Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

अण्णांची तोफ पुन्हा धडाडली
पद्मसिंहांसारखी माणसे दहशतवाद्यांपेक्षाही धोकादायक
मुंबई, ९ जून / प्रतिनिधी

 

काँग्रेस नेते पनवराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणात अटक झालेले पद्मसिंह पाटील यांच्यासारखे लोक खरे तर कायमचे तुरुंगात असायला हवे. त्यांच्यासारखे लोक हे पाकिस्तानी दहशतवाद्यांपेक्षाही अधिक धोकादायक असतात, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज केला. पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्याप्रमाणे हजारे यांच्याही हत्येची सुपारी दिली होती, असे चौकशीत उघड झाल्यानंतर अण्णांनीही तशी शक्यता बोलून दाखविली होती. त्या पाश्र्वभूमीवर आज सीबीआयतर्फे अण्णा हजारे यांचा जबाब नोंदविण्यात आला. दक्षिण मुंबईतील सीबीआयच्या ‘तन्ना हाऊस’मधील मुख्यालयात सुमारे अडीच तास हजारे यांचा जबाब नोंदविण्यात आला.
निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी पारसमल जैन याने चौकशीदरम्यान या हत्येमागे सतीश मंदाडे असल्याचे उघड केले. सतीश मंदाडे हा ‘तेरणा डिस्टलरी’चा माजी अधिकारी असून पद्मसिंह पाटील यांचा निकटवर्तीय आहे. पद्मसिंह पाटील ज्या वेळेस ‘तेरणा’चे अध्यक्ष होते त्या वेळी मी पाटील यांनी केलेले अनेक घोटाळे उघडकीस आणले होते. त्याच कारणास्तव पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येचे कटकारस्थान रचून सुपारी दिली असावी, असा जबाब आपण केंद्रीय गुप्तचर विभागाला (सीबीआय) दिल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. जबाब नोंदविल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अण्णांनी सांगितले की, पद्मसिंह पाटील यांनी आपल्या हत्येची सुपारी का दिली असावी हे आपण जबाबात सांगितले असून निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणाप्रमाणे या प्रकरणीही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच पाटील यांच्याविरुद्धचे सर्व पुरावेही सीबीआयकडे सुपूर्द केले आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी या प्रकरणी बजावलेल्या भूमिकेविषयीही अण्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, पाटील हे चांगले गृहस्थ असल्याचे मी मानत होतो. त्यांच्यासाठी मी प्रचारही केला होता. मात्र त्यांनीच निंबाळकर हत्याप्रकरण दाबून ठेवून पद्मसिंह पाटील यांना पाठीशी घातल्याने त्यांच्यावरील आपला विश्वास पूर्ण उडाला आहे. सीबीआय सध्या या प्रकरणी चांगली कामगिरी करीत आहे. मात्र पुढेमागे राजकीय पातळीवरून त्यांच्यावर जर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला तर आपण त्याविरोधात मोठे आंदोलन छेडू, असा इशाराही अण्णांनी या वेळी दिला.