Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

जिल्हा परिषद शिक्षण विभागात कोटय़वधींचा घोटाळा
लातूर, ९ जून/वार्ताहर

जिल्हा परिषदेच्या वतीने प्रथमच एप्रिल महिन्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या केलेल्या पटपडताळणीत अनेक घोटाळे उघडकीस आले असून, त्यामुळे शिक्षण विभागातील घोटाळ्यांची साखळीच सापडली आहे. दरवर्षी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये विद्यार्थीसंख्येची पटपडताळणी केली जाते. यावर्षी एप्रिलमध्ये शिक्षण विभागाने पटपडताळणी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या या समितीस तब्बल ४० हजार विद्यार्थी बोगस असल्याचे आढळून आले.

अकार्यक्षम नोकरशाही
हाँगकाँगस्थित पी.ई.आर.सी. या संस्थेने दक्षिण आशियातील काही देशांचा अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केला आणि त्यात असे नमूद केले आहे की, दक्षिण आशियातील १२ प्रमुख देशांमध्ये भारतातील नोकरशाहीची कार्यक्षमता ही सर्वात कमी आहे. या अहवालाच्या आधारे भारतातील ‘अकार्यक्षम नोकरशाही’ अशी बातमी जवळजवळ सर्वच महत्त्वाच्या दैनिकांमधून प्रसिद्ध झाली.

वाढते प्रादेशिक पक्ष आणि प्रांतवादाबद्दल राज्यपालांना चिंता
औरंगाबाद, ९ जून/प्रतिनिधी

वाढते प्रादेशिक पक्ष आणि त्याबरोबरच फोफावणारा प्रांतवाद हा देशाच्या एकात्मतेला घातक आहे. प्रादेशिक पक्ष हे आपल्या प्रदेशाचा विचार करतात. फक्त देश आणि देशाचीच चिंता या पक्षांना नसते, अशा शब्दात महाराष्ट्राचे राज्यपाल एस. सी. जमीर यांनी चिंता व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘आव्हान-२००९’ या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन महामहीम राज्यपालांच्या हस्ते झाले.

अंगठेबहाद्दर महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन आणि न निघालेला मूक मोर्चा
पद्मसिंह पाटील अटक प्रकरण
उस्मानाबाद, ९ जून/वार्ताहर
सकाळी दहाची वेळ; राष्ट्रवादी काँग्रेस भवनात महिला एकत्र आल्या. त्यांना डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या अटकेच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढायचा होता. पोलिसांनीही तगडी यंत्रणा उभी केली आणि सांगितले, जमावबंदी आहे. बाहेर पडाल तर अटक करू! तोपर्यंत पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तेवढीच बातमी म्हणून पुढे सरसावले. पण कितीतरी वेळ महिला काही बाहेर आल्या नाहीत.

विजेच्या तारांनी घेतला बालकाचा बळी
खांब कोणाचा यावरून संस्थांनी हात झटकले
औरंगाबाद, ९ जून/प्रतिनिधी

खांबात उतरलेल्या विद्युतप्रवाहामुळे एका अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास हडको एन-१२ येथील वानखेडेनगरात घडली.
घटनास्थळी महापालिका, वीज कंपनी आणि ड्रम प्रकल्प असे तीन संस्थांचे खांब आहेत. तिन्ही खांबांमध्ये विद्युतप्रवाह उतरला होता. त्या बालकाचा मृत्यू नेमका कोणत्या खांबामुळे झाला हे स्पष्ट झाले नाही. याचाच फायदा घेऊन तिन्हीही संस्थांनी हात वर केले.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे धरणे आंदोलन
नांदेड, ९ जून/वार्ताहर
‘जादूटोणा विरोधी कायदा’ करण्यास शासन चालढकल करीत असल्यामुळे शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती डोळ्यावर काळ्या पट्टय़ा बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ‘जादूटोणा आणि अनिष्ट व अघोरी प्रथांचे समूळ उच्चाटन अधिनियम २००५’ विधानसभेत मंजूर झालेले आहे. हे विधेयक कोणत्याही धर्मविरोधी नाही, तर शोषण व फसवणुकीविरोधी आहे. परंतु महाराष्ट्र शासन हे जनहिताचे विधेयक विधान परिषदेत बहुमतात असतानाही मंजूर करून घेऊ शकले नाही. याबाबत शासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो असा आरोपही केला आहे.

