Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

पद्मसिंह पाटील हे पक्षाचे ज्येष्ठ, सन्माननीय आणि प्रश्नमाणिक सदस्य
राष्ट्रवादीकडून पाठराखण

नवी दिल्ली, ९ जून/खास प्रतिनिधी
काँग्रेसनेते पवनराजे निंबाळकर यांच्या खुनाचा आरोप सिद्ध होईपर्यंत खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांची पाठराखण करण्याची भूमिका आज राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. पद्मसिंह पाटील यांनी गुन्हा केल्याचे न्यायालयात होत नाही तोपर्यंत ते निर्दोष आहेत आणि गरज पडल्यास कोर्टात लढाई लढण्यासाठीही त्यांना मदत केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले.

अण्णांची तोफ पुन्हा धडाडली
पद्मसिंहांसारखी माणसे दहशतवाद्यांपेक्षाही धोकादायक
मुंबई, ९ जून / प्रतिनिधी
काँग्रेस नेते पनवराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणात अटक झालेले पद्मसिंह पाटील यांच्यासारखे लोक खरे तर कायमचे तुरुंगात असायला हवे. त्यांच्यासारखे लोक हे पाकिस्तानी दहशतवाद्यांपेक्षाही अधिक धोकादायक असतात, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज केला. पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्याप्रमाणे हजारे यांच्याही हत्येची सुपारी दिली होती, असे चौकशीत उघड झाल्यानंतर अण्णांनीही तशी शक्यता बोलून दाखविली होती. त्या पाश्र्वभूमीवर आज सीबीआयतर्फे अण्णा हजारे यांचा जबाब नोंदविण्यात आला. दक्षिण मुंबईतील सीबीआयच्या ‘तन्ना हाऊस’मधील मुख्यालयात सुमारे अडीच तास हजारे यांचा जबाब नोंदविण्यात आला.

शुक्ल, मंदाडेला सीबीआय कोठडी
पनवेल, ९ जून/प्रतिनिधी

काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटील यांचे निकटवर्तीय मोहन शुक्ल आणि सतीश मंदाडे या दोघा आरोपींना पनवेल न्यायालयाने आज १४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. शुक्ल आणि मंदाडेला एक जून रोजी न्यायालयात प्रथम हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यावेळी त्यांना ९ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता या दोघांना सीबीआयतर्फे न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले. सीबीआयने गेल्या नऊ दिवसांत तपासात विशेष प्रगती न केल्याने या आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी आरोपींचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी केली, तर याप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी या दोघांची चौकशी करणे आवश्यक असल्याने त्यांना सीबीआय कोठडीच द्यावी, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील एजाझ खान यांनी केला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे.के. जोशी यांनी सीबीआयची मागणी मान्य करीत शुक्ल आणि मंदाडेला १४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. सुनावणीदरम्यान शुक्ल, मंदाडे, जैन आणि तिवारी या चौघांचे एकत्रित छायाचित्र सीबीआयतर्फे सादर करण्यात आले, मात्र त्याचा तपशील देण्यास उभय वकीलांनी नकार दिला. पद्मसिंह पाटील यांनाही १४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली गेल्याने १४ जूनला पाटील, शुक्ल आणि मंदाडे यांची एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दुखापतीमुळे सेहवाग वर्ल्डकपमधून बाहेर
ट्रेन्ट ब्रिज, ९ जून / पीटीआय

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी इंडियन प्रीमियर लीगदरम्यान दुखापतग्रस्त झालेला भारताचा उपकर्णधार व सलामीवीर वीरेंद्र सेहवाग अखेर एकही सामना न खेळता इंग्लंडहून भारतात दाखल होणार आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे बेजार असलेला सेहवाग सराव सामन्यातही खेळला नाही आणि नेटमध्येही सरावाला येऊ शकला नाही. आज तो सरावाला उतरला पण केवळ १२ चेंडू खेळल्यानंतर त्याला पुढे खेळणे जमले नाही. अखेर या संपूर्ण स्पर्धेत तो खेळणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात येणार आहे.

६०० कोटींच्या वितरणाअभावी ‘महावितरण’ची गोची!
केदार दामले
मुंबई, ९ जून

मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत राज्यातील जनतेला दिलासा मिळावा यासाठी ‘महावितरण’ला खासगी संस्थाकडून वीज खरेदी करण्यासाठी ६०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारने जून महिन्याचा एक आठवडा उलटला असतानाही अद्याप ‘महावितरण’ला ते अनुदान दिलेले नाही. राज्य सरकार अनुदानाची रक्कम देईल या आशेपोटी ‘महावितरण’ने स्वत: ६०० कोटी रुपये खर्च केले असतानाही सरकारने अर्थसंकल्पात तरतूद तर केली नाहीच आणि पूरक मागण्यांमध्येही त्या निधीचा समावेश केलेला नाही. त्यामुळे या ६०० कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागणार असल्याची भावना ‘महावितरण’चे अधिकारी व्यक्त करीत आहेत.

