Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

सर्व प्रश्नांची उत्तरे माणुसकीतच -धिवरे
सांगली, ९ जून/प्रतिनिधी

 

आपण माणसासारखे वागलो तर अनेक समस्या सुटतात. माणसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माणुसकीतच आहे , असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक धिवरे यांनी आज व्यक्त केले.
टाटा मोटर्स कंपनी, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीए), केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी), पंडित ऑटोमोटिव्ह लिमिटेड, तसेच सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या चालक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन धिवरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य बाबा शिंदे, कोल्हापूर परिमंडलाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार, सीआयआरटीचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश जाधव, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी, पंडित ऑटोमोटिव्हचे संचालक एस. बी. नारके, टाटा मोटर्सचे महाव्यवस्थापक (मनुष्यबळ) प्रशांत अहीर, महाव्यवस्थापक (गुणवत्ता आश्वासन) के. चंद्रशेखर, कार्यक्रमाचे समन्वयक बाबा राणे, ज्येष्ठ चालक रफिकभाई मुजावर उपस्थित होते. या शिबिरात सुमारे दीडशे ट्रकचालक सहभागी झाले होते. धिवरे म्हणाले , चांगला माणूसच चांगला वाहनचालक बनू शकतो. गाडी चालविण्याचे लायसन्स देणाऱ्या अधिकाऱ्यापासून प्रत्येकाने जबाबदारीने वागले तर आपल्या सर्वाचीच सुरक्षितता वाढेल. खुर्ची सगळे शिकवते, असे म्हणतात; मात्र चालकाच्या धंद्यात कौशल्य लागत नाही, या धारणेचे आपण बळी पडतो. रोग अथवा युद्धांपेक्षाही अपघातांमध्ये मरणाऱ्यांची संख्या मोठी आहे, याकडे श्रीकृष्ण प्रकाश यांनी लक्ष वेधले. आत्मविश्वास, संयम व सभ्यता या तीन गोष्टी असतील तर आपण अपघात टाळू शकतो, असे मत डॉ. पवार यांनी व्यक्त केले. भारतामध्ये रस्ते अपघातात वर्षांला एक लाखापेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडतात, अशी माहिती डॉ. जाधव यांनी दिली.