Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

पंचतारांकित हॉटेलांच्या सुरक्षेचा विनाकारण भुर्दंड!
मुंबई, ९ जून / प्रतिनिधी

 

२६/११ च्या हल्ल्यात अतिरेक्यांचे लक्ष्य ठरलेल्या ताज महल आणि ट्रायडण्ट या पंचतारांकित हॉटेलांनी अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिकाधिक कडक केल्यानंतर वास्तविक हॉटेलबाहेर असलेला पोलिसांचा बंदोबस्त काढून घेण्याची आवश्यकता होती. परंतु टीका नको म्हणून या पंचतारांकित हॉटेलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे राखीव बळ विनाकारण खर्ची केले जात असल्याची भावना अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
ताज महल हॉटेल तसेच ट्रायडण्ट हॉटेलबाहेर या हल्ल्यानंतर राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकासह २४ शिपायांचा समावेश आहे. या दोन्ही हॉटेलपासून काही अंतरावर हे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून त्यांनी पहारा करावा अशी अपेक्षा आहे. मात्र या पोलिसांकडे फारच कमी स्वयंचलित शस्त्रे असून बहुतेक जुनाट रायफलीच्या जोरावर हे शिपाई आपला जीव धोक्यात घालून बंदोबस्त करीत आहेत. याशिवाय स्थानिक पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
वास्तविक दोन्ही पंचतारांकित हॉटेलांनी २६/११ च्या हल्ल्यानंतर अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत कमालीचा बदल केला आहे. कुणीही व्यक्ती आता आपली संपूर्ण ओळख पटविल्याशिवाय थेट आत शिरणे कठिण आहे तसेच स्फोटकांनी भरलेले वाहनही थेट आत शिरू नये यासाठी अडथळे उभारण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. याशिवाय स्वयंचलित शस्त्र हाताळू शकणारे सुरक्षा रक्षक तैनात करण्याच्या सूचनाही या हॉटेल व्यवस्थापनांना करण्यात आल्या आहेत. वेळोवेळी झालेल्या बैठकीत हॉटेल व्यवस्थापनानेही सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे मान्य केले आहे. अत्याधुनिक बंदूकधारी सुरक्षा रक्षक कुठल्या ठिकाणी रात्रंदिवस तैनात करता येतील याबाबतचा आराखडाही या हॉटेल व्यवस्थापनांना देण्यात आला आहे. अतिरेकी आत शिरले तरी त्यांना लगेचच विशिष्ट उंचीवर असलेल्या ठिकाणावरून टिपता येणे या आराखडय़ामुळे शक्य होणार आहे. २२ ते २५ हजारांपासून लाख रुपयांपर्यंत भाडे आकारणाऱ्या पंचतारांकित हॉटेलांना अशा प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेवर खर्च करणे कठिण नाही. त्यामुळे राज्य राखीव पोलीस दल वा स्थानिक पोलिसांचा विनाकारण बंदोबस्त ठेवणे आवश्यक नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मात्र तरीही अद्याप हा बंदोबस्त हटविण्याबाबत सूचना मिळत नसल्याचे सांगण्यात आले. राज्य राखीव पोलीस दलाचे ४८ जवान आणि दोन अधिकारी आवश्यकता नसतानाही बंदोबस्ताच्या कामी अडकून पडले आहेत. पोलिसांनी स्वत:हून हा बंदोबस्त ठेवल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेपोटी शुल्क अदा करण्याबाबत पंचतारांकित हॉटेले मूग गिळून गप्प आहेत. आवश्यकता नसताना अशा पद्धतीचा बंदोबस्त ठेवणे म्हणजे सरकारच्या तिजोरीवर विनाकारण भुर्दंड लादण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.