एक्स्प्रेस इन्व्हेस्टिगेशन
‘एनएसजी’पुढे आव्हानांचा डोंगर प्रणव धल सामंता
नवी दिल्ली, ९ जून

कारवाईला ‘ऑपरेशन ब्लॅक टोर्नेडो’ असे नाव दिले गेले. त्वरेने आणि बिनचूकपणे कृती करणे हे उद्दिष्ट होते. तथापि, गुरुवार, २७ नोव्हेंबरच्या पहाटे जेव्हा ‘एनएसजी’चे २०० कमांडो मुंबईत उतरले तेव्हा परिस्थिती फारच बिकट असल्याचे लक्षात आले आणि ‘ताज’ तसेच ‘ओबेरॉय- ट्रायडण्ट’ हॉटेलमधील कारवाई सुरू करण्यास चार तास लागले; तर ‘नरिमन हाऊस’मधील कारवाई जवळपास २४ तास सुरू होती.मुंबई-नवी दिल्ली यांच्यात आधी झालेल्या चर्चेत ओबेरॉय आणि ड्रायडण्ट या लागून असलेल्या दोन हॉटेल्समध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे, हेसुद्धा ‘एनएसजी’ला सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे एकाच ठिकाणी हल्ला झाल्याचे ‘एनएसजी’ गृहीत धरून राहिली. तोच प्रकार ‘ताज’च्या बाबतीतही घडला. ( उर्वरित वृत्त )

पंचतारांकित हॉटेलांच्या सुरक्षेचा विनाकारण भुर्दंड!
मुंबई, ९ जून / प्रतिनिधी

२६/११ च्या हल्ल्यात अतिरेक्यांचे लक्ष्य ठरलेल्या ताज महल आणि ट्रायडण्ट या पंचतारांकित हॉटेलांनी अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिकाधिक कडक केल्यानंतर वास्तविक हॉटेलबाहेर असलेला पोलिसांचा बंदोबस्त काढून घेण्याची आवश्यकता होती. परंतु टीका नको म्हणून या पंचतारांकित हॉटेलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे राखीव बळ विनाकारण खर्ची केले जात असल्याची भावना अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

महिला आरक्षण विधेयकावरून विरोधी पक्षांमध्येच ओढताण
नवी दिल्ली, ९ जून/खास प्रतिनिधी

पहिल्या शंभर दिवसात महिला आरक्षण विधेयक पारित करण्याचा मनमोहन सिंग सरकारने निर्धार व्यक्त करताच या वादग्रस्त विधेयकावरून विरोधी बाकांवरील पक्षांमध्ये ओढताण सुरु झाली आहे. लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी ३३ टक्के आरक्षण कोणत्याही स्वरुपात मिळाले पाहिजे, अशी भूमिका आज भाजपने जाहीर केली, तर या विधेयकाचे कट्टर्र विरोधक मुलायमसिंह यादव, शरद यादव आणि लालूप्रसाद यादव यांच्या भूमिकेचे कल्याण सिंह यांनी समर्थन करताना भाजपशी संबंध तोडण्याचा जदयुला सल्ला दिला.

‘रेबीज इंजेक्शन राज्यभरात मोफत देणार’
मुंबई, ९ जून / प्रतिनिधी

श्वानदंशावर देण्यात येणारे रेबीज हे इंजेक्शन येत्या १ ऑगस्टपासून राज्यातील सर्व नागरिकांना मोफत देण्यात येईल, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला केली. पुणे, िपपरी-चिंचवड, मनमाड व सोलापूर शहरातील मोकाट सुटलेल्या कुत्र्यांचा नागरिकांना होत असलेला उपद्रव या बाबत चंद्रकांत छाजेड आणि अन्य सदस्यांनी मूळ प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना उपर्युक्त आदेश १ ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात येतील, असे मुश्रीफ म्हणाले. पुणे शहरात कुत्रा चावल्यामुळे २००७ मध्ये एक तर २००८ मध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर मार्च २००९ मध्ये येवला तालुक्यातील एका कुत्र्याने अंगुलगाव येथील १७ ग्रामस्थांना चावा घेऊन जखमी केले होते. सोलापूर शहरातील हैदराबाद रस्तावरील विडी कामगाराच्या घरात अमर भूपती येमूल या मुलाचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाला. रेबीज हे इंजेक्शन न दिल्याने त्याचा मृत्यू झाला. तथापि, त्या मुलास दवाखान्यात नेण्यात आले असूनही डॉक्टरांनी त्याला रेबीजचे इंजेक्शन दिले नाही का, याची चौकशी करण्यात येईल, असेही राज्यमंत्र्यांनी सांगितले.

शिवाजीपार्क येथे वृद्ध महिलेची हत्या
मुंबई, ९ जून / प्रतिनिधी

घरात एकटय़ा राहणाऱ्या वृद्ध महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार आज शिवाजी पार्क येथे उघडकीस आला. लक्ष्मी संगोई (७४) असे या महिलेचे नाव असून ती शिवाजी पार्क येथील गोखले रोडवरील असलेल्या हेंद्रे कॅसल इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर राहत होती. संगोई यांना चार मुले असून दोन मुलगे अमेरिकेत स्थायिक आहेत, तर दोन मुलींची लग्न झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी चार नोकर ठेवण्यात आले होते. त्यात एका मोलकरणीचाही समावेश आहे. मात्र चारही नोकर संगोई यांच्यासोबत केवळ दिवसभर असत. रात्री त्या घरात एकटय़ाच असत. आज सकाळी त्यांची मोलकरीण कामावर आली असता तिला संगोई यांच्या घराचा दरवाजा उघडा असलेला दिसला. ती घरात गेली असता शयनगृहात संगोई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आणि घरातील सर्व कपाटे उघडी असल्याचे तिला आढळून आले. त्यानंतर या मोलकरणीने तात्काळ पोलिसांना कळविले. संगोई यांच्या गळ्यावर सहा वार करण्यात आले होते. संगोई यांच्या घरातील सर्व कपाटे उघडय़ा अवस्थेत आढळून असली तरी घरातून कोणतीही वस्तू चोरीला गेलेली नसल्याचे प्रश्नथमिक तपासात पुढे आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे े त्यांची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

 

महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी