Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

गिरणी कामगारांचे आंदोलन स्थगित
गडहिंग्लज, ९ जून / वार्ताहर

 

केशरी कार्ड असूनही आपल्याला पिवळ्या कार्डाप्रमाणे सर्व सवलती मिळाव्यात या मागणीसाठी गिरणी कामगारांनी तहसीलदार कार्यालयाला घेराव घालून दिवसभर काम बंद ठेवण्यास भाग पाडले. तहसीलदार नाहीत, प्रांताधिकारी मुक्कामी असूनही लक्ष देत नाहीत, अशा अवस्थेत आंदोलन एक दिवसासाठी स्थगित ठेवण्यात आले आहे.
गिरणी कामगार म्हणून आपल्याला विशेष सवलती मिळाव्यात या अपेक्षेतून केशरी रेशनकार्ड असूनही पिवळ्या रेशन कार्डावरील सर्व सुविधा आपल्याला मिळाल्याच पाहिजेत, अशी गडहिंग्लज तालुक्यातील मुंबई गिरणी कामगारांनी वारंवार मागणी केली आहे. सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत गिरणी कामगारांनी तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच ठिय्या आंदोलन सुरू करत कार्यालयातील नियमित काम बंद पाडले. आंदोलनाची पूर्वकल्पना असूनही तहसीलदार संजय पवार पुण्याला गेल्याचे समजले. दरम्यान, प्रांताधिकारी सुनंदा गायकवाड या दिवसभर प्रांत कार्यालयासमोर असल्याने तहसीलदारांनीच हा प्रश्न संपवावा, अशी भूमिका घेऊन त्या तटस्थच राहिल्या. त्यांच्याशी संपर्क साधला असता कृपया नायब तहसीलदारांनाच यासंबंधी विचारा, असे सागितले. तहसीलदार कार्यालयात दिवसभर यासंबंधी वारंवार वाटावाघाटी झाल्या. अखेर बुधवार, दि. १० जून रोजी कार्यालयात बैठक घेऊन चर्चा करू असे लेखी पत्र आंदोलकांना देण्याचा प्रयत्न झाला पण आंदोलकांनी पत्र नाकारले.
बुधवार दि. १० जूनपासून मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा निर्धार करण्यात आल्याची माहिती कॉ. संजय तर्डेकर यांनी दिली. रामजी देसाई, अशोक देसाई, अतुल दिघे, दादा मोकाशी आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.