Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

प्रादेशिक

ऑनलाइन प्रवेशाचे संकेतस्थळ सरावासाठी खुले
मुंबई, ९ जून / प्रतिनिधी

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड परिसरातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी शालेय शिक्षण विभागाने तयार केलेले संकेतस्थळ विद्यार्थ्यांच्या सरावासाठी खुले करण्यात आले आहे. ऑनलाइन प्रक्रियेतील दोष व उणिवांवर बोट ठेवीत शिवसेना, भाजपसह विविध राजकीय पक्ष तसेच शिक्षणक्षेत्रातूनही टीका करण्यात येत होती.

लालूंनी जाता जाता घेतला कायम रेल्वेप्रवासाचा ‘प्रसाद!’
मुंबई, ९ जून / प्रतिनिधी

भारतीय रेल्वेला नफ्यात आणणारे आणि त्यासाठी ‘व्यवस्थापन गुरु’ म्हणून पाठ थोपटून घेतलेले लालूप्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्रीपदाचा पदभार सोडताना स्वत:सह आपल्या कुटुंबाचीही कायमस्वरूपी रेल्वेप्रवासाची सोय करून घेतली आहे. या निर्णयाचा निषेध माजी रेल्वे राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) राम नाईक यांनी केला असून लालूप्रसाद यांनी लाटलेल्या या सवलतीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून तो रद्द करावा, अशी मागणी रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.

चौथी, सातवी पास सदस्य शिक्षण मंडळांवर नेमण्यास मनाई
मुंबई, ९ जून/प्रतिनिधी

नगरपालिकांच्या शिक्षण मंडळांवरील निर्वाचित तसेच शासननियुक्त सदस्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयीचे ‘बॉम्बे प्रश्नयमरी एज्युकेशन अ‍ॅक्ट’ या ६२ वर्षापूर्वीच्या कायद्याने ठरविलेले निकष आता कालबाह्य झालेले असल्याने राज्य शासनाने त्यात कालानुरूप बदल करावेत आणि त्यासाठी कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती तीन महिन्यांत करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

मुंबई, ठाण्याला पुरेसे पाणी
मुंबई, ९ जून / खास प्रतिनिधी

मुंबई परिसरात सध्या पाण्याची तीव्र समस्या भेडसावत असली तरी मध्य वैतरणा धरणाचे काम २०११ पर्यंत पूर्ण झाल्यावर मुंबईला तर सूर्या धरणात दरवाजा बसविल्यानंतर ठाणे जिल्ह्य़ात पुरेसे पाणी उपलब्ध होईल, असे पाणीपुरवठामंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितले.

अर्थसंकल्पावरील चर्चेवर विरोधकांचा बहिष्कार
अर्थमंत्री व अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचा निषेध
मुंबई, ९ जून/प्रतिनिधी
अर्थमंत्री, अर्थराज्यमंत्री तसेच अधिकारी यांच्या अनुपस्थितीमुळे संतप्त झालेल्या शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या संदर्भात व्यक्त केलेली दिलगिरी धुडकावून लावत विधान परिषदेत आज अर्थसंकल्पावरील चर्चेवर बहिष्कार घातला. तत्पूर्वी वेगवेगळ्या खात्यांचे पाच मंत्री अनुपस्थित असल्याने संतापाचा पारा चढलेल्या विरोधी पक्षांकडे संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही दिलगिरी व्यक्त केली होती.

श्रीकांत मोघे आणि भावना यांना नाटय़ परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार
मुंबई, ९ जून, नाटय़-प्रतिनिधी

बुजुर्ग अभिनेते श्रीकांत मोघे आणि ज्येष्ठ अभिनेत्री भावना यांना अ. भा. मराठी नाटय़ परिषदेचे जीवनगौरव पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व मानपत्र या स्वरूपातील हे पुरस्कार त्यांना येत्या १४ जूनला नाटय़ परिषदेच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात गो. ब. देवल स्मृतिदिनी प्रदान करण्यात येतील. राज्य शासन पुरस्कृत राम गणेश गडकरी पुरस्काराने नाटककार अशोक समेळ यांना, तर बालगंधर्व पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांना गौरविण्यात आले आहे. चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार बुजुर्ग अभिनेते जयंत सावरकर यांना आणि केशवराव भोसले पुरस्कार साहिर नदाफ यांना जाहीर झाला आहे. म्हैसकर फौंडेशनतर्फे पुरस्कृत पारितोषिक नेपथ्यकार दत्ता चोडणकर यांना देण्यात आले आहे. बबन प्रभू पारितोषिक नाटककार देवेंद्र पेम यांना मिळाले आहे. इतर पुरस्कारविजेत्यांमध्ये ईला भाटे, लता भोगले, विजय मोंडकर, गिरीश साळवी, संतोष मयेकर, दया डोंगरे, निर्मिती सावंत, नाटककार आनंद म्हसवेकर, मंगेश कदम, गौतम मुर्डेश्वर, ज्ञानेश पेंढारकर, अशोक पत्की, अवधूत भिसे, राजा मयेकर, विवेक आपटे, दीपक करंजीकर, प्रदीप पाटील, परी तेलंग, वर्षा दांदळे, नरेंद्र बेडेकर, राम दौंड, अनिल गवस, शशिकांत सकपाळ, वीरेंद्र गणवीर, चेतन वैद्य आणि अभिनेत्री रीमा आदींचा समावेश आहे.‘बंटी की बबली?’ या अष्टविनायक संस्थेच्या नाटकास राजाराम हुमणे पारितोषिक, तर ‘त्या एका वळणावर’ या नाटकाला अल्बा पंडित पारितोषिक जाहीर झाले आहे

