Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

स्त्री-पुरुष समतेसाठी ‘शक्य आहे’ अभियान
सांगली, ९ जून / प्रतिनिधी

 

देश महासत्ता बनत असताना महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्यामुळे समाजात स्त्री- पुरूष समानता आणण्यासाठी ‘शक्य आहे’ हे अभियान राबविले जात असून या अभियानाद्वारे २४ हजार बदल प्रवर्तक घडविले जाणार असल्याची माहिती या अभियानाच्या संघटिका श्रीमती प्रभा धिवार यांनी दिली.
या अभियानांतर्गत बदल प्रवर्तक निर्माण करून त्यांच्यावतीने प्रत्येक घरात, समाजात व गावागावांत तसेच शहरात प्रवर्तन करण्याचे काम सुरू आहे. या अभियानांतर्गत जागृती मेळावे, महाविद्यालयीन बैठका, तालुका व जिल्हा मेळावेही घेण्यात येत आहेत. सन २००५ पासून युवा रूरल संस्कृतीच्या राज्य समन्वयक श्रीमती ज्योती नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान कार्य राबविले जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात आपण स्वत हे अभियान विविध संस्थांच्या माध्यमातून राबविणार असल्याचेही श्रीमती धिवार म्हणाल्या.
पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्य़ांतील २२ तालुक्यात हे अभियान बदल प्रवर्तक निर्माण करीत आहे. सध्या या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात जुन्या बदल प्रवर्तकांबरोबर सातत्य एक हजार इव्हेंट या उपक्रमातून सुरू आहेत. ‘शक्य आहे’ या अभियानाच्या संकल्पनेतून मराठी चित्रपटदेखील तयार करण्यात आला आहे. महिलांवरील अत्याचाराचा अंत करण्याची प्रक्रिया स्वतपासूनच सुरू करावी. त्यासाठी प्रत्येकाने बदल प्रवर्तक झाले पाहिजे, असेही श्रीमती धिवार म्हणाल्या. यावेळी शाहीन शेख, सुरेखा कांबळे, तस्लिम कागवाडकर, लक्ष्मी बनसोडे व माणिक आडसुळे आदी उपस्थित होते.