Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

ग्रामीण विकासासाठी रस्ते, पुलांचे जाळे अत्यावश्यक- डॉ. कदम
सांगली, ९ जून / प्रतिनिधी

 

ग्रामीण भागाच्या विकासासाठी वाहतूक व परिवहनासाठी रस्ते व पूल यांचे जाळे आवश्यक असते. म्हणून अशा कामातील अडथळे स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन दूर करावेत, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केले.
कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग गावानजीक येरळा नदीवरील पुलाचे उद्घाटन डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम होते.
डॉ. पतंगराव कदम म्हणाले, की जर काम सदोषरीत्या पूर्ण केले जात असेल, तर संबंधितांना त्याचा जाब विचारला पाहिजे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरात होणाऱ्या सार्वजनिक कामांच्या गुणवत्तेची काळजी घेतली पाहिजे. कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता दिगंबर मळेकर यांनी या वेळी पुलाची तांत्रिक माहिती दिली.
या वेळी कडेगाव पंचायत समितीच्या सभापती श्रीमती शोभाताई व्होनमाने, उपसभापती सुवर्णा वाघमोडे, सरपंच तानाजी पडळकर, मिरजेचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. जाधव व प्रांत अधिकारी संजय जाधव उपस्थित होते.