मोटार अपघातात एक ठार
कुटुंबीय गंभीर जखमी
बीड, ९ जून/वार्ताहर

भरधाव वेगातील ऑल्टो कार चालकाचा ताबा सुटल्याने पुलावरून खड्डय़ात कोसळली. यात चालक जनार्दन विष्णुपंत क्षीरसागर (वय ३४) हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी, दोन मुले आणि इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. बीड-गेवराई रस्त्यावर पारगाव जप्ती येथे मंगळवारी सकाळी ऑल्टो कारमधून हे कुटुंब प्रवास करीत होते. दुर्घटनाग्रस्त कार स्वत: जनार्दन क्षीरसागर चालवित होते. त्यांचा वाहनावरून ताबा सुटल्याने कार पुलावरून २० फू ट खड्डय़ात कोसळली. मृत जनार्दन क्षीरसागर हे शिरूर तालुक्यातील रायमोहा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण क्षीरसागर यांचे चुलत बंधू होते.

बेबाकी प्रमाणपत्रासाठी बँकेकडून शेतक ऱ्यांची लूट
बोरी, ९ जून / वार्ताहर

शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीककर्ज घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेकडून बेबाकी प्रमाणपत्र घेणे सक्तीचे करण्यात असून, त्यासाठी बँका शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीयीकृत बँकेचा खातेदार नसले तरी किसान क्रेडिट कार्डची तीन वर्षांची मुदत संपल्याने पीककर्जासाठी मात्र शेतक ऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेचे प्रमाणपत्र सक्तीचे के ले आहे. बेबाकी प्रमाणपत्रासाठी स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँकेत १२० रु. द्यावे लागत आहेत. मराठवाडा ग्रामीण बँक यासाठी ५० रु. घेत आहे. खरिपाच्या पेरणीसाठी थोडे कर्ज घेणाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. विकास सोसायटी मात्र ठरावीक शुल्क आकारत नाही. शेतक ऱ्यांकडून बेबाकी प्रमाणपत्रासाठी घेण्यात येणारी रक्कम बँकेला घेता येते काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शासनाने शेतकऱ्यांचे हितासाठी कर्जमाफी दिली. मात्र प्रमाणपत्रासाठी बँका शेतक ऱ्यांची लूट करीत आहेत.

आजेगावात हाणामारीत एक अत्यवस्थ
हिंगोली, ९ जून/वार्ताहर

सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे जुन्या वादातून त्र्यंबक नरवाडे यांना मारहाण होताना त्यांचा मुलगा समाधान भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेला असता एकाने त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. त्यात त्याचा मृत्यू झाला.गोरेगाव पोलिसात याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबक नरवाडे यांना जुन्या वादावरून रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी मारोती नरवाडे, कैलास नरवाडे, संतोष नरवाडे, परमेश्वर नरवाडे, विजू दिपके हे मारहाण करीत होते. त्यावेळी समाधान नरवाडे हा भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला असता कैलास नरवाडे यांनी त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून गंभीर जखमी केले.
गंभीर जखमी अवस्थेत समाधानला सुरुवातीला हिंगोली येथे व नंतर नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले. औषधोपचार सुरू असताना सोमवारी दुपारी त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.
या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात वरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक रवींद्र पेलगुरवार पुढील तपास करीत आहेत.

परतूर परिसरातील बेसुमार वृक्षतोड थांबविण्याची मागणी
परतूर, ९ जून / वार्ताहर

पर्यावरणावर होत असलेला गंभीर परिणाम लक्षात घेता शहर परिसरातील बेसुमार वृक्षतोड तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष भगवानराव मोरे यांनी औरंगाबादच्या उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांकडे केली आहे.येथील उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम झाला आहे. कायदा धाब्यावर बसवून सर्रास वृक्षतोड केली जाते. जिल्हास्तरावर वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वन विभागाच्या फिरत्या पथकाने कोणावर कारवाई केल्याचे दिसत नाही. शहरात मुख्य रस्त्यावरदेखील झाडे तोडून अनधिकृत वाहतूक केली जाते. वृक्षतोडीमुळे पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. वाढत्या वृक्षतोडीला आळा घालावा, अशी मागणीही मोरे यांनी निवेदनात केली आहे.

डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या राजीनाम्यासाठी निदर्शने
औरंगाबाद, ९ जून/खास प्रतिनिधी
उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करून शिवसेनेच्या शाखेतर्फे क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली.जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख जयवंत ऊर्फ बंडू ओक, उपजिल्हाप्रमुख नंदकुमारे घोडेले व नरेंद्र त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निदर्शने करण्यात आली. सीबीआयने डॉ. पाटील यांच्याविरुद्ध पुरावे जमा करून त्यांना अटकही केली आहे. त्यामुळे डॉ. पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केली. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात राज्य सरकारने कायम डॉ. पाटील यांना पाठीशी घातले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचाही निषेध व्यक्त करण्यात आला.

