Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

दुखापतीमुळे सेहवाग वर्ल्डकपमधून बाहेर
ट्रेन्ट ब्रिज, ९ जून / पीटीआय

 

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी इंडियन प्रीमियर लीगदरम्यान दुखापतग्रस्त झालेला भारताचा उपकर्णधार व सलामीवीर वीरेंद्र सेहवाग अखेर एकही सामना न खेळता इंग्लंडहून भारतात दाखल होणार आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे बेजार असलेला सेहवाग सराव सामन्यातही खेळला नाही आणि नेटमध्येही सरावाला येऊ शकला नाही. आज तो सरावाला उतरला पण केवळ १२ चेंडू खेळल्यानंतर त्याला पुढे खेळणे जमले नाही. अखेर या संपूर्ण स्पर्धेत तो खेळणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात येणार आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी सांगितले की, वीरू हा आमचा एक महत्त्वाचा फलंदाज आहे. त्यामुळे तो संघात नाही, हा एक मोठा धक्का आहे. त्याच्या अनुपस्थितीत आम्हाला आता खेळावे लागेल. आज सकाळी सेहवाग मैदानात सरावासाठी उतरला आणि थोडय़ाच वेळात वेदना होत असल्याचे धोनी व कर्स्टन यांना सांगून ड्रेसिंग रूमकडे परतला. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले की, सेहवागच्या खांद्यावर शस्त्रक्रियेची गरज असून इंग्लंडमध्ये डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर तो मायदेशी परतेल.
सरावाच्या सामन्यांमध्ये सेहवाग न खेळल्याने त्याच्यात आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात वाद झाल्याचे वृत्त पसरले. त्यानंतर धोनीने पत्रकार परिषदेत सर्व खेळाडूंना एकत्र बोलावून संघात कोणतीही फूट नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. सेहवाग जरी दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला असला तरी त्याची उणीव भारताला फारशी जाणवेल अशी शक्यता नाही. कारण त्याच्या गैरहजेरीत रोहित शर्माने सलामीवीर म्हणून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.