Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

अ‍ॅड‘मिशन’
मॅनेजमेंट कोटय़ाचे दर भडकले!
११ वी, १३ वीच्या प्रवेशाची मागणी वाढली
प्रतिनिधी

 

वैद्यकीय, अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांच्या मॅनेजमेंट कोटय़ातील प्रवेशासाठी चालणारा घोडेबाजार आता अधिक व्यापक झाला असून यंदा ११ वी व १३ वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्येही त्याचा शिरकाव झाला आहे. ११ वी व १३ वीसाठी ‘मॅनेजमेंट कोटय़ा’चे दर यंदा प्रथमच एक लाखाच्या पुढे जाणार आहेत. विशेष म्हणजे, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा विपरित परिणाम होऊन ११ वीच्या मॅनेजमेंट कोटय़ाचे दर मोठय़ा प्रमाणात भडकणार असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.
१२ वीचा निकाल लागल्यानंतर आता या आठवडय़ात १३ वीची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. १३ वीच्या वाणिज्य शाखेसाठी जवळपास २६ हजार जागांपुढे प्रवेशाची समस्या निर्माण होणार आहे. वरिष्ठ महाविद्यालयांना १५ टक्के मॅनेजमेंट कोटा आहे. त्याचा पुरेपुर फायदा उठवत महाविद्यालयांनी दर निश्चित केले आहेत. नामांकित महाविद्यालयात मॅनेजमेंट कोटय़ासाठी दीड ते तीन लाख रूपयांचे दर निश्चित झाले आहेत. मध्यम दर्जाच्या महाविद्यालयांसाठी ७० हजार ते दोन लाख रूपयांचा दर निश्चित झाला आहे. हे सर्व दर बीएमएस, बी.कॉम. इन बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स, बी.एस्सी.-आयटी अशा सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येत आहे. पारंपरिक बी.कॉम. अभ्यासक्रमाला मात्र फारशी मागणी नसल्याने या अभ्यासक्रमाचा दर एक लाखाच्या आत आहे. याउलट कला व विज्ञान शाखेतील मॅनेजमेंट कोटय़ासाठी फारसी मागणी नसल्याने तिथे मॅनेजमेंट कोटय़ातील दर भडकलेले दिसत नाहीत.
११ वीची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास अद्याप अवकाश असला तरी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे महाविद्यालयांकडे प्रवेशाचे अधिकार उरलेले नाहीत. महाविद्यालयांना पाच टक्के मॅनेजमेंट कोटा देण्यात आला आहे. त्यामुळे मॅनेजमेंट कोटय़ातील प्रवेशाची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे. विज्ञान व वाणिज्य या दोन्ही शाखांसाठी यंदा अधिक मागणी असेल. नामांकित महाविद्यालयांमध्ये दोन ते चार लाख रूपयांपर्यंत तर मध्यम दर्जाच्या महाविद्यालयात एक ते तीन लाख रूपये दर निश्चित होतील, असा अंदाज आहे. १० वीचा निकाल लागल्यानंतर मॅनेजमेंट कोटय़ातील दरांची आकडेवारी अधिक स्पष्ट होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.