Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

राज्यात काँग्रेसला पुन्हा जोमाने उभे करा- पृथ्वीराज चव्हाण
कराड, ९ जून / वार्ताहर

 

केंद्रातून राज्याला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही देताना, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जनाधार मिळाला. आता महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसला जोमाने उभे करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेसचे महासचिव व पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरनिवड होताना स्वतंत्रपदभाराची बढती मिळाल्याबद्दल सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते पृथ्वीराज चव्हाण यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, राज्याचे महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, संजय दत्त, मदन भोसले, पी. एन. पाटील-सडोलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्कारास उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, की काँग्रेस आघाडीच्या पाच वर्षांच्या भरीव कामामुळे देशात काँग्रेसला जनाधार मिळून सत्तेची जबाबदारीही मिळाली. आता जनतेच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गतीने कामाला लागावे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला वातावरण चांगले आहे. केंद्रात महाराष्ट्राचे ९ मंत्री आहेत. १५ ऑगस्टपूर्वी आचारसंहिता जारी होणार आहे. तरी कामाचा सपाटा लावा. केंद्रात आम्ही सर्वतोपरी मदत करू. आपण महाराष्ट्राला कधीही कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन श्री. चव्हाण यांनी दिले.
शिवाजीराव देशमुख म्हणाले की, पंतप्रधान जी खाती स्वत:कडे ठेवतात त्याच महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे. ज्यांची क्षमता व विश्वासार्हता आहे त्यांनाच ही संधी दिली जाते. पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिपदाबरोबरच महासचिव म्हणून झालेल्या निवडीचे सोने केले. माणिकराव ठाकरे यांनीही महाराष्ट्रातील काँग्रेसला नवचैतन्याचे वातावरण दिले. आता लोकसभेसाठी मिळालेले यश टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कष्ट घ्यावेत असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले.
माणिकराव ठाकरे म्हणाले, की गत पाच वर्षांत केंद्राकडून राज्यात राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी यापुढेही देशासाठी भरीव योगदान द्यावे.
महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रसंगी पृथ्वीराज चव्हाण यांचा चांदीचा कलश देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. पतंगराव कदम, आमदार मदन भोसले, पी. एन. पाटील आदींची भाषणे झाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी प्रास्ताविक केले.