Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

पद्मसिंह पाटील हे पक्षाचे ज्येष्ठ, सन्माननीय आणि प्रश्नमाणिक सदस्य
राष्ट्रवादीकडून पाठराखण
नवी दिल्ली, ९ जून/खास प्रतिनिधी

 

काँग्रेसनेते पवनराजे निंबाळकर यांच्या खुनाचा आरोप सिद्ध होईपर्यंत खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांची पाठराखण करण्याची भूमिका आज राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. पद्मसिंह पाटील यांनी गुन्हा केल्याचे न्यायालयात होत नाही तोपर्यंत ते निर्दोष आहेत आणि गरज पडल्यास कोर्टात लढाई लढण्यासाठीही त्यांना मदत केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले.
सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना खुनाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर नैतिकतेच्या मुद्यावरून त्यांच्याकडून खासदारपदाचा राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र आणि दिल्लीत विरोधी पक्षांनी दडपण आणायला सुरुवात केली होती. पण पाटील हे पक्षाचे ज्येष्ठ, सन्माननीय आणि प्रश्नमाणिक सदस्य असल्याचा दावा करीत त्यांच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध होईपर्यंत ते दोषी नाहीत, अशी भूमिका आज राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली. पद्मसिंहांवर असलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या सीबीआयवर तसेच न्यायसंस्थेवर आमचा विश्वास आहे. पण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीज पद्मसिंह पाटील यांच्याविषयी कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, अशा शब्दात पद्मसिंह पाटील यांच्याविषयी त्रिपाठी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली. केवळ खुनाचा आरोप झाला म्हणून त्यांना दोषी ठरविणे योग्य नाही. त्यांच्याविरुद्ध अजून आरोपपत्रही दाखल झालेले नाही, असे ते म्हणाले.