रिक्षाचालकावर हल्ला
औरंगाबाद, ९ जून /प्रतिनिधी
वाळूज औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंबेगावहून आसेगावला रिक्षा घेऊन जाणाऱ्या चालकाला ४ ते ५ जणांनी लाठय़ा, काठय़ांनी बेदम मारहाण केली. असेगाव येथील महादेव मंदिरानजीक ही घटना घडली. प्रभू नारायण बागूल (वय १९, रा. आसेगाव) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तो रिक्षा घेऊन गावाकडे जात असताना हॉटेल त्रिशूल येथे त्याच्यावर हल्ला करण्यात आला.अन्य एका घटनेत सिडको एन-६ येथील स्मशानभूमीनजीक असलेल्या हॉटेलजवळ महेबूबखान जमीरखान (वय ४०, रा. उस्मानपुरा) यांच्यावर अज्ञात लोकांनी तलवारीने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महेबूब यांचा हात, पाय आणि छातीवर वार करण्यात आले. वार करणारे कोण होते हे समजू शकले नाही.

वाहतूक पोलिसांना शिवीगाळ
औरंगाबाद, ९ जून/प्रतिनिधी

चुकीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या रिक्षाला दंड लावणाऱ्या वाहतूक पोलिसांना रिक्षाचालक आणि त्याच्या भावाने शिविगाळ केली. ही घटना सोमवारी रात्री सिडको बसस्थानकाजवळील दिपाली हॉटेल येथे घडली. विजय आणि अमोल पोपटराव दंडगव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी गंगासागर गोविंदा महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. विजय याने रिक्षा चुकीच्या ठिकाणी उभी केलेली होती. महाजन यांनी ती पोलीस चौकीजवळ आणून उभी केली. चुकीच्या ठिकाणी रिक्षा उभी केल्याबद्दल दंड आकारण्यावरून अमोल याने पोलिसांशी वाद घातला. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच त्यांच्या सहकाऱ्यांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मुलीवर पित्याचा बलात्कार
नराधम पित्यास अटक
परळी वैजनाथ, ९ जून/वार्ताहर

शहराच्या भीमवाडी भागात एका नराधमाने स्वत:च्याच मुलीस खोलीत कोडून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या नराधम पित्यास अटक करण्यात आली आहे.पोलीस सूत्रांनुसार, शहराच्या भीमवाडी भागातील मुसाखान याने आज पहाटे ३ च्या सुमारास आपल्या १८ वर्षीय मुलीस खोलीत बोलावून घेतले. आपल्या बापाच्या मनात वाईट भावना आली असेल तिला वाटले नाही. वडिलांनी काहीतरी कामासाठी बोलाविले असेल असे समजून ती तेथे गेली. तोच त्या नराधमाने खोलीचे दार लावून घेतले व तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने कशीबशी सुटका करून घेतली.
याप्रकरणी त्या मुलीने आपस्या पित्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मुसाखान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायलयात हजर केले असता त्याला २२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आयुक्तांकडून प्रशासकीय फेरबदल
औरंगाबाद, ९ जून/प्रतिनिधी
या आठवडय़ात आयुक्त वसंत वैद्य प्रथम नागपूर दौरा आणि नंतर रजेवर जात आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज प्रशासनात फेरबदल केले. शहर अभियंत्याकडे असलेला उद्यान आणि प्राणिसंग्रहालय हा विभाग काढून घेण्यात आला असून त्याचा पदभार उपायुक्तांकडे सोपविण्यात आला आहे. त्याबरोबरच प्रकल्प संचालकांकडे असलेले शिक्षण आणि घनकचरा हे विभाग काढण्यात आले आहेत. घनकचरा पुन्हा एकदा मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तर शिक्षण विभागाचा पदभार सांस्कृतिक अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. आयुक्तांचे स्वीय सहायक सुनील ढेकळे यांची बदली तांत्रिक विभागात तर उपायुक्तांचे स्वीय सहायक प्रमोद खोब्रागडे यांची बदली त्यांच्या जागी करण्यात आली आहे. आयुक्तांचा दौरा तसेच रजेच्या काळात उपायुक्त उद्धव घुगे यांच्याकडे अतिरिक्त पदभार असण्याची शक्यता आहे.

विलास भामरे यांचे निधन
औरंगाबाद, ९ जून/प्रतिनिधी
शहानूरवाडी येथील माध्यमिक विद्यालयातील परिचर विलास चंद्रकांत भामरे (रा. बारावी योजना, शिवाजीनगर) यांचे अल्पशा आजाराने अमळनेर येथे निधन झाले. ते ३७ वर्षांचे होते. यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

खासदार खैरे यांचा रुद्राक्ष महाअभिषेक
औरंगाबाद, ९ जून/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत लागोपाठ तिसऱ्यांदा विजय झाल्याबद्दल खासदार चंद्रकांत खैरे, पत्नी वैजयंती खैरे यांनी वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिरात १ लाख २१ हजार १११ त्रिगुणी रुद्राक्ष महाअभिषेक धार्मिक पद्धतीने केला. यावेळी सचिन खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर विजया रहाटकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुनीता आऊलवार, शहरप्रमुख जयवंत ऊर्फ बंडू ओक, विकास जैन, अनिल पोलकर आदींसह शिवसेना-भाजपा युतीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. वेरुळच्या घृष्णेश्वर व्यापारी संघटनेतर्फे खासदार खैरे यांचा सत्कारही करण्यात आला.

