Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

मोटारसायकलवरील मायलेक अपघातात जागीच ठार
इस्लामपूर, ९ जून/वार्ताहर

 

अज्ञात वाहनाने मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. यात कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथील श्रीमती विद्या श्रीरंग मदने (वय ४४) व मुलगा नीलेश (वय १०) हे मायलेक जागीच ठार झाले, तर आनंदा पोपट मदने (वय २५) हे गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात पुणे-बंगलोर महामार्गावर येलूर फाटय़ानजीक सोमवारी रात्री आठ वाजता झाला. गंभीर जखमी असणाऱ्या आनंदा मदने यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. कराड येथील धनवर्धिनी सहकारी पतसंस्थेत नोकरीस असणाऱ्या आनंदा मदने यांनी नवीन हीरो होंडा मोटारसायकल खरेदी केली होती. पाहुण्यांकडे जागरणाचा धार्मिक विधी असल्याने आनंदा मदने हे आपली चुलती श्रीमती विद्या व चुलत भाऊ नीलेश यांना घेऊन हीरो होंडा मोटारसायकलीवरून कोल्हापूरकडे निघाले होते.
येलूर फाटय़ानजीक पाठीमागून आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला जोराने ठोकरले. ही ठोकर इतकी जोराची होती की, गाडीवर पाठीमागे बसलेले नीलेश व श्रीमती विद्या मदने हे दोघे उडून खाली रस्त्यावर पडले व त्यांच्या डोक्यावरून ते वाहन गेले. त्यामुळे त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन हे मायलेक जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी जखमी आनंदा माने यांना कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची रात्री उशिरा कुरळप पोलीस ठाण्यात नोंद झाली.