Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

आषाढी वारीची नियोजन बैठक कोणत्याही निष्कर्षांविना गुंडाळली!
पंढरपूर, ९ जून/वार्ताहर

 

पंढरीनगरीत २८ जून ते ७ जुलै दरम्यान संपन्न होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या सुमारे दहा लाख भाविक, वारकरी यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधा यावर विचारविनिमय करण्यासाठी बोलाविण्यात आलेली आषाढी यात्रा नियोजन बैठक कोणत्याही निष्कर्षांविना अवघ्या पाऊण तासात गुंडाळण्यात आल्याने वारकऱ्यांच्या सोयींबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
आषाढी एकादशी ३ जुलै रोजी आहे. सप्तमीपासून, म्हणजे २८ जूनपासूनच पंढरीत भाविकांची अलोट गर्दी सुरू होते. आलेले वारकरी हे पौर्णिमेपर्यंत, म्हणजे ७ जुलैपर्यंत पंढरीत मुक्कामी असतात. या अंदाजे दहा ते पंधरा दिवसांतील मुक्कामी वारकऱ्यांना रॉकेल, दूध, पाणी, आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही नगरपरिषद, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय या अधिकाऱ्यांवर या काळात असते.
पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यात तीन जिल्ह्य़ांचे अधिकारी, महत्त्वाचे खातेप्रमुख उपस्थित होते; परंतु बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शिरीष कटेकर यांनी यात्रा नियोजन बैठकीची निमंत्रणे ही ठरावीक लोकांनाच दिली जातात, असे सांगून वादाला तोंड फोडले. त्यावेळी पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी हस्तक्षेप करून ही यात्रेची बैठक आहे, याला राजकीय रंग देऊ नये, असे सांगितले.
गेल्या वर्षी आषाढी यात्रेत रॉकेलचा मोठा तुटवडा होता. त्यामुळे वारकऱ्यांना बाहेर फिरावे लागले होते.
पंढरीत दहा लाख वारकरी मुक्कामी असतात. यातील किमान दोन ते अडीच लाख भाविकच रॉकेल स्वयंपाकासाठी वापरतात. त्यांच्यासाठी किमान तीन लाख लीटर रॉकेलची गरज असताना केवळ दीड लाख लीटर रॉकेल मागविण्यात येते. हे प्रमाण व्यस्त आहे. या पुरवठय़ातून सप्तमी ते पौर्णिमा या दहा दिवसांत अवघ्या ४० ते ५० हजार वारकऱ्यांना लाभ होतो. त्यावर बैठकीत कोणतीच चर्चा झाली नाही. यात्रा पंढरीत भरत असल्याने यात्रेच्या काळात छोटे व्यापारी, दिंडीवाले, फडकरी, नागरिक यांना अनेक अडचणी येतात. यासाठी सर्वाना बैठकीस आमंत्रित करणे गरजेचे असते. व्यापाऱ्यांना बैठकीत आमंत्रित करण्यात आलेले नव्हते. बंदोबस्तासाठी आलेले पोलीस हे व्यापाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरतात. दरवर्षी यात्रेच्या काळात व्यवहार बंद ठेवून याचा निषेध केला जातो. यावरही कोणतीच चर्चा झाली नाही.
आषाढी यात्रा ही पंढरपूरमधील नागरिकांसाठी महत्त्वाची असून, आर्थिक कणाही आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत. याबाबत चर्चा होईल, असे व्यापाऱ्यांना वाटत होते; परंतु तसे न झाल्याने व्यापाऱ्यांतही नाराजी पसरली आहे. समिती ही हंगामी असून, त्यांनी दैनंदिन कामकाज पाहाणे हे असताना न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांचीच मनमानी चालू आहे. समितीकडे जे कर्मचारी आहेत ते भाविकांशी उद्धट वर्तन करतात. नेमप्लेट न लावणे, अरेरावी करणे आदी बाबी या सुरक्षारक्षकांकडून घडत असतात. त्यांच्यावर आवर घालणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.