पोलिसांना माहिती दिल्याने मारहाण
औरंगाबाद, ९ जून/प्रतिनिधी

पोलिसांना माहिती दिल्याचा राग आल्याने चौघांनी मिळून इम्तियास अली अब्बास अली (वय २२, रा. लोटाकारंजा) यास बेदम मारहाण करून चाकूने भोसकले.अमजद गफारखान, खलीलखान गफारखान, फारूखखान खाजाखान आणि बंडय़ा अशी आरोपींची नावे आहेत.

दरोडेखोरांना पकडणाऱ्या तरुणांचा सत्कार
अंबड, ९ जून/वार्ताहर
जिवाची बाजी लावून तीन दरोडेखोरांना पकडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसह तरुणांचा जालना जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक मधुकरराव गोसावी अध्यक्षस्थानी होते. घनसावंगी तालुक्यातील दहिगव्हाण येथे काल झालेल्या कार्यक्रमात श्री. कर्णिक यांनी दरोडेखोर पकडून दिल्याबद्दल १० हजारांचे बक्षीस जाहीर केले. गोवर्धन बेरके, विलास दहिभाते, पाराजी दहिभाते, अशोक दहिभाते, विष्णू ब्रrो, बद्रिनाथ दहिभाते, रामचंद्र नाईकवाडे, पांडुरंग कुमावत, प्रल्हाद ब्रrो, प्रल्हाद नाईकवाडे, दिगंबर दहिभाते; भायगव्हाण येथील रामकिसन एसलोटे, आसाराम एसलोटे, नारायण गरड, अशोक मंडलिक; सनवाडी येथील ज्ञानदेव शेंडगे, तुकाराम शेंडगे; पिंपरखेड येथील अनिल सानप, नरहरी मिसाळ, माधव जायभाये, रामभाऊ वने, पांडुरंग गर्जे यांचा सत्कार करण्यात आला.

‘‘अ‍ॅनिमेशन’ मुळे करिअरची नवी दालने खुली’
लातूर, ९ जून/वार्ताहर
जागतिकीकरणामुळे व्यवसायाभिमुख शिक्षणाची नवीन दालने उदयास आली आहेत. अ‍ॅनिमेशन पदवी अभ्यासक्रम शहरात सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळणार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांनी केले.अरेना अ‍ॅनिमेशनच्या बी.एस्सी. डिग्री इन मल्टीमीडिया अ‍ॅण्ड अ‍ॅनिमेशन या पदवी अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अरेना अ‍ॅनिमेशन, पुणे विभागाचे उपव्यवस्थापक संदीप गजभरे, शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य कोळपे उपस्थित होते. याप्रसंगी शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य कोळपे यांनीही मनोगत व्यक्त केले.
इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित अरेना अ‍ॅनिमेशन, प्रशिक्षण केंद्र, राजीव गांधी चौक, लातूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करणार’
धारूर, ९ जून/वार्ताहर

कायम विनाअनुदानित धोरणावर या अधिवेशनात निर्णय होणार असून २० टक्के अनुदान चालू शैक्षणिक वर्षांपासून मिळावे यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे आमदार विक्रम काळे यांनी सांगितले. धारूर येथे सुरू असलेल्या शिक्षक प्रशिक्षणास आमदार काळे यांनी नुकतीच भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. प्रा. अंकुश माडे, शिक्षक नेते इंद्रजित जाधव, संतोष गरडे, श्रीकृष्ण शिनगारे यावेळी उपस्थित होते. श्री. काळे म्हणाले, शिक्षणातील झालेले बदल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांची प्रशिक्षणे आयोजित केली जातात. याचा शैक्षणिक परिस्थितीच्या बदलासाठी वापर करणे गरजेचे आहे. या वेळी गट शिक्षण अधिकारी आ. एन. राऊत यांनी प्रशिक्षणाची माहिती दिली.

संत कबीर जयंती उत्साहात
लातूर, ९ जून/वार्ताहर

संत कबीर प्रतिष्ठानने संत कबीर यांची ६१० वी जयंती उत्साहात साजरी केली. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. अंबादास देशमुख होते. प्रा. श्याम आगळे व डॉ. देशमुख यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. डॉ. देशमुख म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेसाठी धर्मनिरपेक्षता, प्रेम व बंधुभावाचा प्रचार, प्रसार कबीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे.