Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ला प्रथम पुरस्कार
कोल्हापूर, ९ जून / विशेष प्रतिनिधी

 

रसिकप्रेक्षकांना उत्तमोत्तम चित्रपटांची अनुभूती आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या तरुणांची पाठशाळा अशी दुहेरी भूमिका सशक्तपणे बजावणारे व्यासपीठ म्हणून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे येतो आहे. अशा व्यासपीठाला अधिकाधिक सशक्त बनवून रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्था व शासनकर्ते यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांनी येथे व्यक्त केले. दरम्यान, समारंभात महोत्सवात दाखविण्यात आलेल्या चित्रपटांपैकी सर्वात प्रथम प्रेक्षकपसंतीचा चित्रपट म्हणून परेश मोकाशी दिग्दर्शित हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.
येथील केशवराव भोसले नाटय़गृहात कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा मंगळवारी सायंकाळी मोठय़ा थाटामाटात समारोप झाला. या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीजचे सरचिटणीस सुधीर नांदगावकर, दक्षिण विभागाचे उपाध्यक्ष एच.एन.नरहरीराव, पश्चिम विभागाचे सचिव सुभाष देसाई, राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाचे विजय जाधव, महोत्सवाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, उपमहापौर सौ.स्मिता माने, बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत हा
समारंभ झाला. अध्यक्षस्थानी फिल्म डिव्हीजनचे संचालक कुलदिप सिन्हा होते.
डॉ.जब्बार पटेल म्हणाले, मराठी चित्रपट व्यवसायामध्ये आज आपण एका विशिष्ट मानसन्मानापर्यंत पोहोचलो असलो तरी फिल्म फेस्टिवल या व्यासपीठानेच आपणास घडविले आहे. अभावाने होणाऱ्या फिल्म फेस्टिवलला हजेरी लावल्यानेच जगात उत्तमोत्तम काय चालते इथंपासून चित्रपट निर्मितीच्या विस्तारलेल्या कक्षांपर्यंत आपल्या आकलन शक्तीमध्ये मोलाची भर पडली. आज सुदैवाने मराठी चित्रपट व्यवसायात येणाऱ्या तरूण पिढीपुढे असे अडथळे नाहीत. माध्यमांच्यात प्रगल्भता आली. तंत्र इतके विकसित झाले की, जगातल्या उत्तमोत्तम चित्रपटांच्या चित्रफिती सहज उपलब्ध होतील अशी स्थिती निर्माण झाली आणि फिल्म फेस्टिव्हलचे मोहोळही जागोजागी उपलब्ध होते आहे. असे महोत्सव रसिकप्रेक्षकांना भाषा, प्रांत यांचे बंध तोडून जागतिक पातळीवरील अत्युच्च कलाकृतींपर्यंत पोहोचवितात. पण त्याचबरोबर चित्रपट निर्मिती करणाऱ्या तरूणांना नवनवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून देण्यातही महत्वाची भूमिका बजावत आहेत. सहाजिकच असे महोत्सव मोठय़ा संख्येने होण्यासाठी सर्व घटकांनी पुढाकार घेतला पाहिजे.
समारंभाचे स्वागत बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी केले. कोल्हापूरात महोत्सवाच्या निमित्ताने केलेल्या नव्या प्रयत्नाला दिलेल्या प्रतिसादाने आपल्या चळवळीला मोठे बळ आल्याचे त्यांनी नमूद केले. तर जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी पहिल्याचवर्षी कोल्हापूरकरांनी दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादामुळे चित्रपटमहोत्सवाच्या आयोजनासाठी एक स्थायी स्वरूपाची समिती नेमून पुढील वर्षांपासून होणाऱ्या चित्रपट महोत्सवात परदेशी निर्माते आपले चित्रपट घेवून चर्चेसाठी उपलब्ध होतील असे प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.
फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे सरचिटणीस सुधीर नांदगावकर यांनी यावेळी चित्रपटांची ही चळवळ छोटय़ा शहरांपर्यंत पोहोचविण्यासाठी संपूर्ण देशभर महोत्सवांची चळवळ उभारण्यात येत असल्याचे सांगितले. या महोत्सवांतर्गत १५ ऑगस्टपासून सोलापूर येथे तर ११ सप्टेंबरपासून नागपूर येथे अशाच फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तर कोणत्याही शहरात फिल्म फेस्टिवल करण्याची तयारी स्वयंसेवी संस्थांनी दाखवली तर त्यांना फिल्म डिव्हीजनतर्फेसंपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन कुलदिप सिन्हा यांनी अध्यक्षपदावरून बोलताना दिले.
समारंभात परेश मोकाशी (हरिश्चंद्राची फॅक्टरी), राजीव पाटील (जोगवा), सतीश मन्वर (गाभ्रीचा पाऊस), सचिन कुंडलकर (गंध) व दिनेश भोसले (मर्मबंध) या दिग्दर्शकांचा, संजय पाटील, प्रशांत पेठे व रणजित गुगळे या निर्मात्यांचा, नंदू माधव, मयूर खांडगे या कलावंतांचा तसेच अमलेंदु चौधरी (कॅमेरामन), केदार कुलकर्णी (कलादिग्दर्शक) यांचा सत्कार करण्यात आला. समारंभाच्या शेवटी महोत्सवातील प्रेक्षकांच्या प्रथम पसंतीच्या चित्रपटाची घोषणा डॉ.जब्बार पटेल यांनी केली. हा पुरस्कार हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाला देण्यात आला. या स्पर्धेत ३३४ प्रेक्षकांनी भाग घेतला होता.