Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

महिला आरक्षण विधेयकावरून विरोधी पक्षांमध्येच ओढताण
नवी दिल्ली, ९ जून/खास प्रतिनिधी

 

पहिल्या शंभर दिवसात महिला आरक्षण विधेयक पारित करण्याचा मनमोहन सिंग सरकारने निर्धार व्यक्त करताच या वादग्रस्त विधेयकावरून विरोधी बाकांवरील पक्षांमध्ये ओढताण सुरु झाली आहे. लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी ३३ टक्के आरक्षण कोणत्याही स्वरुपात मिळाले पाहिजे, अशी भूमिका आज भाजपने जाहीर केली, तर या विधेयकाचे कट्टर्र विरोधक मुलायमसिंह यादव, शरद यादव आणि लालूप्रसाद यादव यांच्या भूमिकेचे कल्याण सिंह यांनी समर्थन करताना भाजपशी संबंध तोडण्याचा जदयुला सल्ला दिला.
महिला आरक्षण विधेयक आणण्यामागे देशातील प्रमुख प्रश्नदेशिक पक्षांचे अस्तित्व संपविण्याचे कारस्थान असल्याचा आरोप यादव मंडळी करीत आहे. आज लोकसभेत लालूप्रसाद यादव यांनीही या विधेयकाचा विरोध करताना दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय महिलांसाठी ३३ टक्क्यांमध्ये आरक्षण असावे, अशी मागणी केली. हीच मागणी शरद यादव आणि मुलायमसिंह यादव यांनीही केली आहे. आज त्यांच्याच सूरात सूर मिसळत कल्याण सिंह यांनीही हीच मागणी केली. या विधेयकाचे ठाम समर्थन करणाऱ्या भाजपला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शरद यादव यांनी बाध्य करावे किंवा भाजपशी या मुद्यावरून जदयुने संबंध तोडावे, असा सल्ला कल्याण सिंह यांनी दिला. निरागस महिलांना पुढे करून प्रश्नदेशिक पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना संपविण्याचे हे कारस्थान असल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. ज्या कलावतीच्या नावावर राहुल गांधींची लोकसभेत टिंगलटवाळी करण्यात आली, त्या कलावतीसारख्या महिलांना आम्ही लोकसभेत पाहू इच्छितो, असे सांगून लालूंनी आरक्षणात आरक्षणाची मागणी केली. लोकसभेत जास्त महिला आणण्याचा प्रयत्न कराल, तर तुमचे महत्त्व काय राहील, असा टोलाही त्यांनी या विधेयकाचे समर्थन करीत असलेल्या सुषमा स्वराज यांना लगावला.
पण सुषमा स्वराज आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. देशात महिलांची लोकसंख्या पन्नास टक्के केवळ ३३ टक्केच आरक्षण मागितले जात आहे, असे सांगून टक्केवारी कमी करण्याविषयी भाजप कोणतीही तडजोड करणार नाही, असे स्वराज यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.