Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

पत्राद्वारे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाची सोलापुरात सोय
सोलापूर, ९ जून/प्रतिनिधी

 

सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांविषयीचा मराठी तरुणांमधील न्यूनगंड दूर व्हावा, या परीक्षांची ओळख शालेय स्तरापासूनच व्हावी आणि भविष्यकाळात यशस्वी होण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून सोलापुरात अपूर्वा अभिनव ज्ञानपीठाने पत्रद्वारा स्पर्धा परीक्षांचा तयारीचा अभ्यासक्रम हाती घेतला आहे. याशिवाय समांतर माध्यमिक शाळा व शालेय स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीचा उपक्रमही सुरू केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सात रस्त्यावर शासकीय दूध डेअरीसमोर बाळी इमारतीमध्ये हे ज्ञानपीठ सुरू झाले असून, इच्छुक विद्यार्थी व पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसह एमटीएस, एनटीएस, सीईटी, शिष्यवृत्ती, सामान्य बौद्धिक क्षमता कसोटी (सीएमएटी), शालेय क्षमता कसोटी (एसएटी), सेट-नेट आदी परीक्षांची माहिती, त्यांचा संभाव्य स्तर, प्रश्नांची रेलचेल, तंत्रमंत्र याबाबतचे मार्गदर्शन पत्राद्वारे केले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर्गाची वैशिष्टय़े कथन करताना यात तिसरी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश असून, दहावीपर्यंतच्या अध्यापनावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न राहातील. अकरावीच्या पुढे सर्व वर्गासाठी सामाईक अभ्यासक्रम राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समांतर शाळेतून दहावीच्या परीक्षेस शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांना बसण्याची सोयही या ज्ञानपीठाने केली असून, त्याचाही लाभ घ्यावा. त्यासाठी अपूर्वा अभिनव ज्ञानपीठाशी (९८६०६६०१००) संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले. या पत्रकार परिषदेस अशोक भांजे, सहस्रबुद्धे, महारुद्र शेंडे आदी उपस्थित होते.