Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

बांधकाम कामगारांची सांगलीमध्ये कार्यशाळा
सांगली, ९ जून/प्रतिनिधी

 

जिल्हा अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीच्या वतीने निवडक बांधकाम कामगारांची कार्यशाळा येथील कष्टकऱ्यांची दौलत येथे झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई येथील मणिबेन कारा इन्स्टिटय़ूट व हिंद मजदूर सभेचे संशोधन अधिकारी प्रवीण राव यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब मगदूम होते.
या कार्यशाळेत प्रवीण राव यांनी ‘असंघटित कामगारांच्या समस्या, त्यांचे प्रश्न व त्यावरील उपाययोजना’ व ‘संघटना, संघटनेचे महत्त्व व संघटन कौशल्य’, तर जनता दलाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ कामगार कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी ‘कंत्राटी कामगार प्रथा निर्मूलन कायदा’ व ‘बांधकाम कामगारांनी संघटित होणे का जरुरीचे आहे’ या विषयावर मार्गदर्शन केले.
ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांनी ‘ग्राहक चळवळ’, ‘ग्राहक सेवा’, ‘ग्राहक कायदा’ व ‘माहितीचा अधिकार’ आदी विषयांवर मार्गदर्शन करून बांधकाम कामगारांना आपल्या व्यवसायात संघटनेसाठी कसा उपयोग करून घ्यावा याबाबत प्रबोधन केले. सहायक कामगार आयुक्त अशोक भिसे यांनी बांधकाम कामगारांना लागू असलेल्या केंद्र शासनाच्या इमारत व बांधकाम कामगार (रोजगाराचे नियम व सेवा) कायदा १९९६ या कायद्याची व या कायद्यातील तरतुदीचे फायदे यांची सविस्तर माहिती देऊन बांधकाम कामगारांना व इतर असंघटित कामगारांना लागू असलेल्या जनश्री विमा योजना, राष्ट्रीय जनस्वास्थ्य विमा, बाल कामगार व शाळा याबाबत माहिती दिली.
बापूसाहेब मगदूम यांनी असंघटित कामगार व असंघटित क्षेत्र यात आलेले नवीन कायदे, संघटना बांधणी, गरज व महत्त्व याबाबत माहिती दिली. प्रारंभी संयोजक विकास मगदूम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यशाळेचे आयोजन हिंद मजदूर सभेच्या मणिबेन कारा इन्स्टिटय़ूटच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे रमेश येरनाळे व हमाल पंचायतीचे जिल्हा संघटक बजरंग खुटाळे यांनी परिश्रम घेतले.