Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

सोलापुरात रॉकेल तस्कराविरुद्ध प्रथमच स्थानबद्धतेची कारवाई
सोलापूर, ९ जून/प्रतिनिधी

 

शासननियंत्रित दरातील रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या एका रॉकेल तस्कराला सोलापुरात पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी प्रतिबंध कायद्याखाली सहा महिन्यांसाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. रॉकेल तस्कराविरुद्ध ही पहिलीच कारवाई असल्याने रॉकेल तस्करांना दणका बसला आहे.
कौसर अब्दुल सत्तार देशमुख (वय ४८, रा. शास्त्रीनगर) असे प्रतिबंध कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आलेल्या रॉकेल तस्कराचे नाव आहे. आतापर्यंत झोपडपट्टीदादा व हातभट्टी गाळणारे आणि विक्री करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध एमपीडीए अन्वये एक वर्षांसाठी स्थानबद्धतेची कारवाई केली जात होती; परंतु अलीकडे शहरात गोरगरिबांसाठी शासनाकडून नियंत्रित दराने मिळणाऱ्या रॉकेलचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार केला जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी त्याची गंभीर दखल घेऊन काळय़ा बाजारास प्रतिबंध व अत्यावश्यक वस्तू पुरवठा कायदा कलम १९८० अन्वये कौसर देशमुख यास सहा महिन्यांसाठी स्थानबद्ध करण्याची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलीस निरीक्षक शहाजी सूर्यवंशी, रमेश कंतेवार, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब पाटील, हवालदार विलास जाधव व सदर बझार पोलिसांनी भाग घेतला होता. देशमुख याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात रॉकेलचा काळाबाजार केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. त्याचाच आधार घेऊन त्यास स्थानबद्ध करण्यात आले.
या कारवाईचे सामान्य नागरिकांतून स्वागत केले जात आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी रॉकेल तस्करांविरुद्धची ही पहिली कारवाई असून, रॉकेलच्या काळाबाजारावर आळा घालण्यासाठी अन्य रॉकेल तस्करांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्यावरही स्थानबद्धतेची कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. पोलीस आयुक्तांच्या या कारवाईच्या मोहिमेमुळे रॉकेल तस्करांवर जरब बसण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे.