Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

विकासकामांमध्ये पलूस तालुका प्रथम आणणार - कदम
सांगली, ९ जून / प्रतिनिधी

 

पलूस तालुक्यात सुरु असलेली विकासकामे लक्षात घेता हा तालुका देशात प्रथम आणण्याचे स्वप्न नक्कीच साकार होईल, असा विश्वास महसूल व सांगली जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केला. पलूस येथील नव्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन डॉ. पतंगराव कदम यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम होते. या इमारतीमुळे तालुक्यातील नागरिकांची सर्व कामे एकाच ठिकाणी होण्यास मदत होईल, असे सांगून डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, सांगली जिल्ह्य़ातील महसुली कामे गतीने पार पडावीत यासाठी १८ नायब तहसीलदारांची पदे भरण्यात आली आहेत. स्टॅम्पधारकांच्या मागण्या मान्य करुन त्यांची मर्यादा १० हजार रूपयांवरुन १५ हजार रुपये इतकी वाढविण्यात आली आहे. कमिशनही पूर्ववत तीन ठक्के करण्यात आले आहे.
आरफळ, ताकारी, म्हैसाळ व टेंभू या योजनांसाठी अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पीक विम्यापोटी देय असलेली २० कोटी रुपयांची रक्कम या महिनाअखेर दिली जाईल. तसेच दोन कोटी रुपयांची तरतुद करुन वीज वितरण कंपनीचे आणखी एक कार्यालय सुरु करण्यात आले आहे. विविध विद्युत उपकंेद्राची १११ कोटी रुपयांची कामे लवकरच सुरु होत आहेत. सांगली- पुसेसावळी रस्ता दुहेरी करण्यासाठी पुरेशा निधीची उपलब्धता केली जाईल. जिल्ह्य़ातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बालगंधर्व व ग. दि. माडगुळकर यांच्या स्मारकांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
याप्रसंगी जिल्हाधिकारी श्याम वर्धने, मुख्य कार्यकारी अधिकारी गोकुळ मवारे व कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिगंबर मळेकर यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमात फुले- आंबेडकर दलित वस्ती पुरस्कार योजनेतंर्गत सांडगेवाडी गावाला दोन लाख रुपयांचा तिसरा, तर घोगाव या गावाला तीन लाख रुपयांचा दुसरा पुरस्कार पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याहस्ते वितरित करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, पलूस पंचायत समितीच्या सभापती श्रीमती पुष्पलता उगळे, पलूसच्या सरपंच माधवी बुचडे, आनंदराव मोहिते, उपविभागीय अधिकारी संजय जाधव व सार्वजनिक बांधकाम मिरज विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. जाधव यांच्यासह सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.