Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

अनुदान समप्रमाणात वाटपासाठी काँग्रेस नगरसेवकांचे उपोषण
सांगली, ९ जून / प्रतिनिधी

 

सांगली महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी शासकीय अनुदानाचे समप्रमाणात वाटप करावे, या मागणीसाठी विरोधी काँग्रेसचे लक्ष्मण नवलाई व बाळाराम जाधव या दोन नगरसेवकांनी सोमवारपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली. सत्ताधारी विकास महाआघाडीतील काही ठराविक चौकडीने महापालिका स्वत:ची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केल्याचा आरोपही त्यांनी केला.
आज सकाळी अकरा वाजता लक्ष्मण नवलाई व बाळाराम जाधव यांनी महापालिका मुख्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली. या वेळी विरोधी पक्षनेते मुन्ना कुरणे, हणमंत पवार, राजेश नाईक, प्रमोद सूर्यवंशी, अजित दोरकर, विशाल कलगुटगी, उत्तम साखळकर यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी विकास महाआघाडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करून सारा परिसर दणाणून सोडला.
महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून सव्वा कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यात महापालिकेनेही सव्वा कोटी रुपये घालून हा अडीच कोटी रुपयांचा निधी विकासकामावर खर्च करावयाचा आहे. सत्ताधारी विकास महाआघाडीने विरोधी काँग्रेस नगरसेवकांना डावलून आपल्याच नगरसेवकांच्या प्रभागातील कामे या निधीतून करण्याचा घाट घातला होता. पण काँग्रेसने पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे तक्रार केल्यानंतर विकासकामांची ही यादी दुरुस्त करण्याच्या सूचना डॉ. कदम यांनी दिल्या होत्या.
त्यानंतर विकास महाआघाडीने काँग्रेसलाही न्याय दिला जाईल, अशी भूमिका घेतली होती. मात्र प्रत्यक्षात काँग्रेस नगरसेवकांच्या वाटय़ाला केवळ २४ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याचेही नवलाई यांनी सांगितले. शासकीय अनुदानाचे समन्यायी वाटप न करता हेतुपुरस्सर अपक्ष, जनसुराज्य शक्ती व काँग्रेस सदस्यांच्या प्रभागातील विकासकामे डावलण्यात आली आहेत. विकासकामे, कचरा उठाव व पाणीप्रश्न या सर्वच आघाडय़ांवर विकास महाआघाडी अपयशी ठरली आहे. जनतेच्या हितासाठी या शासकीय अनुदानातून करण्यात येणाऱ्या विकासकामांची निविदा तात्काळ रद्द करून तिचे समन्यायी वाटप करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
विरोधासाठी विरोध- महापौर
शासकीय अनुदानातील निधीवरून काँग्रेसने सुरू केलेले आंदोलन हे केवळ विरोधासाठी विरोध आहे. काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी या निधीतून करावयाच्या कामाबाबतची यादी दिली होती. त्यांनी दिलेली सर्व कामे घेण्यात आली असून, काँग्रेस सदस्यांच्या वाटय़ाला ६० लाख रुपयांचा निधी दिला आहे. केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठीच हे आंदोलन सुरू असल्याची टीका महापौर मैनुद्दीन बागवान यांनी केली.