Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

रवी बँकेच्या १५ जणांना अटकपूर्व जामीन नामंजूर
कोल्हापूर, ९ जून / प्रतिनिधी

 

सुमारे १७ कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याच्या आरोपावरून येथील रवी को ऑप बँकेच्या आजी-माजी संचालक, सहायक व्यवस्थापक आदी २८ जणांविरूध्द लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून २८ पैकी १५ जणांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दाखल केलेला अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस.वागवसे यांनी आज फेटाळून लावला. आर्थिक घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार बाबुराव जाधव याच्यासह तिघाजणांना यापूर्वी अटक करण्यात आली असून त्यांना पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक हरिदास रामकृष्ण सोनवणे, माजी नगरसेवक जयराम पचिंद्रे, तुकाराम तेरदाळकर, आनंदराव पायमल तसेच बाळासाहेब रामकृष्ण सोनवणे, जहाँगीर जमादार, सुमन शेजाळे, प्रकाश ठाकूर, सुधीर खराडे, महादेव डमाकले, संभाजी कदम, नंदकुमार संकपाळ, सुनील कोंडवाळे, अब्दुलसत्तार मुल्ला, माधवराव घोडके अशी जामिनअर्ज फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील बहुतांशी आरोपींची आर्थिक स्थिती वैभवसंपन्न आहे. या सर्वानी आपणाला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्या.वागवसे यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आरोपींच्या वकिलांचे आणि सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्या.वागवसे यांनी जामिनअर्ज फेटाळून लावला.
आर्थिक घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार समजले जाणारे बाबुराव जाधव, प्रदीप राठोड, के.जी.मोरे या तिघाजणांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने या तिघाजणांची नुकतीच जामिनावर सुटका केली आहे. आज जामिनअर्ज फेटाळलेल्या संशयित आरोपींनाही पोलीस ठाण्यात शरण येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. एक दोन दिवसात हे सर्व आणि राहिलेले इतरही संशयित आरोपी पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे.