.