Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

इचलकरंजी पालिका सभेत खडाजंगी
इचलकरंजी, ९ जून / वार्ताहर

 

इतिवृत्ताचे वाचन, डीकेटीई शिक्षण संस्थेस जागा देणे, घरोघरी कचरा उठाव करणे या विषयांवर सत्तारूढ व विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाल्याने सोमवारची पालिकेची सभा वादग्रस्त ठरली. विशेष सभेवेळी गणपूर्ती करू न शकलेल्या सत्तारूढ गटाने गणपूर्ती करतानाच सर्व ३० विषय मंजूर करण्यात यश मिळवले, तर चारच विरोधी सदस्यांनी तब्बल अडीच तास सत्तारूढ गटाला संसदीय आयुधाचा वापर करीत त्रस्त करून सोडले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा किशोरी आवाडे होत्या.
नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सोमवारी सायंकाळी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे या पहिल्याच विषयावरून विरोधी पक्षनेते जयवंत लायकर, गटनेते सुरेश हाळवणकर, मदन कारंडे व संभाजी नाईक या चार विरोधी सदस्यांनी सत्तारूढ गटाला छेडले. इतिवृत्त वाचायचे झाले तर तीन तासांचा वेळ द्यावा लागला असता. इतका दीर्घकाळ एका विषयासाठी देणे शक्य नसल्याची मानसिकता ओळखून विरोधकांनी नेमक्या या संसदीय आयुधांचा वापर करून सत्ताधाऱ्यांना भंडावून सोडले.
दीड वर्षांपूर्वी एका सभेवेळी इतिवृत्त मंजूर केले, पण त्यातील मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा उल्लेख पकडून नगरविकास खात्याकरवी नोटिसा काढून तीन विरोधी सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा डाव खेळला गेला आहे. हा संदर्भ देऊन इतिवृत्त पूर्ण वाचण्याचा आग्रह हाळवणकर यांनी धरला. तासभर हा वाद रंगल्यानंतर अखेर केवळ क्रमांकानुसार विषय वाचण्याचा आदेश सभाध्यक्षा आवाडे यांनी दिला. त्यानुसार पंधरा मिनिटे हे कंटाळवाणे वाचन झाल्यावर अखेर जयवंत लायकर यांनीच हे वाचन थांबवले. रस्ते, गटार, शौचालय, इमारती आदी १०० कामांसाठी ५ कोटी ६० लाख रुपयांचे एस्टिमेट मंजूर करण्याच्या विषयावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. या सर्व कामासाठी १२.२५ कोटी रुपये इतके अंदाजपत्रकापेक्षा जादा खर्च होतो, असा आक्षेप विरोधकांचा होता. सत्तारूढ गटाने हा विषय ठरावाला टाकून तो २५ विरुद्ध ४ असाजिंकून विरोधकांवर मात केली. डीकेटीई संस्थेस जागा देण्याच्या विषयावर विरोधक आक्रमक होते. जागा दिल्यास अतिक्रमण नियमित करण्याचा प्रकार होऊन नगरसेवकांचे पद संपुष्टात येईल, असे हाळवणकर यांचे मत होते. सत्तारूढ गटाचे पक्षप्रतोद अशोक आरगे यांनी या प्रकरणाचा १८ वर्षांचा इतिहास मांडून शासकीय अधिकाऱ्यांनी या कामास संमती दिल्याचे सांगून यामुळे कोणतेही नुकसान संभवत नाही, असा खुलासा केला. सभाध्यक्षा आवाडे यांनी नियमास अधीन राहून विषय मांडल्याचे सांगितले. हा विषय सत्तारूढ गटाने बहुमतानेजिंकला. कचरा उठाव व महिला बचतगटांना ठेका देण्याच्या विषयावर विरोधकांनी टीकेचे लक्ष्य मुख्याधिकारी त्रिंबक डेंगळे पाटील यांना करण्याचा प्रयत्न केला. तानाजी पोवार, रवि रजपुते, दीपक सुर्वे, राहुल खंजिरे आदी काँग्रेसच्या सदस्यांनी कामाची तीव्रता पटवून विरोधकांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. बचतगटास या कामाचा मक्ता देण्यावर एकमत झाले.