दुसऱ्याचा ऑनलाइन अर्ज भरणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार
मुंबई, ९ जून/प्रतिनिधी

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये जाणीवपूर्वक दुसऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज भरून त्याचे शैक्षणिक नुकसान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विघ्नसंतोषी व्यक्तींवर सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तजवीज शालेय शिक्षण विभागाने केली आहे. एवढेच नव्हे तर, असा कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी ऑनलाइन अर्जाच्या दोन प्रिंट आऊट्स काढून त्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून साक्षांकित (अटेस्टेड) करून घेतल्यानंतरच सबमीशन सेंटर्सवर सादर करण्याचे बंधनही घातले आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर केवळ परीक्षा क्रमांक नमूद केला तरी कोणत्याही विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. त्यामुळे या सुविधेचा गैरफायदा घेत काही अज्ञात व्यक्ती दुसऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज सादर करून त्याचे जाणीवपूर्वक नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. असा कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने काळजी घेतली असल्याचे प्रवेश संनियंत्रण समितीचे सदस्य प्रश्नचार्य टी. ए. शिवारे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

कुपोषित बालकांची माहितीच ‘बेपत्ता!’
मुंबई ९ जून/ खास प्रतिनिधी

लाल दिव्याची गाडी मिळावी यासाठी अट्टाहास करणारे मंत्री विधानसभेच्या अधिवेशनात अनेकदा अनुपस्थित असतात. आता त्याच्यापुढे एक पाऊल पुढे जाताना लक्षवेधीच्या लेखी उत्तरातही माहिती न देणे, असा एक अजब पायंडा पाडला जात आहे. आदिवासींच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून येणाऱ्या शेकडो कोटी रुपयांचा वापर न झाल्यामुळे ते परत पाठविण्याची वेळ राज्य शासनावर येणे, तसेच ९० टक्के आदिवासी दारिद्रय़ रेषेखाली असणे आणि ६० टक्क्यांहून अधिक बालके कुपोषित असल्याबाबतची लक्षवेधी विधानसभेत मांडण्यात आली होती. आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी यावर दिलेल्या लेखी उत्तरात केंद्राकडून आलेला कोणताही निधी परत गेला नसल्याचे सांगितले. तसेच दारिद्रय़रेषेखाली असलेल्या आदिवासींचे प्रमाण २३.८७ टक्के असल्याचे म्हटले आहे. राज्यात ४५,०२३८० कुटुंबे दारिद्रय़रेषेखाली असून आदिवासी कुटुंबांची संख्या १०,७४,९५१ एवढी असल्याचे म्हटले आहे. मात्र या उत्तरात कुपोषित बालकांची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याला विरोधी सदस्यांची आक्षेप घेतल्यानंतर अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी ही लक्षवेधी राखून ठेवली.

खासदार राजू शेट्टी यांचा शनिवारी सत्कार
मुंबई, ९ जून/ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे राजू शेट्टी खासदार म्हणून विजयी झाले. कष्टकऱ्यांचे आंदोलने सातत्याने लढून साखर कारखाने, सहकारी बँका, सहकारी दूध संघ आणि पतसंस्था अशी साधने हाताशी असलेल्या प्रस्थापित धनदांडग्यांच्या विरोधातील जनतेच्या लढय़ाचे प्रतीक बनलेल्या या कार्यकर्त्यांचा मुंबईत सत्कार करण्यासाठी असंघटित कष्टकऱ्यांच्या विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. सर्व श्रमिक संघटनेच्या नेतृत्वाखाली, गिरणी कामगार, सुरक्षा रक्षक आणि इतर असंघटितांच्या संघटनांच्या वतीने येत्या शनिवारी, १३ जूनला, दुपारी ४ वाजता कामगार कल्याण मंडळाचे सभागृह, ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या मागे, डिलाइल रोड येथे हा सत्कार होणार आहे.

सिडको भवनात अभ्यागतांना दुपारनंतर प्रवेश
मुंबई, ९ जून / प्रतिनिधी

सीबीडी बेलापूर येथील ‘सिडको भवना’त अभ्यागतांना दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रवेश देण्यात येणार आहे. ८ जूनपासून ही नवीन पद्धत अंमलात आली असून सुधारित वेळेनुसारच अभ्यागतांनी यावे, असे आवाहन सिडकोच्या जनसंपर्क विभागाने केले आहे.

शीतल मफतलाल यांना जामीन
मुंबई, ९ जून / प्रतिनिधी

विदेशातून लाखो रुपयांचे दागिने व हिरे अवैध मार्गाने आणल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ‘मफतलाल लक्झरी’च्या अध्यक्ष शीतल मफतलाल यांनाआज मुख्य महानगरदंडाधिकाऱ्याने पाच लाख रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. त्याचप्रमाणे १८ लाख रुपये हमी म्हणून न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले.काल न्यायालयाने त्यांना १२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. शीतल यांनी केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करत न्यायालयाने त्यांना पाच लाख रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. या जामिनानंतर उद्या शीतल यांची भायखळा तुरूंगातून सुटका करण्यात येईल.