Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

दलित तरुणाच्या खूनप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर, ९ जून/प्रतिनिधी

 

शहरात भवानी पेठेत मराठा वस्तीजवळ एका दलित तरुणाचा सवर्णानी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अखेर मृत्यू झाल्यामुळे त्या भागात मंगळवारी तणावाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, याप्रकरणी सहाजणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी त्यापैकी एका आरोपीला न्यायदंडाधिकाऱ्यासमोर उभे केले असता त्यास पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
दीपक सोपान साबळे (वय २०, रा. राजीव गांधीनगर, भवानी पेठ) असे मृत दलित तरुणाचे नाव आहे. या गुन्हय़ात मराठा महासंघाचे कार्यकर्ते अनंत जाधव यांच्यासह सिद्धेश्वर ऊर्फ तात्या जयप्रकाश वडतिले, गणेश जाधव, शिवानंद वाडकर व भाग्या यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. मृत दीपक हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करून स्वत:ची उपजीविका भागवित असे. तो आपले मित्र बबलू व सूरज यांच्यासह नेहमीप्रमाणे गेल्या रविवारी रात्री नऊच्या सुमारास मार्केट यार्डात हमालीच्या कामासाठी घराकडून निघाला होता. वाटेत मराठा वस्तीजवळ त्याची अनंत जाधव याच्याबरोबर किरकोळ कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्या वेळी जाधव व त्याच्या साथीदारांनी जातिवाचक शिविगाळ करीत त्याच्यावर तलवारींनी व काठय़ांनी हल्ला चढविला. यात तो गंभीर जखमी झाला. तर त्याचे मित्र बबलू व सूरज हे दोघांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला.
या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तिघाजणांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यापैकी दीपक साबळे याचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे मराठा वस्ती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्हय़ात काल सोमवारी यातील एक आरोपी सिद्धेश्वर ऊर्फ तात्या वडतिले यास अटक करून आज दुसऱ्या दिवशी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता त्या वेळी पोलीस तपास अधिकारी हजर नसल्यामुळे सरकार पक्षाची बाजू कमकुवत पडली. परिणामी, न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपी वडतिले यास पोलीस कोठडी मिळू शकली नाही. त्याला न्यायालयीन कोठडीत देण्यात आली.
मराठा वस्तीत दलित तरुणाचा खून झाल्याच्या पाश्र्वभूमीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तरी सुध्दा सायंकाळी दगडफेक व जाळपोळीच्या घटनेने या परिसरातील शांततेला गालबोट लागले. खून प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी म्हणून तरुणांच्या एका जमावाने रस्त्यावर येऊन दगडफेक केली. तसेच ज्ञानेश्वर भागवत शिरसट यांच्या घरावर हल्ला करुन घराला आग लावली. यात संसारोपयोगी वस्तूंसह फर्निचर जळून खाक झाले. सुदैवाने या जाळपोळीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.