Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

आझाद मैदानावर आज सत्याग्रह- डॉ. दाभोलकर
सातारा, ९ जून / प्रतिनिधी

 

गेली दहा वर्षे सत्तेत असूनही राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीचे सरकार जादूटोणा प्रतिबंधक कायदा करण्याची सामाजिक इच्छाशक्ती दाखवत नाही इतके ते निर्लज्ज आहेत, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी संतप्तपणे सांगितले. बुधवारी १० जूनला मुंबईतील आझाद मैदानावर निषेध व निर्धार सत्याग्रह होणार असल्याचे सांगितले.
शासनाला या वेळी कोणतेही निवेदन न देता सत्याग्रह करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे शेवटचे अधिवेशन चालू आहे. संयुक्त चिकित्सा समितीकडे प्रलंबित असलेल्या जादूटोणा प्रतिबंधक विधेयकावर समितीच्या बैठकीअभावी काहीच पुढे झाले नाही. त्यामुळे विधिमंडळापुढे या वेळी हे विधेयक येण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. आता या कायद्यासाठी लढा पुढेही निर्धाराने चालू ठेवण्याचा संकल्प येत्या १८ जूनला पुणे येथील महात्मा फुले यांच्या वाडय़ाच्या परिसरात करण्यात येणार आहे.
आझाद मैदानावर तसेच राज्यातील सर्व जिल्ह्य़ात तराजूच्या एका पारडय़ात समाज सुधारकांची परंपरा वा दुसऱ्यात काळी बाहुली, लिंबू व मिरची. काळ्या बाहुलीचे पारडे जड होते आहे व त्यास करंटेपणाने शासन हातभार लावते आहे, असे दर्शविणारे तराजूंचे प्रतीक सत्याग्रहाच्या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याचे डॉ. दाभोलकर यांनी सांगितले. आवश्यक पडल्यास जनआंदोलन करून सत्तेवर येणारे नवे शासन हा कायदा करेल यासाठी पाठपुरावा केला जाईल. नव्या विधिमंडळात अशासकीय विधेयक मांडू पण फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांपासून पळ काढणारांचे राजकारण महाराष्ट्रात समिती यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार समितीचा असल्याचे डॉ. दाभोलकर यांनी सांगितले.