Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

ठेवीदाराची आत्महत्या: पतसंस्थेच्या अध्यक्षासह तिघांना अटकपूर्व जामीन
सोलापूर, ९ जून / प्रतिनिधी

 

माढा तालुक्यातील बारलोणी येथील संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत जमा केलेल्या ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ चालविल्याने प्रतिभा भारत माहुळे (रा. खडकपुरा, करमाळा) या ठेवीदार महिलेने केलेल्या आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या पतसंस्थेच्या अध्यक्षा मनीषा रामेश्वर लोंढे यांच्यासह तिघाजणांचा अटकपूर्व जामीनअर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. पाटील यांनी प्रत्येकी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर मंजूर केला.
मयत प्रतिभा माहुळे यांनी संत रोहिदास पतसंस्थेत ४ लाख १३ हजारांची ठेव जमा केली होती. दरम्यान, त्यांना कर्करोगाने पछाडल्याने पैशाची गरज निर्माण झाल्यामुळे त्यांनी ठेवीची रक्कम परत मागितली. परंतु अध्यक्षा व संचालकांनी रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळेच त्यांनी वैतागून त्यांनी २४ फेब्रुवारी २००९ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी करमाळा पोलिसांनी पतसंस्थेच्या अध्यक्षा मनीषा लोंढे, संचालक शिवाजी महादेव भोसले व निरीक्षक धनंजय भानुदास नीळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी अर्जदारांतर्फे अ‍ॅड. मिलिंद थोबडे, अ‍ॅड. धनाजी बागले (माढा), अ‍ॅड. विनोद सूर्यवंशी, अ‍ॅड. राजकुमार म्हात्रे, अ‍ॅड. अभिजित इटकर यांनी काम पाहिले. तर सरकारकडून अ‍ॅड. प्रवीण शेंडे यांनी बाजू मांडली.