Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

महिन्याकाठी मिरजेत वाहनचालकांना तीन लाखांचा दंड
मिरज, ९ जून / वार्ताहर

 

ध्येयपूर्तीसाठी दिसेल त्या वाहनधारकाला दंड ही भूमिका मिरज शहर वाहतूक विभागाची असल्याने वाहतूक नियमनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. अवघ्या इनमिन दहा किलोमीटर चौरस असणाऱ्या मिरज शहरात महिन्याकाठी तीन लाख रुपयांची दंडवसुली वाहतूक विभाग करीत असला तरी वाहनधारक मात्र कमालीचे जेरीस आले आहेत.
मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट, मुख्य बसस्थानक, महात्मा गांधी चौक व रेल्वेस्थानक ही वर्दळीची ठिकाणे आहेत. स्टेशन रस्ता, शिवाजी रस्ता व सराफ कट्टा या मार्गावर वाहतूक नियमन केले तरी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत केल्याचे दिसून येईल. मात्र वर्दळीच्या ठिकाणी अभावानेच असणारे वाहतूक पोलीस कर्मचारी शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर हमखास पाहावयास मिळत आहेत.
गतवर्षी या विभागाने आठ हजार ८१४ केसेस करून सुमारे २३ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. यंदा हे ध्येय जादा देण्यात आल्याने केसेस करण्याचा धडाकाच कर्मचारी लावत आहेत. मिरज शहर विभागासाठी सहायक पोलीस निरीक्षकासह ३० कर्मचारी तैनात आहेत. ऐन मोक्याच्या व गर्दीच्या जागा केवळ चार ते पाच आहेत. या विभागाने जानेवारी ते मे २००९ या पाच महिन्यांच्या कालावधीतच सात हजार ५७६ केसेस करून गतवर्षीचे उत्पन्नाचे ध्येय गाठले आहे. सुमारे साडेतेरा लाख रुपये दंड वसूलही करण्यात आला आहे. मिरज शहरातील वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी केवळ लक्ष्मी मार्केट परिसर व सराफ कट्टा हीच ठिकाणे आहेत. मात्र या ठिकाणी पोलीस कर्मचारी अभावानेच आढळतात. याचा केवळ वाहनचालकांनाच नव्हे, तर पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. रिक्षातून होणारी प्रवासी वाहतूक हा तर वाहतूक विभागाचा जिव्हाळय़ाचा विषय बनला आहे. उद्दिष्टपूर्ती कमी असेल, तर ‘दिसली रिक्षा आणली ठाण्याला’ ही भूमिका अमलात आणली जाते.
याचा फटका खुद्द आमदार हाफिज धत्तुरे यांना गत सप्ताहात बसला. २०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या रिक्षाचालकास पुन्हा बोलावून एक हजार रुपये दंड ठोठावला. आमदार धत्तुरे यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र वाहतूक नियंत्रण विभागाने कायदा सर्वश्रेष्ठ मानून आमदार धत्तुरे यांच्याकडून दंडाची रक्कम घेतली. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार
करणार असल्याचे आमदार धत्तुरे यांनी सांगितले आहे